८ कोपनहेगन
२४ सप्टेंबर, १९७०
कालचं लिहिणं अपुरंच राहिलं. सायप्रसच्या प्रवासातील काही गोष्टी सांगत होतो. लिमासोलच्या भेटीआधी एका सकाळी उत्तर दिशेला असलेल्या कायरेनिया (Kyrenia) या बंदराचे ठिकाणी गेलो होतो.
तेथे (St. Hilarion Castle) या नावाचा जुनापुराणा किल्ला आहे. सिंधुदुर्गासारखा. कित्येक शतके तो तेथे आहे. अधूनमधून पडत राहिला; पुन्हा पुन्हा दुरुस्तही होत आला. अशी ही वास्तू आहे.
गेल्या एक दोन वर्षांखाली येथल्या एका नाविकाने किना-यापासून थोडे आत बुडालेले एक जुने छोटेखानी जहाज काढले व त्याचे काही भाग प्रदर्शन म्हणून किल्ल्यात ठेवले आहेत. या जहाजाच्या लाकडी पट्टया व त्यांत सापडलेल्या इतर वस्तूंच्या संशोधकीय परीक्षणानंतर असे दिसून आले की, ते जहाज २००० ते २१०० वर्षांपूर्वी अपघाताने तेथे बुडाले असावे.
छोटया जहाजांतून समुद्रमार्गे युरोपमधून इजिप्त वगैरे देशांशी जो व्यापार चाले त्या मार्गावर सायप्रस असल्यामुळे त्याला अतिशय महत्त्व होते. त्यामुळे त्याचे राजकीय महत्त्वही वाढत गेले. गेल्या तीन हजार वर्षात या बेटाची कितीतरी स्थित्यंतरे वा हस्तांतरे झाली; प्रभुत्व गाजविणा-या स्वामींची एका पाठोपाठ एक रांगच आहे. आज सुध्दा हे छोटे बेट बिनापाण्याचे व आधुनिक उद्योगधंद्याविना एक महत्त्वाचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून वावरत आहे.
कोपनहेगनला जाण्यापूर्वी १९ सप्टेंबरला तीन-चार तासांची एक सहल केली, ती पूर्व दिशेला असलेले काही जुने अवशेष (Ruins) पाहण्यासाठी! Salamis हे ख्रिस्तकालापूर्वीचे राजधानीचे शहर होते. आज फक्त त्याचे काही भग्न अवशेष आहेत. जुन्या ग्रीककालीन संस्कृतीचे महत्त्वाचे पुरावे आहेत हे.
जुने प्रेक्षकालय वा नाटयमंदिर कसे होते त्याची संपूर्ण कल्पना यावी अशी एक वास्तू तेथे पडिक अवस्थेत आहे. आजकालच्या स्टेडियमसारखी त्याची रचना आहे. राजवाडयातील स्नानगृहाची विशेष कल्पकतापूर्ण अशी रचना आहे.
एका स्नानगृहात ब्रह्मा, विष्णू, महेश या भारतातील प्रतिकांसारख्या ग्रीक प्रतिकांच्या मूर्ती आहेत. संगमरवरी मूर्ति इतक्या कलापूर्ण आहेत की बघत रहावं! पण त्यांत एकच मोठी उणीव आहे व ती म्हणजे त्या सर्व मूर्ति शिरविरहित आहेत!
आम्ही चौकशी केली तेव्हा समजले की, ख्रिश्चन धर्माची पहिली लाट आली तेव्हा काही आक्रमक धर्मवेडयांनी ती शिरे तोडून फोडून टाकली आहेत!
मला आजपर्यंत वाटत होते की असले विध्वंसक धर्मवेड फक्त इस्लामच्या आक्रमणामध्येच होते. परंतु ख्रिश्चनही काही अपवाद नव्हते असे दिसते. मला वाटते मध्यपूर्वेतील हा व आसपासचा अरब भूखंड व त्यातील मानवसमूह अधिकच आक्रमक व कडवट (fanatic) होता. येथेच आजचे शक्तिशाली दोन धर्म (ख्रिश्चॅनिटी व इस्लाम) अंकुरले. ज्यूंचे मूळ स्थानही येथेच. युरोप व आशिया दोन प्रचंड भूभागांतील मानवसमाजाच्या शेकडो वर्षांच्या इतिहासावर या छोटया भूखंडातील लोकजीवनाचे विलक्षण परिणाम झालेले आहेत.