या बेटावर ६-६॥ लाख वस्ती आहे. त्यातील १८ ते २० टक्के तुर्क लोक आहेत आणि इतर ८० टक्के ग्रीक लोक आहेत. त्यांचा परंपरागत लढा चालू आहे. संबंध बेबनावाचे आहेत. तुर्क, बेटाची विभागणी मागत आहेत. जहाल ग्रीक, येथून ५०० मैल दूर असलेल्या ग्रीसमध्ये सामील होण्याची आकांक्षा धरून आहेत. हल्लीचे सरकार मात्र या दोन्ही मागण्या गैर आहेत असे मानणारे असून यू. एन्. च्या शांतिसैन्याच्या मदतीने शांतता राखून आहेत.
सकाळी सुमद्रकिनाऱ्यावरून परत येताना तुर्क लोकांच्या विभागातून आम्ही परतलो. आमच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणाला की, तुमच्या निशाणामुळे मी प्रथमच बऱ्याच वर्षांनी या विभागात येऊ शकलो. या छोटया (किंवा या भागातील बडया म्हणा हवे तर) बेटावरील छोटी वस्ती मनाने अशी कडवट झाली आहे की, एकमेकांच्या विभागात जाणे-येणे बंद आहे.
दुपारी या राज्याच्या राष्ट्रपतींच्या राजवाडयात जेवण झाले. फक्त भारताच्याच प्रतिनिधींना त्यांनी बोलाविले होते. हे राष्ट्रपति पेशाने धर्मगुरु आहेत. ते नित्य राहतात आपल्या धर्मनिवासामध्ये. मात्र सरकारी कामासाठी या राजवाडयात दररोज जातात.
१९६२ मध्ये मी दिल्लीला जाण्यापूर्वी ते मुंबईला राष्ट्रपति या नात्याने, सरकारी पाहुणे म्हणून आले होते. त्याची जुनी आठवण त्यांनी काढली. माझे दिल्लीस जाण्याचे तेव्हा जाहीर झाले होते त्याचीहि त्यांनी आठवण दिली.
उद्यापासून दोन दिवसांची परिषद सुरू होणार. परिषदेचे कागदपत्र पाहण्यात आज बराच वेळ गेला. कोपनहेगनला पोहोचल्यानंतर पुढचे लिहिणार आहे.