सुरुवातीला विद्यार्थिदशेत असल्यापासून मी समाजकारणात शिरलो. सार्वजनिक कामांत रस घेऊ लागलो किंवा नंतर राजकारणाला वाहून घेतले. त्यामागे घराण्याची काही मोठी परंपरा आहे, असे मला म्हणता येणार नाही. एक गोष्ट खरी, की त्या काळातल्या देशातल्या वातावरणाचा परिणाम माझ्या संस्कारक्षम मनावर घडला. घरातले वातावरण तसे सुसंस्कृत. थोरले बंधू - गणपतराव - सार्वजनिक कामांत रस घेणारे. घरात सार्वजनिक कामाचे वातावरण. आई माझी, पण सारेच तिला आई म्हणत. सर्वांवर तिचे मुलांसारखे प्रेम. मी पितृवंचित. परिस्थिती तोकडी, पण आईचे मन श्रीमंत. आईने मला विचारांची श्रीमंती दिली. संस्कारांची दिली. माणुसकीची दिली. परिस्थितीच्या चक्रव्यूहात सापडलेली आई, चक्रव्यूहातून बाहेर कशी पडते, हे लहानपणापासून पाहिले. मी स्वत:लाही अनेकदा चक्रव्यूहात सापडून घेतले, पण त्यातून बाहेर पडायचे, तर त्यासाठी आईच्या सहवासासाठी धाव घ्यावी, असे वाटे. तिच्या पवित्र सहवासाचा परिणाम असेल कदाचित, पण चक्रव्यूहातून मी बाहेरही पडलो. आपण कोण व्हावे, काय व्हावे, या चक्रव्यूहातून लहानपणी, विशेषत: विद्यार्थिदशेत असताना, प्रत्येकजण फिरत असतो. घराण्यात मोठेपणाचा वारसा असला, तर तो मोठेपणा शाबूत ठेवण्यासाठीही धडपडत असतो. आईवडील हे आपल्या घराण्याचा मोठेपणा मुलाने टिकवावा, यासाठी काही आखणी-जुळणीही करीत राहतात. कधी तसे घडते, कधी घडत नाही. मी लहानपणाचा जेव्हा विचार करतो, तेव्हा माझ्याभोवती तसे मोठेपणाचे काहीच नव्हते. तसा कुणाचा आदर्शही नव्हता. त्यामुळे असेल कदाचित, 'काय व्हावे', याची स्वप्ने मला कधी पडली नाहीत. तसा हिशेबही कधी केला नाही; परंतु काय व्हावे, यापेक्षा 'काही तरी करावे', यासाठी मात्र मनाची बेचैनी असायची.
देशात त्या काळी पुष्कळ घडत होते. त्या घडण्यात आणि घडविण्यात आपण काही तरी करावे, या भावनांची ऊर्मी मनात साठत होती. खेड्यातल्या खेड्यात का होईना, काही बोलावे, कामात भाग घ्यावा, व्याख्यान द्यावे, लिहावे, वाचावे, लोकजागृतीचे उत्सव करावेत, लोकांना बोलवावे, लोकांना एकत्र करून काही ऐकवावे, त्यांच्यासाठी गाणी लिहावीत, अशा त्या भावना. स्वत:ची तयारी म्हणूनही वाचावे, बोलावे, लिहावे, असे सारखे मनात येत असे; आणि त्यातूनच मग, गणेशोत्सव, शिवजन्मोत्सव सुरू केले आणि गणेशोत्सवासाठी मेळे उभे केले. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरू केले होते. सावरकर जिवंत काव्ये लिहीत होते आणि ती ऐकताना लोकांमध्ये जिवंतपणा येत होता. विद्यार्थिदशेत तशी काव्ये मी वाचत होतो. व्याख्यानस्पर्धांत आणि निबंधस्पर्धांत भाग घेत होतो. लोकमान्य टिळकांवरील निबंधस्पर्धा आमच्या शाळेत व्हायच्या, त्यांत मी भाग घेत असल्याने, त्या विषयावरील वाचनही होऊ लागले. सांधा बदलून जीवनाची गाडी राजकारणाच्या रुळांवरून धावू लागल्यापासून उसंत कशी ती मिळेनाशी झाली आहे. आता जुने छंद आठवायचे, एवढेच करता येते. राजकारण करावे, म्हणून सार्वजनिक कामाला मी सुरुवात केली, असे नव्हे. तशी धारणाही नव्हती. पण राजकारण केले आणि करीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र राजकारण करतानाही, राजकारण हेच संपूर्ण जीवन आहे, असे मी मानले नाही. आजही मानीत नाही. राजकारण विसरून इतर प्रकारच्या जीवनात संपर्क साधावा, विचार करावा, असाही प्रयत्न मी केला आहे. केवळ राजकारणवादी जीवन असे काही असू शकत नाही. ज्यामध्ये रस घ्यावा आणि चैतन्याची प्राप्ती करून घ्यावी, अशी जीवनाची अनेक क्षेत्रे आहेत. कला आहे, साहित्य आहे, संगीत आहे, विविध खेळ आहेत, नाट्य आहे, अशी पुष्कळ क्षेत्रे आहेत.