काही छंद : काही श्रद्धा
संस्कारक्षम मन असणे ही देणगी नियतीची ! विचारांचे, कृतीचे, साहचर्याचे मनावर परिणाम घडत राहतात. संस्कारक्षम मन हे साठवीत राहते आणि त्यातून माणूस घडतो. मी तरी घडलो. संस्काराने, विचाराने, साहचर्याने माणूस घडत असला, तरी माणसाला स्वत:विषयीचे ज्ञान पूर्णपणाने स्वत:लाच करून घेता येते, असे नव्हे. लोक काय म्हणतात, त्यावरून पुष्कळ अंशाने स्वत:विषयीचे ज्ञान घडत राहते. म्हणून लोकमानसाच्या काचेत आपले प्रतिबिंब कसे दिसते, ते पाहण्यासाठी माणूस इच्छा बाळगून असतो. तसा प्रयत्नशील राहतो.
माणसाचे जीवन हे बहुरूप्याचे जीवन आहे. अनेक रूपे तो जगतो. त्यांतली काही जगाला दिसतात. काही त्याची त्यालाच माहिती असतात. हे माझ्या बाबतीतच मी मानतो, असे नव्हे. प्रत्येक व्यक्तीलाच या अनुभवातून जावे लागते. मी त्याला अपवाद नाही. मी आणि माझे बाह्यरूप कसे आहे, हे खुलवून सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही. माझे ते रूप, मी आरशासमोर उभा राहिलो, की मलाही दिसते; परंतु माझे ते रूप मी समोर पाहत असताना लोकांना मी कसा दिसतो, वाटतो, याचेही मोजमाप माझे मन करू लागते. एखादा निर्णय करताना माणसाला स्वत:चा अनुभव, स्वत:चा विचार आणि त्या कार्याविषयीची निश्चिती लक्षात घेऊन निर्णय करावा लागत असला, तरीही त्याचा परिणाम काय होईल, याचा विचार मनाशी करावाच लागतो, आणि त्या परिणामाची किंमत द्यावी लागणार आहे, याचीही तयारी ठेवावी लागते.
विचाराशी प्रामाणिक, घट्ट राहून असे अनेक निर्णय मी केले. वादळी हवेत नौका पाण्यात बुडेल, हे समोर दिसत असताना, मला बोलावे लागले, निर्णय करावे लागले. सार्वजनिक क्षेत्रात जीवन घालविताना, अशा वेळी लोकमतात आपले रूप कसे दिसेल, याचा विचार क्रमप्राप्तच ठरतो. लोकमानसाच्या आरशात मी स्वत:ला पाहण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा टीकेचे, आरोपाचे वातावरण मनाला त्रास देते, यातना होतात. पण त्यातून सावरावे लागते. मन संस्कारक्षम असेल, तर असे स्वत:ला सावरता येते. टीकेविषयी, आरोपांविषयी प्रतिक्रिया देताना, कार्याची दिशा ठरविताना, आखणी करताना, संस्कारक्षम मनाला वैयक्तिक विचार राहत नाही. विचार करायचा तो सर्वांचा, हा संस्कार तिथे असतो. त्यामुळे टीकेने, आरोपामुळे मनाला यातना झाल्या, तरी कार्यापासून मी कधी विचलित झालो नाही, थांबलो नाही.