यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ३९

जनसामान्यांच्या अभिसरण व अभिव्यक्तीचे माध्यम ठरणारी भाषाच समर्थ म्हणावी लागेल. लोकभाषा ही सर्व जीवनव्यवहारासाठी वापरली गेली पाहिजे. लोकभाषेखेरीज ख-या अर्थाने लोकशाही असूच शकत नाही. बहुजन लोकांना समजणारी भाषाच जीवनातील सर्व व्यवहारात वापरली पाहिजे असा आज अट्टाहास धरला जातो. या संदर्भात यशवंतरावांचे विचार फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, "ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक झाल्याशिवाय समाजाचे जीवन समर्थ होत नाही. उन्नत होत नाही. विकसित होत नाही. ज्ञानभाषा एक आणि लोकभाषा दुसरी अशी हिंदुस्थानच्या जीवनाची परंपरागत कहाणी आहे." ज्ञानभाषेचे कार्य केवळ भाषा अभिमानातून होईल अशी आज शक्यता नाही. कारण त्यासाठी नवे संशोधन करुन ते जगापुढे त्वरित मांडण्याची क्षमता व सोय असणारीच भाषा ज्ञानभाषा होऊ शकते. म्हणून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी सर्व ज्ञान त्या भाषेत येणे अगत्याचे आहे. शिवाय ज्या भाषेतून मुख्यत: ज्ञानाचे आदान प्रदान होते व निर्मिती होते ती भाषा ज्ञानभाषा बनते. उच्च शिक्षण, संशोधन, माहितीचे विवरण व विनिमय इत्यादींमुळे इंग्रजी ही ज्ञानभाषा बनली आहे. म्हणून ज्ञानभाषेमध्ये जे ज्ञान आहे ते लोकभाषेमध्ये आले पाहिजे असा आशावाद ते व्यक्त करतात. तसेच उच्चशिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे असा अट्टाहासही ते व्यकत करतात. मराठी भाषा जगवायची, फुलवायची, समृद्ध करावयाची आहे तर त्यासाठी इंग्रजी चांगल्या त-हेने आत्मसात करणे आवश्यक आहे. "मी भाषेवर प्रेम करणारा मनुष्य आहे. पण मी संकुचित अर्थाने भाषेचा अभिमानी राहिलेलो नाही. हेही तितकेच खरे आहे. भाषा ही माणसांना एकत्र आणण्याचे साधन बनण्याऐवजी त्यांच्यात ती दुरावा निर्माण करील की काय अशी भीती आज आपल्याला वाटू लागली आहे." म्हणून शिक्षण हे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचे असेल तर ते परक्या भाषेतून तळागाळापर्यंत पोहोचवणे अवघड आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ञांनी आपल्या क्षेत्रातील ज्ञान इंग्रजीतून सोप्या मराठी भाषेत अनुवादित केले तर मराठी भाषेला जी मरगळ आली आहे ती दूर करणे शक्य आहे असा विश्वास ते व्यक्त करतात.

मराठी भाषेच्या परिवर्तनाची ही सुंदर मीमांसा यशवंतरावांनी केली आहे. यातून मराठी भाषेची त्यांची जाण किती सखोल होती हे लक्षात येते. यशवंतरावांची समीक्षा म्हणजे जाणकार रसिकाने साहित्य कृतीचा आस्वाद घेऊन दिलेला हुंकार आहे. यशवंतरावांच्या समीक्षेची प्रक्रिया ही एका शोधाची प्रक्रिया आहे. आणि तो शोध शोधकाच्या विनम्र परंतु जिज्ञासू बुद्धीने घेतलेला आहे. हा शोध वाङ्मयाच्या प्रवृत्तीचा, प्रयोजनाचा, रुपांचा आणि प्रश्नांचा घेतला आहे. साहित्यकृती ही चैतन्यपूर्ण नवनिर्मिती असे. अशा साहित्याचा शोध म्हणजे चैतन्याचा शोध असतो. एका परीने जीवनाचा शोध असतो. जीवनाचा शोध जस संपत नाही तसा उत्तम साहित्य कृतीच्या रसास्वादाचा शोध कधी संपत नाही. यशवंतरावांसारखा शोधक अशी समीक्षा नम्रपणे करत असतो.

यशवंतरावांची समीक्षा ही तात्त्विक समीक्षा, शास्त्रीय समीक्षा नाही. म्हणून या समीक्षेकडून शास्त्रीय स्वरुपाची सुस्पष्टता अपेक्षिणे अयोग्य आहे. यशवंतरावांची समीक्षा रसग्रहाणात्मक सुद्धा नाही. त्यांची रसग्रहणे, ज्या त्या प्रकारची रसग्रहणे फारच कमी असतात. व स्वत: यशवंतरावांची मुक्तभाष्ये जास्त असतात. यशवंतराव स्वत: एक सर्जनशील साहित्यिक होते व त्यांना अत्यंत चिंतनमग्न मन लाभले होते. मराठी भाषेची निर्मिती कधी झाली, त्यावर इतिहासाच्या परिवर्तनाचा व भौगोलिक परिस्थितीचा परिणाम कसा होत गेला, त्यातून मराठी कशी बदलत गेली हे सांगण्यासाठी यशवंतराव रुपकात्मक भाषेचा उपयोग करून म्हणतात, " मराठी भाषेला इतिहासाने वस्त्र दिले तर भूगोलाने ते शिवून मराठी भाषेच्या अंगावर घातले व तिच्या रुपात भर टाकली असे म्हणावे लागेल." यशवंतरावांची समीक्षेची प्रक्रिया अशी आस्वादापासून मूल्यमापनापर्यंत आपोआप घडत असते. मराठी भाषेचे बदलते रुप व बोलीभाषेच्या या परिवर्तनाच्या दिशा यशवंतराव नेमक्या शब्दांत मांडतात. साहित्य आणि समाजप्रबोधनाची दिशा आणि व्यापती स्पष्ट करताना यशवंतरावांची भूमिका स्पष्ट दिसते. ते म्हणतात, "साहित्य हे थर्मामीटरमधील पा-यासारखे संवेदनशील असते. निदान असावे. समाजमानसामध्ये जे असते तेच साहित्यात अवतरते. मराठी साहित्याचा इतिहास हेच सांगतो." पारा जसा उष्णतेने झरझर वर चढतो, तसेच हे साहित्य समाजाच्या परिवर्तनाच्या दिशा तेवढयाच गतीने व्यक्त करीत असते. साहित्य हे आपल्या काळाशी संवाद करत असतानाच सर्वकालीन बनण्याची धडपड करीत असते. कोणतीही साहित्यकृती विशिष्ट काळात, विशिष्ट परिस्थितीत व विशिष्ट संदर्भात जन्म घेत असते. साहित्यात सर्वसाधारण लोकांच्या सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक प्रवृत्तींचे प्रतिबिंब पडत असते.