महाराष्ट्रातील दुष्काळ - ३

पुरस्कार

शरद पवार
अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, (मुंबई)

'दुष्काळ आणि पाणी' ह्या महाराष्ट्राच्या आर्थिक समृद्धीविषयी मूलगामी चर्चा घडवून आणण्यात यशस्वी झालेल्या परिसंवादावर आधारलेली परिचर्चा आता ग्रंथ स्वरूपात महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन ह्या शीर्षकाखाली प्रकाशित होत आहे, ही अत्यंत आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे.  त्यातही विशेष म्हणून शेती, पाणी-व्यवस्थापन आणि विकास ह्या कामामध्ये ज्यांनी आपले जीवन प्रामुख्याने झोकून दिले त्या आदरणीय श्री. अण्णासाहेब शिंदे ह्यांनीच वेळात वेळ काढून, स्वतःच्या प्रकृतीची चिंताजनक स्थिती असतानाही महाराष्ट्राच्या चिंतनाची अधिक काळजी बाळगून, ह्या ग्रंथाचे संपादन कार्य नेटास नेले.  ह्याबद्दल प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या वतीने व व्यक्तिशः माझ्याही वतीने मी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो.

महाराष्ट्रातील विविध समस्यांचा मी जेव्हा विचार करतो, तेव्हा माझ्यापुढे गरीबी, बेरोजगारीचे प्रश्न उभे राहतात.  ही गरीबी व बेरोजगारी कुठे कुठे आहे ह्याचा मी विचार करून सगळ्या महाराष्ट्रावर नजर टाकतो तेव्हा मला महाराष्ट्रातील खेडी, तेथील शेती, शेती अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेली लक्षावधी कुटुंबे दिसतात.  त्यांची गरीबी कशी घालवून टाकायची ?  त्यासाठी काय केले पाहिजे ?  रिक्त हातांना कसे काम देता येईल ?  घरे कशी सुधारता येतील ?  हे सर्व प्रश्न मला भेडसावतात व सतावतात तेव्हा मी अधिक बारकाईने विचार करू लागतो.  आणि जाणवते की त्यांची शेती ही प्रचंड संख्या असलेल्या कुटुंबाचा बोजा सांभाळूच शकणार नाही.  इतकी ती क्षीण व दुबळी झालेली शेती आहे.  तिच्यावरील भार इतर उत्पादनांच्या क्षेत्रात व कामात गुंतवला पाहिजे; आणि शेती अर्थव्यवस्थेवरील धोरणे ठरवून पावले टाकली पाहिजेत.  महाराष्ट्रात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर आहेत हे सत्य असले तरीही ही सगळी कारखानदारी मर्यादित क्षेत्रात उभारलेली आहे.  राज्यातील फार मोठा भाग अशा कारखानदारीपासून वंचित आहे.  म्हणून विकेंद्रित स्वरूपात छोट्या, मोठ्या, मध्यम कारखानदारीचा विस्तार करून, अधिक हातांना काम देण्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि शेतीवरचा भार कमी करण्याचे प्रयत्‍न केले पाहिजेत.  ह्याचे आणखीही एक कारण आहे की शेतीमधील उत्पादन आणि इतर क्षेत्रातील उत्पादन ह्यामध्ये पुष्कळ फरक असतो.  औद्योगिक उत्पादन एकाच ठिकाण होऊ शकते.  तशी गोष्ट शेतीची नसते.  त्यामुळे औद्योगिक उत्पादन विरुद्ध शेती उत्पादन हा कलह नेहमी चाललेला दिसतो, त्याच्यात समन्वय आणणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रात काही अशी खेडी आहेत की ज्या ठिकाणी रोजगार हमी योजनेवर जायला माणूस मिळत नाही, कारण विकेंद्रित प्रकृतीच्या शेती उत्पादनाचा सर्वांगीण विचार करून, प्रत्येक हाताला काम मिळेल अशी आखणी तेथील शेती अर्थव्यवस्थापनाने केलेली आढळते.  श्री. अण्णासाहेब शिंदे ह्यांनी चिलीमधील फळ व्यापाराच्या समस्या एखादी कथा सहज ऐकवावी अशा पद्धतीने मांडून, फळशेतीच्या आवश्यकतेची चौफेर कैफियत शेतीच्या विकेंद्रित स्वरूपात महाराष्ट्रासाठ कशी पूरक आहे, हे स्पष्ट केले आहे.  जलव्यवस्थापनाबाबतचे केंद्रीय शासनाचे 'पाणी धोरण' मराठीत पहिल्यांदा उपलब्ध करवून देऊन, फार मोठे आधारभूत संदर्भसाहित्य मराठी भाषेत निर्माण केले आहे.  शेती आणि पाणी संबंधित प्रश्नांची साध्या, सोप्या व सरळ भाषेत श्री. अण्णासाहेबांनी दिलेली उत्तरे ही मराठीभाषी अभिमान्यांना आनंद देणारी घटना होय.  ह्या विषयांशी संबंधित विविध नकाशे विशेष प्रयत्‍नांनी तयार करून घेण्यात आले आहेत.  ही वैशिष्टये महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन ह्या ग्रंथाला एक वेगळा व चांगला दर्जा सहज मिळवून देतात.