विदेश दर्शन - ३३

अवतीभोवती असलेल्या श्रीमंत देशांच्या कडक थंडीचे हवामान हे या देशाचे भांडवल आहे. येथे शेती फारशी नाहीच. फळफळावळ मात्र बरीच आणि विविध आहे. परंतु अर्थशास्त्र अवलंबून आहे ते अमेरिका, कॅनडा, युरोपमधून येणा-या १५ लाख हौसी प्रवासी धनिकांवर.

स्वच्छ आकाश, निळाभोर सागर आणि दिवसभर असणारा सूर्यप्रकाश यांवर थंडीच्या मुलुखातून आलेले हे लोक एकदम खूष असतात. खूप पैसे उडवतात. खातात, पितात, नाचतात, खेळतात. येथे परदेशियांसाठी फक्त कॅसिनोज् आहेत. लक्षावधी डॉलर्सचा जुगार येथे होतो.

काल आम्ही न्यू प्रॉव्हिड्सन्स (म्हणजे नॅसॉ) बेट सर्व फिरून पाहिले. खरे म्हणजे त्यात फारसे सौंदर्य दिसले नाही. मुंबईसारखी हवा. कोकण त्या मानाने अधिक सुंदर. या बेटांची प्रसिध्दी फार व महत्त्वाचे म्हणजे धनिक देशांचा निकटवर्ति शेजार. नाहीतर, अंदमान-निकोबार यांच्या शतपटीने आकर्षक आहेत. विशेषत: निकोबार बेटाची तुलना तर माझ्या मनाशी फार आली. ते बेट सुंदर आहे पण बिचारे हिंदी महासागरात आहे!

येथे काही भारतीय भेटले. टूरीझमचे प्रमुख श्री.सोमनाथ चिन हे आपल्या सरकारचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी आमचे फार मनापासून घरगुती स्वागत केले. त्यांच्या घरी बोलाविले. येथील गव्हर्नरचे खाजगी सेक्रेटरी यांची पत्नी भारतीय बंगाली महिला आहे. तिचा भाऊ मुजुमदार आमच्याच मिनिस्ट्रीमध्ये होता. त्यांनीही फार अगत्य दाखविले.

परिषद* काल संपली. उत्तम चर्चा झाल्या. पाकिस्तानचे प्रतिनिधी माझ्या भाषणावर उगीचच रागावले. परंतु इतरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

मी वादग्रस्त राजकीय प्रश्न आर्थिक परिषदेमध्ये उपस्थित करतो आहे अशी त्यांची तक्रार. पण ९० लाख निर्वासितांनी** निर्माण केलेला बिकट आर्थिक प्रश्न हा आमच्या आर्थिक परिस्थितीचे समालोचन करताना महत्त्वाचा भाग ठरतो. त्याबाबत आंतरराष्ट्रीय जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न अशा परिषदेतून आम्ही न केला तर आम्ही फक्त टूरिस्ट म्हणून या परिषदांना आलो होतो असाच निष्कर्ष नाही का निघणार?

येथून वॉशिंग्टनला निघणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

*    बहामा येथे कॉमनवेल्थ फायनान्स मिनिस्टर्स यांची वार्षिक बैठक-परिषद झाली. तेथे अर्थमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी केलेले भाषण-परिशिष्ट पहावे.

** बांगला देशातून भारतात (कलकत्ता येथे) ९० लाख निर्वासित आले होते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------