प्रकल्प-नियोजन
४.१ जलसंपत्ती विकास प्रकल्प हे शक्यतोवर विविधलक्ष्यी प्रकल्प म्हणून विकसित केले जावे. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे त्या प्रकल्पाचे प्राथमिक ध्येय असावे. ह्या प्रकल्पामध्ये पाटबंधार्याद्वारा शेतीला पाणी, पुरांचे निःस्सारण, विद्युत-उर्जा निर्माण करणारे केंद्रे, जलवाहतूक मत्स्योत्पादन व मनोरंजन ह्या लक्ष्यपूर्तीचासुद्धा समावेश असावा.
४.२ प्रकल्प-नियोजनामध्ये, प्रकल्पाचे बांधकाम होताना होऊ शकणारे परिणाम, मानव-जीवनावरील परिणाम, वस्त्या व गावे ह्यांचे विस्थापनेचे किंवा सुस्थापनेचे प्रश्न, धंदे व व्यवसायावरील परिणाम, आर्थिक व अन्य परिवर्तने: हे सर्व विचार त्यात अन्तर्भूत केलेले असावेत.
४.३ कोणत्याही पाणी विषयक प्रकल्पाचे नियोजन करताना, त्याची कार्यवाही करताना आणि तो प्रत्यक्ष वास्तवात चालू करताना, वातावरण व पर्यावरण ह्यांच्यातील समतोल राखणे ही मूलभूत दृष्टी अंगिकारलेली असावी. काही विपरीत परिणामाची शक्यता जाणवल्यास तो परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि योग्य नुकसान भरपाई देण्याची तरतूद करावी.
४.४. पाणी प्रकल्प नियोजनात बसवताना एक सर्वसमावेशक आणि बहुमुखी दृष्टी मुळातच स्वीकारावी. नियोजन, आखणी, मान्यता, स्वीकृती, प्रकल्प कार्यवाही, पाणलोट क्षेत्रात स्वीकारायचे धोरण व प्रत्यक्षात अंमलबजावणी, वातावरण व पर्यावरणाची अंगे, प्रकल्प ग्रस्तांचे पुनर्स्थापन आणि पाणलोट क्षेत्राचा विकास-ह्या सर्व गोष्टी त्या दृष्टिकोनाची अंगे असावीत.
४.५ ह्या प्रकल्प योजनांपैकी काही प्रकल्प प्रयत्न करून आदिवासी व सामाजिक दृष्ट्या बहिष्कृत मानव समूह जेथे अधिक संख्येने असतील त्या परिक्षेत्रात अनुसूचित जाती व जमातींना विशेष लाभ मिळू शकेल ह्या हेतूने असे प्रकल्प संशोधून आरेखित केले जावेत. अन्य परिसरातही प्रकल्पाधिष्ठित नियोजन करताना अनुसूचित जाती व जमाती, तसेच सामाजिक दृष्ट्या दुर्बळ घटकांच्या गरजांची जाण ठेवली जावी.
४.६ पर्वतीय भागामध्ये पाणी-विषयक प्रकल्पांची योजना असताना पिण्याचे पाणी खात्रीपूर्वक मिळेत आणि शेतीसाठी पाणी-पुरवठा धोरण व जलविद्युत विकासाची शक्यता ह्यांचा तेथील खोल दर्या, कडेलोट उतार, प्रचंड वेगाने कोसळणारे पाणलोट आणि त्याबरोबर मातीचे आच्छादन धुवून टाकणारी जमिनीची धूप यांचा वास्तवाच्या संदर्भात विचार व्हायला पाहिजे. अशा प्रदेशातील प्रकल्पांमधील आर्थिक प्रश्न ही लक्षात घेतले जावे.
४.७ आपल्याकडील बहुतेक प्रकल्पांबाबत अनुभव असा आहे की ते वेळेवर पूर्ण न झाल्याने त्यांचे खर्च अमर्याद वाढतात. प्रकल्पांच्या अपेक्षित लाभात नंतर दोष आढळतात. म्हणून प्रकल्प तयार करताना उपयुक्ततेसंबंधी त्याची गुणवत्ता आणि कार्यवाही (व्यवस्थापन) मधील दर्जा उच्च राखला जावा. हे प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत आणि प्रादेशिक असमतोल दूर व्हावेत ह्या हेतूने प्रकल्पांच्या खर्चासाठी योग्य ती आर्थिक तरतूद आणि पैशाचा न साधनसामुग्रीचा पुरवठा वेळेवर करण्यात यावा.