मी दहा-अकरा वर्षांचा असेन. मला आठवते, कुलसुमदादीची आमच्या घरी ये-जा असे. चांगलीच वर्दळ असे म्हटले, तरी चालेल. सकाळ-संध्याकाळ काही तरी मागायला-द्यायला-सांगायला कुलसुमदादी आली नाही, असे कधीच झाले नाही. तिला बोलायची मोठी हौस. मुलाच्या अगदी विरुद्ध. तिची भाषाही मोठी ठसकेदार असे. ग्रामीण मराठी व त्यात अधूनमधून स्थानिक मराठीचे रूप घेतलेले उर्दू शब्द. त्यामुळे तिचे बोलणे फार उठून दिसे. मला तिचे बोलणे ऐकण्याला फार आवडे. 'आबई' - माझ्या आजीचे नाव - असा पुकारा करीतच ती घरात शिरत असे; आणि ती आली, की मी माझ्या आजीला बिलगून त्यांचे बोलणे ऐकण्यात रममाण होत असे. बोलण्यात गावच्या सर्व कहाण्या असत. तिने कधी, आपल्याला काही आहे-नाही, याबाबत तक्रार केल्याचे मला आठवत नाही; पण वाईटाला वाईट म्हणून सांगताना फटकारून बोलायची. माझी आजी तिला सांगायची,
'कुलसुम, आपण गरीब माणसं, दुस-याबद्दल असं कशाला बोलायचं?'
तर ती म्हणे,
'तो क्या हुआ? अगं आबई, जे वंगाळ, ते वंगाळच.' आणि माझ्याकडे वळून म्हणायची, 'क्यूं, बेटे, अपनेकू किसका डर है?'
- आणि जशी यायची, तशीच वा-यासारखी निघून जायची.
अशा संभाषणानंतर माझी आजी खळखळून हसायची आणि म्हणायची, 'काय करावं कुलसुमला? पहिल्यापासून ही आहे तशीच आहे.'
चैत्र-वैशाखात सुट्टीच्या दिवसांत मी आजोळी जाई, तेव्हा दिवसाचा काही वेळ तरी कुलसुमदादीच्या अवतीभोवती गेला नाही, असे कधीच झाले नाही. अबदुल्ला कष्ट करून मिळवे, त्यावर त्यांचा संसार चालू होता. झोपडीवजा छोटेसे घर. दाराशी चार शेळ्या. चुलीच्या अवतीभोवती मांडलेली कल्हई केलेली चार स्वच्छ भांडीकुंडी. हा त्यांचा संसार होता. त्यात कसली गुंतागुंत नव्हती की गडबड नव्हती. 'हवं-हवं, नाही-नाही,' नव्हते. असंतुष्ट दिसे, तो थोरला नातू - यासीन की युसुफ. इतर मुलांच्या बरोबर कधी कधी मीही म्हस्के देखभाल करीत असलेल्या सोनहि-याच्या काठच्या आमराईत जात असे. वेळ कसा जात असे, ते कळत नसे. मला आठवते, एक दिवस कुलसुमदादीचा हा मोठा नातू मला विचारू लागला, 'अरे भाई, तुमी तर शहरात राहता. इंग्रजीबी शिकणार म्हणता, पण तुमचा रुबाब तर मला तसा दिसत नाही, तुमच्या हातात साधा रिष्टवाच पण नाही. पण बगून ठेवा. हम बंबई जानेवाले हैं. कोण -हातो या आष्ट्यात शेळ्या राखायला? बंबई जाके मौला बनेंगे. फिर क्या कम है ? इराण्याच्या हॉटेलात चाय-रोटी खायची. केस राखायचे. मस्त कपडे पहनायचे. दोस्तांना काय कमी आहे तिथे? रात्री हवेशीर फूटपाथवर बिछाना टाकला, की गेला दिवस.'
तो अस्वस्थ जीव आपले स्वप्न सांगत होता. पण खरा अस्वस्थ झालो मी. मी मुंबई पाहिलेली नव्हती. पण मुंबईच्या मवाल्यांचा लौकिक कानांवर होता. मी त्या रात्री कुलसुम दादीला हे सर्व सांगितले. ती शांतपणे म्हणाली, 'उसकी किस्मत उसके साथ. तो आपल्या बापाच्या चालीवरच जाणार, दुसरं काय? माझा गुलबू माझ्या लेकीसारखा आहे.'