माता, भगिनी, कन्या व पत्नी अशा अनेक नात्यांनी ज्या निरनिराळ्या व्यक्तिरेखा रामायणात आल्या आहेत, त्या वर्णन करताना बुवा रंगून जात असत, आणि जगात वागताना कोसळणा-या संकटांवर मात करण्यासाठी काही व्यावहारिक उपदेश नकळत त्यांच्या प्रतिपादनातून श्रोत्यांना मिळत असे. संसारात राहून, आपल्या शुद्ध चारित्र्याने व कर्तव्यनिष्ठेने स्त्री-जीवनाचे आदर्श निर्माण करणा-या स्त्रियांचा जो वर्ग रामायणात वर्णिला आहे, तो ऐकताना आई समरस होऊन जात असे. संसारत्याग करून तपश्चर्येसाठी वनवास पत्करणा-या ब्रह्मवादिनी स्त्रियांच्या आदर्शांपेक्षा तिला तो मोलाचा वाटत असला पाहिजे. रामायणातल्या या संस्कारांचा परिणाम तिच्या मनावर अखंड घडला होता. त्यामुळे प्रत्येक संकटात ती प्रथम घाबरली, गांगरली, दु:खी झाली तरी पण नंतर तिने स्वत:ला सावरले आहे आणि एखाद्या असामान्य स्त्रीने जी आदर्श प्रतिक्रिया अशा संकट-प्रसंगात दिली असती, तीच तिने पुढे आमच्या आयुष्यात दिली आहे.
एकोणीसशे तीस-बत्तीसमधील चळवळीच्या वेळचा एक प्रसंग. कराडच्या शाळेत मी शिकत होतो. त्या वेळी म्युनिसिपालिटीवर राष्ट्रीय झेंडा लावायचा आणि शहरात चळवळींची पत्रके चिकटवायची, असा एक बेत ठरला. त्याचे पुढारीपण माझ्याकडे होते. बेत पक्का होताच त्याची आखणी केली आणि एक दिवस 'वंदे मातरम्'च्या घोषणा करीत म्युनिसिपालिटीवर राष्ट्रीय झेंडा फडकवला. आम्हा शाळकरी मुलांच्या या कृत्याने गावात खळबळ उडाली आणि प्रत्येकाच्या तोंडी तोच एक विषय झाला. चळवळ धगधगू लागल्याने त्या वेळचे साम्राज्यशाही सरकार खवळले होते. गावभर पत्रके लागून म्युनिसिपालिटीवर झेंडा फडकताच दडपशाहीस प्रारंभ झाला व धरपकड सुरू झाली. मी पकडला गेलो आणि मला शिक्षाही ठोठावण्यात आली. तो दिवस शनिवारचा होता. आमच्या शाळेतील मास्तर मंडळी गडबडून गेली होती. कोणाकोणावर तोहमत येते, या शंकेने मंडळी भयाकुल झाली होती.
शिक्षा ठोठावल्याच्या तिस-या दिवशी म्हणजे सोमवारी माझी येरवडा जेलमध्ये रवानगी होणार होती. चांगली पंधरा महिन्यांची शिक्षा माझ्या वाट्यास आली होती. माझ्या एका शिक्षकांना हे समजताच ते आमच्या घरी गेले आणि मला भेटण्यासाठी आईला घेऊन आले. तो रविवारचा दिवस होता. फौजदार कचेरीतून मला बोलावणे आल्याने मी पोलिस-पहा-यात तिथे गेलो. फौजदार बसले होते. आई आणि माझे मास्तरही तिथे होते. मला पाहताच आईचे डोळे पाणावले. मी एक लहान पोर. पंधरा महिन्यांची शिक्षा झालेली - तीही त्या काळातली ! आईचे मन पिळून निघणे साहजिक होते. मास्तर सांत्वन करू लागले आणि बोलता बोलता मला म्हणाले,
'फौजदारसाहेब दयाळू आहेत. माफी मागितलीस, तर सोडून देईन, म्हणतात !'
'काय बोलता तुम्ही, मास्तर ? माफी मागायची?' आईने मास्तरांना परस्परच फटकारले, आणि माझ्याकडे बघून ती म्हणाली, 'माफी मागायचं कारण नाही. तब्येतीची काळजी घे, म्हणजे झालं. ईश्वर आपल्या पाठीशी उभा आहे.'
आई हे बोलली आणि उठूनही गेली.
आईच्या या गुणाचा अभिमान हृदयात ठेवूनच मी तुरुंगात पाऊल टाकले. मला कधीच कशाची फिकीर वाटली नाही.