पण या सर्व उपक्रमांप्रमाणेच मराठीच्या दृष्टीने आणखी एक-दोन प्रश्न आपल्यापुढे मांडू इच्छितो. एक म्हणजे ग्रंथनिर्मिती आणि ग्रंथप्रसार. अलीकडे प्रकाशकांनी केलेली भाषणे व 'मौज' प्रकाशनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त झालेली भाषणे मी वाचली. मला वाटते, की केवळ उत्कृष्ट साहित्य निर्माण करून भागणार नाही, तर त्यांचे सुबक प्रकाशन व स्वस्त पुस्तक योजनांद्वारे त्यांचा प्रसार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आता औद्योगिक विस्तार झाल्यामुळे काहीसा सुस्थितीत असलेला नवा मध्यमवर्ग निर्माण झाला आहे. तो वर्ग टेलिव्हिजन जितकी प्रतिष्ठेची वस्तू मानतो, तितकेच त्या वर्गाने स्वत:चे ग्रंथालय असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले पाहिजे. मला असे वाटते, की एक प्रकारची ग्रंथशून्यता आता येत आहे. त्यामुळे पुस्तके खपत नाहीत. हे घातक आहे. ग्रंथालयांना पुस्तकांची आवड निर्माण करता येईल. 'चिंतनशील साहित्य म्हणजे केवळ धार्मिक साहित्य' असे समीकरण झाले आहे. हे अपुरे आहे. नवे पदवीधर, नवी विद्यालये नव्या चिंतनशील साहित्याची गि-हाइके आहेत. पण महाराष्ट्रात नवी विद्यापीठे निघूनही ग्रंथांचा प्रसार का होत नाही, त्याचा विचार करावयास पाहिजे. विद्यापीठांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. शासन यासाठी काय करू शकेल? याचाही स्वतंत्रपणे विचार झाला पाहिजे. ग्रंथप्रसार होण्याची खात्री असेल, तर चांगले लेखक पुढे येतील.
दुसरे, म्हणजे संशोधनासंबंधी विद्यापीठांनी अधिक समाजाभिमुख व्हावयास हवे. आज अनेक सामाजिक समस्यांचे संशोधन व्हावयास हवे आहे. दलितांचे, स्त्रियांचे व शहरी लोकांचे अनेक सामाजिक प्रश्न आहेत, की ज्यांच्यावर संशोधन झाले, तर साहित्यात त्यांची महत्त्वाची भर पडेल. मराठीमध्ये 'गावगाडा' किंवा 'बदलापूर' यांसारखी समाजशास्त्रीय आशय असलेली पुस्तके निर्माण झाली होती. त्यांची आठवण या वेळी होते. असे अनेक ग्रंथ इंग्रजी भाषेत होतात. बदलत्या समाजाचे चित्र या संशोधनातून मिळते. तसेच आपल्या इतिहासाचे आहे. अलीकडे मराठी ऐतिहासिक कादंबरीला बहर आला आहे. इतिहासाचे सर्वांगीण अध्ययन व संशोधन झाले पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक थोर पुरुषांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करणारे ग्रंथ, त्यांच्या चरित्रसाधनांची जमवाजमव यांत आपल्या विद्यापीठांनी लक्ष घालावयास हवे. महाराष्ट्रात सहा विद्यापीठे आहेत. त्यांनी विषयवार वाटणी केली, त्यासाठी अध्यासने निर्माण केली, तर ही कामे योजनापूर्वक करता येतील. ललित साहित्याला, चिंतनशील साहित्याला उपयुक्त असे आधारभूत ग्रंथ निर्माण होऊ लागतील. हे सगळे योजनापूर्वक करावयाचे काम आहे.