आजीचे हे शब्द ऐकले आणि कुणाला न सांगता, न विचारता मी धावत कुलसुमदादीच्या घराकडे पळालो. समोरच्या रस्त्यावर शुकशुकाट होता. अधूनमधून दगड पडतच होते. अबदुल्ला थंडपणे डोक्यावर धडधडणा-या आगीकडे पाहत उभा होता. आगीतील काही ढलपे आपल्या घराच्या छपरावर पडताहेत, हे तो बघत होता. पण त्याला काही सुचत नसावे. गुलबू अर्धवट झोपेतच होता. कुलसुम दादी शेळ्या सोडून मोकळ्या करण्यासाठी धडपडत होती.
मी तिच्याजवळ गेलो नि ओरडलो,
'आमची आजी तुला बोलावते आहे.'
ती काय म्हणते, इकडे लक्ष न देता मी तिला अक्षरश: ओढीत आमच्या घरी आणले. आग पहाटेपर्यंत बिनतक्रार धडधडत राहिली. कुलसुमदादीचा जीव शेळ्यांत अडकला होता. परंतु अबदुल्ला पाठोपाठ शेळ्याही घेऊन आला. कुलसुमदादीची झोपडी आगीत नष्ट झाली होती. पण ती, तिचा मुलगा, नातू आणि शेळ्या आमच्या अंगणात सुरक्षित होत्या.
सकाळी कुलसुमदादी माझ्या आजीला सांगत होती,
'आबई, ह्यो है किस्मतका खेळ. घर गेले, पण जान तरी बचला.'
त्या सुट्टीनंतर माझे आजोळला जाणे थांबले. ब-याच वर्षांनी आजी वारली, तेव्हा गेलो. आजी तर गेलीच होती; पण समोर कुलसुमदादीचे घर नव्हते आणि कुलसुमदादीही नव्हती. आजीसारखी तीही गेली होती आणि तिचा मुलगा, नातवंडे कुठे गेली, ते मात्र मला कोणी सांगू शकले नाही.
आमचे आजोळचे घर पडले, म्हणून मी परवा ऐकले, तेव्हा मनात ज्या अनेक स्मृतिचित्रांनी गर्दी केली, त्यांत मला कुलसुमदादीचा आवाज ऐकू येत होता, 'आबई, येसू कुठे है? मैं दूध लायी हूँ.'