ऋणानुबंध (41)

राजकारणात एखाद्याला नेतृत्व चिकटवून गुरु-शिष्यत्वाची परंपरा निर्माण करण्याची प्रथा अलीकडे मूळ धरू लागली आहे. राजकारणात गुरु-शिष्याची परंपरा मला मुळीच मान्य नाही. कित्येकदा त्याच्या आड स्वार्थ दडलेला असतो, असे आढळते. राजकारणात 'अमुक एक' असा कोणी गुरू मी माझ्यापुरता मानीत नाही. अनेकांकडून मी अनेक गोष्टी शिकलो. अजूनही शिकेन. मी जी मोठी माणसे पाहिली, त्यांची मी मनाने पूजा बांधली, त्यांच्या विचारांचे, संस्कारांचे मनावर परिणाम झाले. संस्कारक्षम मन अनेक गोष्टी शिकण्यासाठी खुले असते. तसे ते असले पाहिजे. माझ्या स्वत:वर अनेकांच्या विचारांचे, साहचर्याचे उपकार आहेत. त्यांच्यातून पुढेही आणखी शिकावे लागेल, ही माझी धारणा आहे.

या विचारांचा, संस्कारांचा, साहचर्याचा मागोवा घेत घेत काही कर्तृत्वही माझ्याकडून घडले. माझ्याकडून जे झाले, ते कमी झाले, असे मी मानीत नाही; परंतु कर्तृत्वाला संपूर्ण संधी मिळालीच, असेही मानीत नाही. 'तुम्ही जे कर्तृत्व दाखविले, त्यातून, मनाशी जे ठरवले होते, त्याचे सार्थक झाले का?' असेही मला मध्यंतरी एकाने विचारले. 'सार्थक ब-याच अंशाने झाले', असे माझे त्याला उत्तर आहे. सार्वजनिक ध्येयाची, वैयक्तिक जीवनातली सार्थकता झाली. पण ती पूर्ण झाली, साकार झाली, असे नव्हे. प्रारंभीच्या काळात, तरुणपणी परकीय राज्यासंबंधी मनात तिडीक होती. परकीय राज्य गेले. ते एक सार्थक झाले, असे वाटले. पण त्या तिडकीबरोबरच, ज्या वातावरणात आम्ही वाढत होतो, त्या दुखणा-या हिंदू समाजातील उच्च-नीचपणामधील विषमता, गरीब-श्रीमंत, महात्मा फुले यांचे विचार, या बाबतींत फार काही करू शकलो नाही. हा अपुरेपणा, त्याची तीव्र जाणीव, विफलतेची भावना आजही बोचते. म्हणूनच कर्तृत्वाचे पूर्ण सार्थक झाले नाही, असे वाटते. अर्थात हे बदल चुटकीसरशी किंवा कायद्याने घडून येणारे नाहीत. तो एक लांब पल्ल्याचा प्रवास आहे, हेही खरेच. पण ते अपूर्णतेचे शल्य मनात असूनही, त्या अंगाने विचार सुरू झाला याचे आणि परिस्थिती वेगळे वळण घेत आहे, याचे समाधान आहे. सार्थक त्या मर्यादेतच आहे, हे सार्थक पूर्णत्वाप्रत पोचवायचे तर या विषमतेबाबत तिडीक निर्माण करणारी कार्यकर्त्यांची फार मोठी फळी निर्माण करावी लागणार आहे. आजवर आम्ही ती करू शकलो नाही. शहरी किंवा ग्रामीण भागात काय, विकासाच्या कामाचे, निवडणुकीचे महत्त्व लोकांना पटते. लोक त्यात स्वत:ला मोठ्या प्रमाणात गुंतवून घेतातही. परंतु विषमता दूर करण्याच्या कामाला ते कमी महत्त्व देत आहेत. त्यांना ती जाणीव तीव्रतेने करून देण्याचे काम करावे लागणार आहे.

मी तसा सश्रद्ध मनुष्य आहे. कामावर, विचारावर माझी नितांत श्रद्धा आहे. महात्मा गांधींच्या काही गोष्टींसंबंधी माझ्या मनात शंका असत. पण त्यांचे काम करण्यावर माझी जबरदस्त श्रद्धा होती. काम करणे एवढेच माहीत होते. प्रश्न विचारणे बंद होते. कारण ते काही चुकीचे सांगणार नाहीत, हिताचेच सांगणार आणि तेही समाजाच्या हिताचे, अशी ती श्रद्धा होती.