ऋणानुबंध (92)

परंतु गांधीजींनी जो मार्ग स्वीकारला, तो अगदी वेगळा. सामाजिक, राजकीय, आर्थिक, इतकेच काय; परंतु धार्मिक, शैक्षणिक अशी वेगवेगळी क्षेत्रे त्यांनी अलग अलग मानली नाहीत. त्यांनी असा काही तरी संकलित, मूलभूत व मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला, की ज्यामुळे सर्वजण विस्मयचकित झाले.

टिळक व गांधी यांच्या विचारांमध्ये व कार्यपद्धतींमध्ये एक प्रचंड तफावत लोकांना भासू लागली असल्यास नवल नाही. गोखले यांना गांधीजी आपले 'राजकीय गुरू' मानीत होते. परंतु याबाबतही मला असे वाटते, की जर का गोखले आणखी जगले असते, तर अगदी थोड्या वर्षांतच गुरुशिष्यांच्या विचारधारांमध्ये कमालीचा फरक दिसू लागला असता. असो.

गांधींच्या रूपाने जेव्हा एक नवे, नव्या घाटाचे नेतृत्व उभे राहिले, तेव्हा गोखलेवादी किंवा टिळकवादी मंडळी गोंधळून जाणे स्वाभाविक होते. कारण तोपर्यंत राजकारणाचा व्याप हीच मंडळी सांभाळीत होती. गोखले पंथीयांपेक्षा टिळकपंथीय जनतेच्या अधिक जवळ होते, हे जरी खरे असले, तरी त्यांच्या चळवळीची रीतभात बरीचशी शहरी होती. त्यात शब्दांना, भाषेला व भाषणांना प्राधान्य होते. लोकमान्यांच्या हयातीत त्यांनी जे तेजस्वी स्वरूप राजकारणाला दिले होते, त्याचा साक्षात्कार टिळकपंथीयांच्या कार्यात येत नव्हता.

गांधीजींनी चळवळीच्या तंत्रामध्येच क्रांती केली. त्यांनी प्रत्येकाकडून कृतीची अपेक्षा केली व प्रत्येकाला जमेल, साधेल, अशी कृतीची साधना त्याला सांगितली. त्यामुळे गांधीजींच्या चळवळीत शिक्षित-अशिक्षित हा भेदच नष्ट झाला. किंबहुना, शिक्षित व्यक्तीने कोणताही अहंगंड बाळगू नये, यावर गांधींनी भर द्यायला सुरुवात केली. पोशाखातला थाट, इंग्रजी भाषेचा वापर, राहणीमानाचा दर्जा, इत्यादी ज्या गोष्टी सुधारणेची लक्षणे बनत होती, त्यांना गांधींनी कटाक्षाने रजा दिली. स्वत: ते इतका साधा पोशाख घालू लागले, की बॅरिस्टर असून ते एखाद्या शेतक-याप्रमाणे पोशाख घालत. या गोष्टीने गांधी व बहुजन-समाज यांच्यातील अंतर एकदम कमी झाले. पुढे तर ते पंचाच नेसू लागले व त्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांच्या शब्दांत सांगायचे, म्हणजे - 'भारतातील कोट्यवधी दरिद्री बांधवांच्या हृदयाचे दार त्यांना सताड उघडले गेले.' बहुजन-समाजात व तत्कालीन राजकारणी माणसांत जी दुर्लंघ्य दरी होती, ती एकदम बुजवली गेली. १९२२ साली त्यांच्यावर अहमदाबादच्या कोर्टात जो खटला झाला, त्या वेळी त्यांनी आपला व्यवसाय कोणता, हे सांगताना 'मी शेतकरी व विणकर आहे', हे उत्तर दिले. त्या वेळी सारा भारत या उत्तराने त्यांच्याकडे खेचला गेला. भारतात परतल्यापासून गांधीजी कधीही शहरात एखादे घर घेऊन व ऑफिस थाटून राहिले नाहीत. 'माझा भारत खेड्यात राहतो व मीही खेड्यात राहणार', असे ते म्हणाले.