ऋणानुबंध (83)

शांति - चितेचे भस्म

दुनियेची सफर ही एक अपूर्वाई आहे. पल्लेदार प्रवासातील नावीन्य आजकाल संपलेले असले, तरी त्यातील नवलकथा मात्र वाढली आहे.

पूर्वी तालुक्याच्या, जिल्ह्याच्या गावाला जायचे म्हटले, तर किती लांबचा पल्ला ! आज मुंबईतला आणि दिल्लीतला माणूस काश्मीरच्या झाडावरील सफरचंद तोडण्यासाठी सहजगत्या जातो - मळ्यात जावे, तसे - आणि टोपलीभर ताजी फळे घेऊन येतो तितक्याच सहजतेने दूर देशीची आवक-जावक आज होत आहे. विलायतेला जाणे हा आता कोणाला पराक्रम वाटत नाही. सारा व्यवहार 'आला गेला मनोगती' झाला आहे. मारुतीने जन्मत:च सूर्यबिंबावर झेप घेतल्याची कथा हरिदासाच्या तोंडून लहानपणी मी ऐकली आहे. पण आज चंद्र-सूर्याजवळ जाऊन त्यांच्या रथाच्या घोड्यांना चापट मारून आलेला एखादा अंतराळ 'वीर-मारुती' स्वत:चीच कथा ऐकवतो. एवंच, पुराणातली वांगी आता पुराणात राहिलेली नाहीत; रशिया-अमेरिकेतील विज्ञानाच्या प्रदर्शनांत ती मांडून ठेवलेली आहेत. नव्हे, मी ती पाहून आलो आहे.

दोन आठवड्यांची ही सफर ! पाहणे, बोलणे आणि देणे-घेणे असा जमाखर्च रोजच सुरू होता.

मॉस्कोत उतरलो, त्या पहिल्या दिवशी, सोवियतचे संरक्षणमंत्री मार्शल मॅलिबोव्हस्कि इतर सीनियर मार्शल्स्, ऍडमिरल्स, जनरल्स् या वरिष्ठ लष्करी अधिका-यांचा परिचय आणि मॉस्कोचे निरीक्षण एवढेच घडले. सौ. चव्हाण बरोबरच होत्या. धावपळीच्या जीवनाचा त्यांना आता चांगला सराव झाला आहे.

लेनिनच्या समाधीच्या दर्शनापासून दुसरा दिवस सुरू झाला. मी दर्शनासाठी गेलो, तेव्हा माझ्या हातांत एक पुष्पचक्र होते. त्यावर लिहिले होते :

To the undying
memory of Vi Lenin
The great Soviet leader and
a friend of India.