ऋणानुबंध (90)

महात्माजी व महाराष्ट्र

महात्मा गांधींच्या जीवनाचा व विचारांचा परिणाम महाराष्ट्रावर किती झाला, असा प्रश्न काही वेळा विचारण्यात येतो. परप्रांतीय मित्रमंडळी किंवा परदेशी अभ्यासक जेव्हा हा प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांच्या मनात तुलनात्मक दृष्टी असण्याचा संभव असतो. भारताच्या इतर प्रदेशांवर गांधीजीवन व गांधीविचार यांचा परिणाम किती कमी-अधिक प्रमाणात झाला, याचा संदर्भ त्यांच्या मनामध्ये असण्याची शक्यता असते. परंतु अशी तुलना करून पाहणे फारसे इष्टही नाही व शक्यही नाही, असे माझे मत आहे. कारण महात्मा गांधी जेव्हा भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर अवतरले, तेव्हा प्रत्येक प्रांताची पार्श्वभूमी वेगवेगळी होती. त्या संदर्भातच त्या त्या प्रांतावर गांधीयुगाचा किती व कसा परिणाम झाला, हे अजमावावे लागेल. ही गोष्ट सोपी नाही. म्हणूनच, महाराष्ट्राच्या बाहेरच्या किंवा महाराष्ट्रातील मंडळींनी 'गांधी व महाराष्ट्र' असा प्रश्न उपस्थित केला, की मी त्यासंबंधी, तुलनेचा विचार सोडून देऊन, महाराष्ट्रापुरते मला काय वाटते, काय जाणवते, तेवढेच सांगतो.

लोकमान्य टिळकांच्या निधनापूर्वी सुमारे पाच वर्षे आधी गांधीजींनी भारतातील आपल्या कार्याची सुरुवात केली. तो काळ असा होता, की टिळक हेच भारताचे सर्वमान्य, लोकमान्य दैवत होते. मंडालेच्या सहा वर्षांच्या कारावासानंतर ते नुकतेच परत आले होते. बदललेल्या परिस्थितीचा शोध घेत होते. जगात एक महायुद्ध सुरू झाले होते. जागतिक स्वरूपाचे असे हे पहिलेच युद्ध होते. युद्ध सुरू होऊन दोन-तीन महिने होतात, तोच गांधी आफ्रिकेहून भारतात येऊन पोचले. आफ्रिकेत बावीस वर्षे राहून आणि जगातील विचारवंतांचे व मुत्सद्द्यांचे लक्ष खेचून घेईल, अशा अभिनव स्वरूपाचे क्रांतिकारक कार्य करून, गांधी भारतामध्ये कायमचे राहण्यासाठी आले होते. नामदार गोखले यांच्या सूचनेवरून, काहीशा आग्रहावरून, त्यांनी आफ्रिकेतील कार्याची अखेरी केली होती व यापुढे भारत हीच आपली कर्मभूमी करावयाची, असा संकल्प केला होता. मात्र, ज्या गोखल्यांच्या सूचनेवरून ते भारतामध्ये आले, त्यांच्या निधनाची वार्ता त्यांना महिन्या-दीड महिन्यात ऐकावी लागली. गोखले यांच्या निधनामुळे 'गांधी व महाराष्ट्र' यांच्यात जो एक दुवा नियतीने निर्माण केला होता, तो एकाएकी निखळला.

१९१५ ते १९२० हा काळ भारतीय राजकारणातला फार महत्त्वपूर्ण घडामोडींचा काळ आहे. गांधीजींचा उदय या काळात व्हावा, ही गोष्टही फार अर्थपूर्ण आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य-प्राप्तीचा जो रस्ता दाखविला होता व जो वर्ग जागृत केला होता, त्यापेक्षाही पुढचे पाऊल टाकण्यासाठी गांधीजी सिद्ध होत होते. १९१७ मधील चंपारण्याचा लढा हे एक उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे.