माझ्या स्वभावात निसर्गाची ओढ. एकटे हिंडावे, डोंगरकडे चढावेत-उतरावेत, नदीच्या संगमावर बसावे आणि एकमेकांत मिसळून जाणारे आणि पुढे एकोप्याने, संथ गतीने चाललेले 'जीवन' पाहावे, असा एक छंद.
कराडपासून ताकारीपर्यंत आगगाडीने जायचे, असा एक छंद मी किती तरी दिवस केला. कराडपासून शेणोली मागे टाकले की ताकारी हे तिसरे स्टेशन. ताकारीला उतरायचे आणि गार्डाने हिरवे निशाण फडकवले, की सागरोबाच्या खिंडीचा रस्ता पार करून पुढे चाललेल्या गाडीकडे पाहत राहायचे. धाड धाड करीत समोरून चाललेली गाडी पुढे किर्लोस्करवाडीकडे (तेव्हाच्या कुंडल स्टेशनाकडे) लहान लहान होत जाताना दिसायची आणि अदृश्य व्हायची. गाडी तीच, तिच्यातून मी प्रवास केलेला; पण आपल्याला सोडून जात आहे, अदृश्य होत आहे, या दृश्याचा मनावर विलक्षण परिणाम होत असे. मनात उदासीनता दाटत असे. विलक्षण छंद. पण तो होता खरा. छंदामागे मनाने धावावे अन् मनाचा मागोवा घेत छंदाने पुढे यावे, असा तो काळ - तारुण्याचा, काही तरी करावे, अशा मनाचा.
प्रभातफेऱ्यांचा छंद सुरू झाला, तेव्हा मनाने काव्याचा छंद घेतला - काव्य करण्याचा. कँपजेलमध्ये सावरकरांच्या 'कमला' काव्याचे जाहीर वाचन आचार्य भागवतांनी केले होते. त्याचा परिणाम म्हणून असेल, पण एक दीर्घ-काव्य करावे, असे मनात उचंबळून आले. १९३२ मध्ये जेलमध्ये असताना, आपण काव्य लिहावे, असे ठरवले होते. सावरकरांच्या 'कमला' काव्याने या विचाराला गती मिळाली आणि काव्याच्या काही ओळी लिहिण्यापर्यंत प्रगतीही झाली. तो काळ तरुण मनाला खेचणारा होता. देशात स्वातंत्र्याचे वारे संचारले होते. क्रांतीचा वडवानल वाढत राहिला होता. माझ्या काव्याचा नायक होता एक तरुण. स्वातंत्र्य-चळवळीत स्वत:ला झोकून घेणारा ! शहरात एका महाविद्यालयात शिकत असलेला हा तरुण आपल्या गावाकडे, खेड्याकडे सुट्टीत आला होता. स्वातंत्र्याच्या चळवळीने त्याच्या मनाला खेचले होते. काही तरी आपणही करावे, अशा विचाराने भारावलेले ते तरुण मन. एक दिवस तो तरुण घरातून असाच बाहेर पडला. टिपूर चांदणे पसरलेले, निसर्ग न्हाऊन निघाला होता. डोंगराच्या एका सुळक्यावर बसून न्याहाळणा-या त्या तरुणाला स्वातंत्र्य-चळवळीसाठी आसुसलेल्या मनाने - विचाराने वेढले आणि त्याच्या भावना व्यक्त होऊ लागल्या. त्याच्या त्या भावना काव्यात अनुष्टुभ छंदात मी बांधू लागलो :
आकाशी फुलला बाग, तारका, चंद्रही, सुमे ।
स्त्रवतो रस तो त्यांचा, चंद्रिका मजला गमे ॥
बाहेर चांदण्याची बरसात आणि मनात काव्याची बरसात अशा मनाच्या धुंद अवस्थेत हे दीर्घकाव्य साकारू लागले. परवापरवापर्यंत या काव्याच्या ओळी जिभेवर होत्या. परिश्रमाने आजही त्यांना उजाळा मिळू शकेल. पण आताचा छंद वेगळा, त्या वेळचा वेगळा.