ऋणानुबंध (87)

पण व्होल्गाच्या काठावरील स्मारक पाहिले आणि स्मारकाविषयीची माझी कल्पनाच साफ बदलून गेली. योद्ध्यांचे हे स्मारक - स्मारक कसले, ती एक निरंतरची लढाईच साकार झाली आहे. व्होल्गाच्या पात्रापासून 'ममई-हिल्स' चढू लागले की क्रमाक्रमाने आपला रणधुमाळीच्या धुमश्चक्रीत शिरकाव होतो... चिलखत घातलेले, संगिनी रोखलेले, रणगाडे पळविणारे, तोफा डागणारे, बॉम्ब फेकणारे, सरपटत जाऊन गोळ्या चालविणारे - एक ना दोन, हजारो हात तिथे सज्ज दिसतात. हजारो कलेवरे तिथे जमीनदोस्त होऊन पडली आहेत. मूर्तिमंत भीती आणि भयानकता यांचेच ते चित्रण आहे. पण एका महान कलावंताच्या कलावैभवाचे ते एक कोरीव लेणे बनले आहे. रणधुमाळी जशी झाली, तशी ती त्याने तेथे उमटविली आहे.

ई. वुचेत्ख हे त्या कलावंताचे नाव. पन्नाशीच्या उमरीतील हा कलंदर कलावंत वर्षानुवर्षे हे समरप्रसंग उभे करण्यात गढून गेलेला आहे. केवळ कुंचला चालविणारा हा कलाकार नाही. तो एक कुशल सैनिक आहे. दुस-या महायुद्धात या भूमीवर त्याने पराक्रमाची शर्थ केली आहे. बेभानपणे तो शत्रूवर तुटून पडला आहे. तेथील रक्तमांसाचा चिखल त्याने तुडविला आहे. स्वत: गंभीर जखमी झाला आहे. पण सुदैवाने वाचलाही आहे. कुशल हाताने तो लढाई खेळला, पोलादी हाताने त्याने शत्रूला यमसदनी पाठविले. पण कलावंत हाताची 'करणी' करून तोच आज समरप्रसंगाचा इतिहास चितारीत आहे. त्याच्या कलेला अंत नाही. त्याच्या कष्टाला सीमा नाही. त्याच्या कल्पनेला मर्यादा नाही. 'ममई-हिल्स्' चितारीत तो पुढे चालला आहे. कोठवर जाणार आहे, हे ठरलेले नाही. त्याचे सगेसोयरे, मित्र, आप्तस्वकीय, रणावर लढता लढता ज्या मार्गाने गेले, जेथवर गेले, त्यांचा मागोवा घेत घेत त्याची कला अशीच पुढे पुढे जात राहिली असावी.

पण तो पुढे चालला असला, तरी ती अमर्याद कला, एका ठिकाणी अमर करून ठेवण्यास तो विसरलेला नाही. त्या अमर कलेचे दर्शन त्याने स्वत:च मला घडवले. गंगेचा एक थेंब, पण त्यात तिचे सारे पावित्र्य सामावलेले असते; तशी ही त्याची चित्रकृती. रशियाची सारी मानवता आणि कारुण्य यांच्या मुशीतून ही अमरकृती प्रारंभीच्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे वर आलेली आहे.

एक रशियन माता, लेकराला मांडीवर घेऊन बसली आहे - लढाईत कामास आलेला तो तरणाबांड तरुण - त्याच्या अंगावर लष्करी पेहेराव आहे - त्याचे तोंड मात्र झाकलेले आहे. माता त्याला कुरवाळीत आहे... असे हे एक अगदी साधे दृश्य; मातेच्या चरणाशी जाऊन मी हे सर्व न्याहाळीत होतो... पण मला तेथे काही आवाज ऐकू आले. कोणी स्फुंदत होते, कोणी कुजबुजत होते, कोणी म्हणत होते, हा माझा राजहंस; कोणी म्हणत होते, हा माझा सखा. बंधू म्हणून कोणी त्याला साद घालीत होते, तर वीरपुरुष म्हणून कोणी त्याला वंदन करीत होते. मी दिङ्मुढ झालो, तो येथे ! कारण येथे येणा-या प्रत्येकाची तो कोणी तरी आपलाच आहे, अशी भावना होती. आणि ते खरे होते. दुस-या महायुद्धात, रशियातील घराघरांतील कोणी ना कोणी धारातीर्थी पडला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाख जिवांची बलिदाने झाली आहेत. मागे उरलेल्या ज्या पिढीला आपला पिता स्मरत नाही, भाऊ आठवत नाही, माता दिसत नाही, पुत्र गवसत नाही, त्या पिढीतील प्रत्येकजण येथे येऊन मूक बातचीत करतो. आणि लेकराला कुरवाळणारी ती माता... प्रत्येकाला मूक संदेश देते.