तिस-या प्रलयंकारी युद्धाच्या तयारीला लागलेले भाईबंद बघून ती मोठी सचिंत झालेली दिसते. रक्तामांसाचा जेथे चिखल झाला आहे, तेथेच ती अधोमुख बसलेली आहे. तिच्या पुढ्यात तो धारातीर्थी पडलेला बाळ आहे. दर्शनार्थ येणा-या प्रत्येकाला ती सांगते :
'तो रक्ताळलेला तो चिखल पाहा आणि हा बाळ पाहा.'
तुम्ही माणसे सुखाच्या शोधात नाही, असे काहीसे ती म्हणते. इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी, असे ज्यांना वाटते, त्यांचे तोंड पाहण्याची तिची इच्छा नाही. जिथे गवताची काडी उगवत नाही, त्या भूमीत माणुसकीने मूळ धरावे, या आशेने ती त्या भूमीकडे पाहत अधोवदना राहिली आहे. इतिहासाची पाने उलटत आहेत. काळ पुढे चालला आहे. लेनिनग्राड, व्होल्गागार्ड येथे झालेले ज्यांनी अनुभवले, पाहिले, ते त्या रक्ताळलेल्या इतिहासाच्या पुनरावृत्तीची भाषा बोलत नाहीत. करुण किंकाळ्यांनी त्यांच्या कानांचे पडदे कायमचेच फाटले आहेत. भयंकर दृश्यांनी त्यांच्या डोळ्यांपुढे कायमची अंधारी आलेली आहे. नवी पिढी तशी आंधळी आणि बहिरी होऊ नये, म्हणून या अपंग कलावंताने हे स्मारक उभारले असावे, असे मला वाटले...
मी तेथून परत फिरू लागलो, तेव्हा त्या शूर कलावंताने मला थांबवले. माझ्या हातात एक वस्तू देऊन तो म्हणाला, 'ही व्होल्गागार्डची आठवण.'
रक्तामांसात भिजलेली ही मूठभर माती. मानुष आणि अमानुष याचा सारा इतिहास या मुठीत आहे. शांततेच्या चितेतील ते भस्म, त्या कलावंताची ती देणगी मी स्वीकारली आहे. हिमालयात भडकलेल्या चितेतील भस्म माझ्या संग्रही आहे. त्याच्याशी ही देणगी मिळतीजुळती आहे. गिरिजाशंकराला रोज ताज्या चिताभस्माची पूजा आवडते, हे मला माहिती आहे. 'व्होल्गा'ची ती माती - ते शांतिभस्म मी जपून ठेवले आहे. रशियातून मी आणखी एक आठवण मनाशी बांधून आणली आहे. जीवनाला जाग येण्यासाठी सत्संगती असावी लागते, असे म्हणतात. दोन 'माणसे' भेटणे ही गोष्ट मी क्षुल्लक मानीत नाही. एक क्षणाची सत्संगती. पण ती जीवनाचा अर्थ बदलून टाकते. यस्ना-पलाना (Yesnaya-Palyana) येथील टॉलस्टॉय यांच्या निवासस्थानी मला हा अनुभव आला.
मॉस्कोपासून सुमारे १३५ किलोमीटर्सवर हे नितान्तरम्य स्थान आहे. दुस-या महायुद्धाच्या वेळी सैन्याने हा भाग व्यापला होता, असे मला समजले. पण त्या वेळीही सत्संगतीचा परिणाम तेथेही घडलेला आढळला. सफल जीवनाची मशागत केलेली ही भूमी अतिशय शांत - अतिपवित्र. सोन्याच्या पिंपळाखाली ज्ञानदेवांनी ज्ञानसाधनेस बसावे, असे हे ठिकाण ! सभोवार गर्द वनराजींचे मनोहर तपोवन - या तपोवनात ऋषितुल्य टॉलस्टॉयने विश्वाचे चिंतन करण्यात साठ वर्षे व्यतीत केली. जेथे बसले, जेथे बोलले, जे लिहिले व जेथे लिहिले, ते सर्व जसेच्या तसे जिवंत आहे. त्यांतील प्रत्येक वस्तूतून टॉलस्टॉय प्रतीत होतात. त्यांच्या प्रभावी आणि गंभीर व्यक्तित्वाची साठवण या तपोवनातील वृक्षराजीने पुरेपूर केली आहे.