यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ४४

यशवंतरावांचे समीक्षा लेखन हे अभ्यासपूर्ण समीक्षालेखन आहे. मराठी वाङ्मयाचा विचार ते अतिशय गांभीर्याने करीत होते. म्हणूनच वाङ्मयासंबंधी अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. त्यांची उत्तरे शोधण्याचा त्यांनी सदैव प्रयत्न केला किंबहुना या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच त्यांनी समीक्षालेखन केले असावे. यशवंतरावांनी सभा संमेलन, पुरस्कार, प्रस्तावना तसेच भेट प्रत, पुस्तकाबद्दलचा अभिप्राय इ. बद्दल जे विचार व्यक्त केले आहेत ते वाचन आणि चिंतनातून यातूनच त्यांचे समीक्षालेखन आकार घेत असे. त्यांचे वाचन विस्तृत होते. इंग्रजीतील व तिच्या द्वारे युरोपातील व अन्य देशांतील अभिजात वाङ्मय त्यांनी वाचलेले होते. मुळातच ते वकील असल्याने त्यांचे इंग्रजी ज्ञान चांगले होते. तसेच नव्या आणि जुन्या मराठी वाङ्मयाचे व्यापक व खोल वाचन त्यांनी केलेले होते. 'श्री नामदेव दर्शन' तसेच 'संतेश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज' यांचे चरित्र यासारखे प्राचीन वाङ्मय त्यांनी वाचले, या अंध:कारमय व नैराश्यपूर्ण परिस्थितीत आपल्या 'समता'धर्माच्या शिकवणीने जनतेला 'जीवनामृत' देणारी संतमालिका महाराष्ट्रात निर्माण झाली व भागवत धर्माची स्थापना या संतांनी केली असे ते नमूद करतात. आपण मराठी वाङ्मयाचे नव्हे तर 'वाङ्मयाचे वाचक आहोत' असे सांगण्यामागे सर्वच भाषांतील वाङ्मय आपला अभ्यासविषय असायला हवा, अशी त्यांची भूमिका होती. वाचक या नात्याने वाङ्मयाचे वाचन करण्याची कृती असल्यामुळे वाचलेल्या पुस्तकावरच्या आपल्या प्रतिक्रिया ते टिपून ठेवीत. किंवा अधोरेखित करत असत. तसेच काही नोंदी करत. त्यामध्ये रसग्रहण असे. मूल्यमापन असे आणि वाचनात उपस्थित झालेले प्रश्न असत. त्या प्रश्नांचा शोध घेत त्यातूनच त्यांचा समीक्षालेख निर्माण होत असे. त्यांचे समीक्षालेखन म्हणजे वाचक लेखक यांच्यातील जणू संवादच आहे.

यशवंतरावांच्या समीक्षालेखनाची वैशिष्टये म्हणजे त्यांची वाचनीयता. वाचक त्यांचे लेखन वाचू लागला की त्या लेखनाची त्याच्यावर जबरदस्त पकड बसते. तो ते लेखन समरसून वाचत जातो. यशवंतराव आपल्या समीक्षालेखनातून वाङ्मयाच्या रुपाचा शोध घेण्यात घडलेली प्रक्रियाच वाचकासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. साहित्याच्या रुपाचा त्यांना पडलेल्या प्रश्नांचा शोध घेतला. त्यांनी अनुभवलेले अस्वस्थेचे, आनंदाचे, निराशेचे असे सर्व भाव त्यांच्या लेखनात स्पष्टपणे उमटतात. आपण त्यांचे साहित्य विचार वाचीत नसून हे 'विचार' वाचता वाचता विचार करणा-या व्यक्तीच्याही सहवासात आहोत अशी जाणीव वाचकाला होत असते.  त्यांच्या लेखनाला जशी भावनिक पातळी लाभते तसेच ते लेखन वक्तृत्वपूर्णही बनते. कारण गंभीरपणे बोलणारे आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणारे ते एक उत्तम वक्ते होते. त्यामुळे त्यांच्या समीक्षालेखनातही त्याच तोडीचे वक्तृत्व दिसते.

आपल्या आस्वादप्रक्रियेला लेखक-वाचक संवाद शब्दबद्ध करणे, आस्वादातील भावनिक अंग टिकवणे आणि वक्तृत्वाच्या साहाय्याने विचार मांडणे या त्यांच्या लेखनपद्धतीमुळे यशवंतरावांची समीक्षा जशी आस्वादक बनली तशीच ती बौद्धिक व विचारप्रवाही बनली आहे. म्हणूनच आस्वाद आणि वैचारिक मीमांसा यात सुसंवाद राखीव लेखन करणे हे त्यांच्या समीक्षा लेखनाचे वैशिष्टय आहे.
यशवंतरावांच्या समीक्षालेखनाच्या काही मर्यादाही जाणवतात. मराठी साहित्याच्या अनुरोधाने वेळोवेळी त्यांना जे प्रश्न सुचते त्यांच्या उत्तराच्या शोधासाठी त्यांचे लेखन झाल्यामुळे ते स्फुट, फुटकळ स्वरुपाचे आहे. म्हणूनच ते लेखवजा, टिपणवजा झाले आहे. ते प्रबंधात्मक होऊ शकले नाही. त्यांनी वेळोवेळी जे लेखन केले, त्यांना जे प्रश्न सुचले त्याचा जर अधिक व्यापक विचार केला असता तर ते लेखन त्यांना करणे सहज शक्य होते, पण त्यांनी केले नाही. तरीसुद्धा त्यांचे समीक्षालेखन मराठी ललित वाङ्मयसंबंधी झाले आहे. साहित्यकृती, साहित्यप्रकार, लेखक इ. विषयांसंबंदी झाले आहे. तात्त्विक समीक्षा लेखन फारसे केलेले आढळत नाही.

यशवंतरावांना चित्र, शिल्प, वास्तू इ. ललित कलांचा छद होता. भारतात व परदेशात प्रवास करताना त्यांनी या कलाकृतीचा बराच अभ्यास केला होता. प्रवासात जेथे जेथे अशा कलाकृती आढळतात तेथे तेथे त्यांनी त्यांचे सापेक्षाने निरीक्षण केले. परदेशात त्यांनी कलावस्तू व संग्रहालये पाहण्यावर भर दिला. या सर्व अनुभवांचा एक संस्कार त्यांच्या कलादृष्टीवर झाला होता. साहित्य कृतींचा विचार करताना ते अन्य कलांमधील कलाकृतींचे संदर्भ देत. आंतरशाखीय विद्याभ्यास, साहित्यकृती आणि अन्य प्रकारच्या कलाकृती यांच्या रुपाचा एक समग्र विचार त्यांनी मांडला.