ऋणानुबंध (145)

ना. सी. फडके यांचे आत्मचरित्रही मी आवडीने वाचले. ते माझे आवडते प्राध्यापक आहेत. कमलाबाई तर आमच्याच वर्गात होत्या. त्यामुळे ते आत्मचरित्र वाचताना काही  Nostalgia ची भावना येऊन जाते. अलीकडच्या आत्मचरित्रांपैकी हंसा वाडकर, आनंदीबाई शिर्के, स्नेहप्रभा प्रधान, आनंदीबाई विजापुरे, आनंद साधले, जागीरदार, इत्यादींची आत्मचरित्रे मी वाचली किंवा चाळली आहेत. कमी-अधिक प्रमाणात ती सर्वच मला आवडली. लक्ष्मीबाई टिळकांच्या 'स्मृतिचित्रां'शी जरी त्यांची तुलना करता आली नाही, तरी ती अधिकाधिक प्रामाणिक होऊ पाहत आहेत, असे मला वाटते. उदाहरणार्थ, डॉ. शिरोडकर व स्नेहप्रभा प्रधान या दोघांचाही चांगला परिचय असूनही त्या दोघांमधील निष्कलंक, पण मनस्वी स्नेहाची कल्पना नव्हती. तशीच ती कदाचित इतरही अनेकांना नसणार. पण स्नेहप्रभाबाईंनी मोकळेपणाने त्या स्नेहाला मुखरित केले आहे. आनंदीबाई विजापु-यांनीही मोकळेपणाने लिहिले आहे. आत्मचरित्र वाचताना ती व्यक्ती व तिची घडण, सहानुभूतीने समजून घेण्याच्या भूमिकेने मी वाचत असतो. आत्मचरित्रे वाचताना वाचकांनी नैतिक न्यायाधीशाची भूमिका न घेणे बरे, या विचाराचा मी आहे.

अलीकडच्या आत्मचरित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, आपले बालपण व तरुणपण यांबाबत ती अतिशय पारदर्शक, प्रामाणिक असतात. पण अलीकडच्या चालू काळाबाबत मात्र ती अतिशय सावध असतात. अर्थात याबद्दल मी त्यांना दोष देत नाही. कारण ही सावधानता समजण्यासारखी आहे. शिवाय एखाद्या माणसाच्या अगदी खाजगी जीवनात डोकवावयाची उत्सुकता मला वाटत नाही. तो माणूस खाजगी जीवनात कसा होता, याच्याशी वाचक म्हणून माझा काही संबंध आहे, असे मला वाटत नाही. तो ज्या वैशिष्ट्यांमुळे नावारूपाला आला, त्यांबद्दल त्याने तपशीलवार लिहावे, एवढीच माझी अपेक्षा असते व ती पूर्ण झाली, की मला समाधान वाटते. सगळीच माणसे गांधीजी, रसेल यांच्याइतकी महान कशी असू शकतील? तशी अपेक्षाच करणे चूक आहे, असे मला वाटते.

शिवाय सगळ्यांनाच घडलेल्या घटनांचे सूक्ष्म विश्लेषण करता येणे शक्य नसते. त्यासाठी कलावंताची विशेषत: साहित्यिकाची स्वयंविश्लेषणाची व आविष्काराची सवय असावी लागते. म्हणूनच कलाकारांची आत्मचरित्रे अधिक अंतर्मुख, तर राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांची आत्मचरित्रे सामान्यत: अधिक बहिर्मुख असतात, असा अनुभव येतो. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आत्मचरित्रांतून खूप माहिती मिळाली, तरी कलावंतांची आत्मचरित्रे चटका लावून जातात. उदाहरणार्थ, हंसा वाडकर यांचे आत्मचरित्र. विशेषत:, मराठवाड्यातील एका खेड्यात त्यांनी काढलेली दोन-तीन वर्षे व एका मॅजिस्ट्रेट महाशयांनी त्यांच्यावर आणलेले निर्लज्ज संकट याची स्मृती मनाला अस्वस्थ करून जाते.