ऋणानुबंध (147)

आवड निवड

मी १९७६ साली काय वाचले नि त्यात महत्त्वाचे वा आवडलेले असे काय होते, हे पुन्हा एकदा मागे वळून पाहणे हा या लेखाचा उद्देश आहे. तसे म्हटले, तर विषय मनोरंजक आहे; पण सोपा नाही. माझ्याबाबतीत तो सोपा नाही, याचे कारण मी एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांवरील
चार-पाच पुस्तकांचे अदलून-बदलून वाचन चालू ठेवतो. त्यांतील सर्वच पुस्तके पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एकसूत्र वाचतोच असे नाही. आवडलेले विभाग वा प्रकरण संपूर्ण वाचतो, तर काही प्रकरणे चाळून होतात. विषयाचे वा कथेचे सूत्र धरून शेवटपर्यंत पोहोचावयाचे, हा हेतू ! ज्या विषयाची किंवा विचाराची चर्चा पुस्तकात असेल, त्याची धावती धार सुटणार नाही, याची मात्र काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे काही पुस्तके अक्षर नि अक्षर वाचून होतात. किंबहुना मधूनमधून पुन्हा पाठीमागे जाऊन त्यातील विचाराचा धागा तपासून पाहून चिंतन करावेसे वाटते. काही पुस्तकांचे वाचन संथपणे होते, तर काही भर वेगात संपून जातात. नित्य वाचणे हा ज्यांचा स्वभाव किंवा काम असेल, त्या सर्वांना कदाचित असेच करावे लागत असेल, असे मला वाटते. इतरांचा अनुभव वेगळाही असेल, पण माझे वाचन मात्र असे चालते, हे कबूल केले पाहिजे.

पुस्तकांच्या विषयाबाबत बोलावयाचे झाले, तर मी म्हणेन, की विषयाची आवड नि निवड ही त्या त्या वाचकाच्या व्यक्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. इतिहास, राजकारण व वाङ्मय हे माझ्या व्यासंगाचे विषय आहेत. पुस्तकांची निवड या मूळ जिव्हाळ्यातून निर्माण होते. या विषयांशी संबंधित व्यक्तींची चरित्रे त्यामुळे माझ्या वाचनाचा हटकून विषय असतो. याचमुळे की काय, दुसरे महायुद्ध हा एक माझा असाच आवडता वाचनाचा विषय आहे. दुस-या महायुद्धाने जगाच्या राजकीय नकाशाची पुनर्रचना केली. त्यामुळे अनेक राजकीय, आर्थिक व लष्करी प्रश्नांचा विचार सुरू झाला, की त्यांची मीमांसा करणा-यांना दुस-या महायुद्धापासून आपल्या विषयाची सुरुवात करावी लागते. त्यामुळे हे युद्ध संपून तीस वर्षे पूर्ण झाली, तरी अजूनही त्याच्या विविध अंगांचा विचार करणारी व नवी माहिती सांगणारी नवी नवी पुस्तके प्रसिद्ध होतच असतात आणि ती शोधण्यात मला आनंद वाटतो. या युद्धाचा इतिहास, त्याच्याशी संबंधित नेत्यांचे स्मृतिग्रंथ, लष्करी घडामोडींच्या पाठीमागेचे रोमहर्षक प्रयत्न, या युद्धाच्या सुरुवातीची व शेवटाची अनेकांनी केलेली वेगवेगळी मीमांसा हे सर्व अत्यंत वाचनीय वाङ्मय आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर किती तरी कादंब-याही प्रसिद्ध झाल्या आहेत. पुन्हा पुन्हा ज्यांची आठवण होते, अशा नितांतसुंदर कादंब-यांपैकी काही या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या आहेत.

इतिहास आणि राजकारण हे एकमेकांच्या हातात हात घालून चालणारे विषय आहेत. राजकारणाच्या रामरगाड्यात उभे जीवन गेले. त्यामुळे आवड म्हणून आणि काम म्हणूनही या विषयावर सतत वाचीत असतो आणि वाचत राहावे लागले. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडी व वैचारिक आंदोलने यांबाबतीत अद्ययावत राहावयाचे असेल, तर 'नित्य वाचीत जावे' हा मंत्र स्वभाव बनावा लागतो. या वाचण्यात लेख असतात, छोट्या पुस्तिका असतात आणि मोठे ग्रंथही ! पुष्कळ वेळा एखादा लेख ग्रंथाचे समाधान देऊन जातो. कधी कधी ग्रंथ वाचल्यानेही जे हवे ते मिळत नाही, ते दहा-पंधरा पानांच्या लेखाद्वारे क्वचितच पण सहज मिळून जाते.