इतिहासाचे एक पान. ३४०

प्रत्येक राष्ट्रांतील अंतर्गत विषमता व राष्ट्रा-राष्ट्राची विषमता दूर करण्यासाठी व्यापार, उद्योगधंदे या आर्थिक क्षेत्रांतील कार्यपद्धतींत मूलभूत फरक करुन दुनियेंतील संपत्तीची पुनर्वाटणी मानवी विकासासाठी झाला पाहिजे असा प्राथमिक स्वरुपाचा प्रश्न जगापुढे अग्रहक्कानं निर्माण झाला असलेल्या काळांत यशवंतराव परराष्ट्र-व्यवहारखात्याचा कारभार सांभाळीत आहेत, हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागतो. मानवी विकासाच्या ध्येयानं प्रेरित होऊनच त्यांची आजवरची राजकारणांतली वाटचाल झालेली आहे. महाराष्ट्रांत असतांना आणि राष्ट्राच्या पातळीवर दिल्लींत पोंचल्यानंतरहि त्यांची याच ध्येयानं वाटचाल सुरू राहिली. आता तर त्यांना विश्व-पातळीवर त्यासाठी काम करावं लागत आहे. जगापुढे मानवी विकासाचा हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्या प्रश्नाच्या उत्तरावर आणि त्याच्या अंमलबजावणीवरच जागतिक शांतता आणि एका अर्थानं मानवाचं भवितव्य अवलंबून आहे, याबद्दल यशवंतरावांच्या मनांत संशय नाही.

विकसनशील राष्ट्रांशी याच दृष्टिकोनांतून ते चर्चा, वाटाघाटी करत राहिले आणि देवाणघेवाणीचे करार घडवून आणले. परराष्ट्र-नीतिसंबंधांत तत्त्वनिष्ठ, पण व्यवहारी धोरण भारताच्या नेतृत्वानं स्वीकारलं असल्यानं, विकसनशील राष्ट्रांच्या मनांत त्यानं मूळ धरलं आहे.  त्याची जोपासना आणि वाढ यशवंतराव करत राहिले आहेत.

परराष्ट्र-व्यवहारखात्याचीं सूत्रं यशवंतरावांनी ११ ऑक्टोबर १९७४ ला स्वीकारल्यानंतर त्यांच्या परदेश-दौ-यांचा प्रारंभ पुढच्याच महिन्यात सिलोनच्या-श्रीलंका भेटीपासून झाला. १७ नोव्हेंबरला ते श्रीलंका भेटीसाठी रवाना झाले. २० नोव्हेंबरपर्यंत त्यांचा हा पहिला दौरा समाप्त झाला. त्याच वर्षी ३ डिसेंबर ते १० डिसेंबरपर्यंत त्यांनी बांगला देशाला भेट देऊन चर्चा केल्या श्रीलंका आणि बांगला देश हीं दोन्ही भारताच्या लगतचीं राष्ट्र. या दोन्ही राष्ट्रांमधील मैत्री राजनैतिक पातळीवर घट्ट बनणं महत्त्वाचं होतं. पहिल्या दोन महिन्यांतच त्यानी या कामास गति दिली.

त्यानंतर पुढच्याच महिन्यांत, १९७५ च्या जानेवारीमध्ये युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो यांच्याशी चर्चा करण्यासाठी १९ जानेवारीला ते युगोस्लाव्हियाच्या दौ-यावर रवाना झाले. २४ जानेवारीपर्यंत त्यांचा हा दौरा झाला. मार्शल टिटो हे पाश्चिमात्य जगांतले एक समर्थ राजकारणी मुत्सद्दी मानले जातात.

संपूर्ण १९७५ सालांत त्यांन आठ वेळा परदेशांचे दौरे करून जगांतल्या मुत्सद्यांशी विविध प्रश्नांच्या संदर्भात वाटाघाटी केल्या. युगोस्लाव्हियाच्या भेटीनंतर १४ मार्चला ते गियाना, क्यूबाच्या दौ-यावर गेले. दोन आठवडे त्यांचा हा दौरा झाला. त्याच्या पुढच्या महिन्यांत ते जमेका, मेक्सिको इकडे २७ एप्रिलला रवाना झाले. या दोन ठिकाणच्या भेटीगाठी आणि चर्चा १४ मेपर्यंत सुरू राहिल्या. तेथून परत येतांच लगेच २७ मे रोजीं ते लेबॅनॉन, इजिप्तच्या भेटीसाठी गेले. पेरु-अमेरिकेचा त्यांचा दौरा असाच दोन आठवड्यांचा झाला. १८ ऑगस्टला ते 'पेरु'कडे रवाना झाले आणि २ सप्टेंबरला परतले; परंतु लगेच त्याच महिन्यांत २८ सप्टेंबरला ते युरोप-अमेरिकेच्या दौ-यावर पुन्हा रवाना झाले. त्या वर्षांतल्या अखेरच्या तीन महिन्यांत त्यांनी अफगाणिस्तान, इराक, कुवेत बहारिन, फ्रान्स या देशांना भेटी देऊन तेथील मुत्सद्यांशी चर्चा केली, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीला उपस्थित राहून त्यानी भारताची बाजू समर्थपणें मांडली.