ऋणानुबंध (93)

या सा-या गोष्टींचा बहुजन समाजावर फार खोल परिणाम झाला, असे मला निश्चितपणे वाटते. त्यांच्या चळवळीमुळे महाराष्ट्राचा ग्रामीण भाग ढवळून निघाला, यात मुळीच शंका नाही.

गांधींच्या विचारांचा स्वीकार करण्यासंबंधी महाराष्ट्रातील शिक्षित समाजात त्या वेळी गट पडले होते, असे दिसून येते. टिळकांच्या पक्षातील काही मंडळी गांधींकडे खेचली गेली. शिवरामपंत परांजपे, काकासाहेब खाडिलकर, गंगाधरपंत देशपांडे, इत्यादी मंडळींनी असे मानले, की गांधीजींचे नेतृत्व हे टिळकांच्या कार्याची पूर्तता आहे. परंतु सर्वसामान्यपणे असे चित्र दिसते, की १९२० ते १९३० या दशकात गांधीजींना महाराष्ट्रात विरोध करणारी पिढीच शिक्षित समाजात अग्रभागी होती. काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव, आप्पासाहेब पटवर्धन, इत्यादी मंडळींना फार प्रतिकूल परिस्थितीत कार्य करावे लागत होते.

१९३० च्या दांडीयात्रेनंतर मात्र हे चित्र बदलू लागल्याचे दिसते. एक अशी नवी पिढी महाराष्ट्रात वर येत होती, की जिचे मन गांधीजींच्या क्रांतिकारक कल्पनांनी भारावले होते. या पिढीला गांधी - विचारांचे व तत्त्वज्ञानाचे मर्म उलगडून सांगण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या वेळी विनोबा भावे, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, काकासाहेब कालेलकर, दादासाहेब धर्माधिकारी, आदी मंडळी करीत होती व त्यात त्यांना बरेच यश आले, असे म्हणावे लागेल.

१९२९-३० नंतरच्या प्रत्येक सत्याग्रहात महाराष्ट्रात जे चैतन्य संचारत होते, ते कल्पनातीत होते. भारतातील इतर प्रांतांत गांधीजींसंबंधी जेवढे प्रेम, आदर असेल, तेवढाच त्या काळात महाराष्ट्रात निर्माण झाला होता, असे मी निश्चितपणे म्हणू शकतो. ज्या उत्कटतेने सारा देश त्यांच्या कार्यक्रमात व चळवळींमध्ये सामील होत होता, तीच उत्कटता महाराष्ट्रात दिसत होती. विशेषत:, महाराष्ट्रातील बहुजन समाजावर गांधीजींचा जो परिणाम झाला, तो अभूतपूर्वच होता. मी प्रत्यक्ष या गोष्टी पाहिल्या आहेत. 'महात्मा गांधी की जय' या गजराने गावेच्या गावे स्वातंत्र्याच्या भावनेने उद्दीपित होत असत. जात, धर्म, गरिबी-श्रीमंती, इत्यादी भेद लुप्त होऊन जात असत. गांधी हा एक सर्वश्रेष्ठ संतपुरुष आहे, अशी भावना सर्वांमध्ये निर्माण होत असे. गांधीजी ज्या प्रकारच्या त्यागाची अपेक्षा करतील, तो त्याग करण्यास हजारो माणसे पुढे येत असत.
 
आता हे खरे आहे, की माझ्या पिढीतल्या अनेक तरुणांना गांधीजींचे टकळीचे तंत्र किंवा रामनामावरचा त्यांचा जोर पटत नव्हता. परंतु हा मतभेद किरकोळ होता. परदेशी सत्तेशी झगडण्याचा जो मूलभूत दृष्टिकोन गांधीजींनी देशापुढे ठेवला होता, तो आम्हांला आकर्षित करीत होता. परकीय सत्तेशी सामना देता देता एका नव्या धर्तीचा माणूस व समाज भारतामध्ये निर्माण व्हावा, ही गांधीजींची दृष्टी होती. शतकानुशतकांमध्ये भारतात जसे मूलगामी कार्य झाले नव्हते, तसे हे कार्य होते. भारताच्या जागृतीचा एक नवा रस्ता प्रकाशमान केला जात होता.

सामाजिक समतेचा जो विचार गांधीजींनी मांडला, त्यामुळे तर बहुजन-समाज त्यांच्याकडे फार वेगाने आकर्षित होत गेला. माझ्या समजुतीने बुद्धानंतर एवढा क्रांतिकारक समतावादी विचार मांडणारा व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणारा गांधींशिवाय कोणीच झाला नाही. समाजक्रांतीचा नुसता विचार मांडणारे अनेकजण होऊन गेले, परंतु सामाजिक समतेसाठी एवढा जबरदस्त सामूहिक प्रयत्न करणारे आधुनिक काळात फक्त गांधीजीच होऊन गेले, हे मान्य करावे लागेल.