ऋणानुबंध (140)

पण असे व्हावयाचे असेल, तर मराठी वाङ्मयातील उत्कृष्ट कृतींचे रूपांतर हिंदीमध्ये व्हावयास पाहिजे. अलीकडे वि. स. खांडेकर यांच्या कादंब-या मोठ्या प्रमाणात हिंदीमध्ये भाषांतरित केल्या गेल्या. तसेच अलीकडे विजय तेंडुलकर-खानोलकर यांच्या नाटकांची रूपांतरे हिंदी रंगभूमीवर येत आहेत. त्यात खरी प्रादेशिकता कमी असते. ती नव्या सामाजिक परिस्थितीची प्रातिनिधिक नाटके आहेत. कारण नागरी जीवनातील मध्यमवर्गाच्या समस्या नव्या औद्योगिक संस्कृतीमुळे भारतात सर्वत्र सारख्याच आहेत. त्यांचे प्रतिबिंब त्यांत आढळते. सत्यजित रे यांचे चित्रपट हे भारतीय चित्रपट मानले जातात. कारण त्यांत आधुनिक भारतीय मन:प्रवृत्तीचे व भारतीय समाजाचे प्रतिबिंब असते. तेव्हा प्रादेशिक भाषेत लिहिले गेलेले साहित्य हे राष्ट्रीय साहित्य असते व ते केवळ भौगोलिक अर्थाने नव्हे, तर त्यातील अंतरंगावरूनही ते साहित्य भारतीय ठरावे. मला वाटते, की मराठी साहित्याला या दोन्ही दिशांनी स्वत:चा विकास करावा लागेल. भारतीयता, विश्वात्मकता व मराठीपणा हे तिन्ही गुण एकाच वेळी नांदले, तर ते साहित्य समृद्ध होईल. त्यात भिन्नरुचित्व येईल. इंद्रधनुष्याची प्रभा त्यावर पसरेल.

मराठी राज्याचा संसार १९६० साली सुरू झाला. पण त्यामागची मराठी भाषकांच्या एकीकरणाची ओढ अशा साहित्य संमेलनांतून निर्माण झाली. १९०८ सालच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव वैद्यांनी या एकीकरणाचा उल्लेख केलेला मला आढळला. तेव्हा महाराष्ट्राच्या एकीकरणाशी या संमेलनांचा निकटचा संबंध आहे. म्हणून आपण महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून गेल्या पंधरा वर्षात नेमके काय साध्य केले, काय करायचे आहे, याचा काहीसा आढावा या संमेलनाच्या निमित्ताने मी घेतला, तर तो उपयोगी पडण्यासारखा आहे.

पूर्वीच्या अध्यक्षांची भाषणे वाचत असता महाराष्ट्र विद्यापीठ, मराठी भाषेची (ऍकॅडमी) या सर्वांचा उल्लेख पूर्वीच्या अध्यक्षांनी वेळोवेळी केलेला आढळला. महाराष्ट्र स्थापनेनंतर या बहुतेक सर्व संस्था अस्तित्वात आल्या आहेत. त्या कार्यरत आहेत. शासकीय पातळीवर अनेक समस्यांचा विचार होऊन मराठीला उत्तेजन देणारे उपक्रम हाती घेऊन जवळजवळ पंधरा वर्षे झाली आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय, सांस्कृतिक विभाग, लोकसाहित्याचे मुद्रण, मराठी रंगभूमीला उत्तेजन, शास्त्रीय आणि लोकसंगीताच्या जोपासनेसाठी असे अनेक साहित्यविषयक व सांस्कृतिक उपक्रम चालू केले.