इतिहासाचे एक पान. ३३८

प्रकरण  - २५
--------------

यशवंतराव अर्थखात्याचा कारभार रहात असतांनाच १९७४ च्या मध्यावर त्यांना अचानक नव्या आव्हानाला सामोरं जावं लागलं. केंद्रिय मंत्रिमंडळांत खात्यांची अदलाबदल करण्याची परिस्थिती निर्माण झाली. पंतप्रधान इंदिरा गांधींनी तो निर्णय करतांच यशवंतरावांशी त्यांनी चर्चा सुरू केली. यशवंतरावांकडे पुन्हा संरक्षणखातं सोपवलं जाणार अशा चर्चा त्या काळांत बाहेर सुरू झाल्या होत्या. जगजीवनराम हे त्या वेळी संरक्षणमंत्री होते.

पंतप्रधान आणि यशवंतराव यांच्यांत खातें-बदलासंबंधांत चर्चा झाल्यानंतर यशवंतरावांनी परराष्ट्र-व्यवहारखात्याची जबाबदारी स्वीकारली आणि ११ ऑक्टोबर १९७४ ला त्यांनी या नव्या खात्याची सूत्रं स्वत:कडे घेतली.

१९६२ सालीं यशवंतराव दिल्लीला दाखल झाल्यापासून त्यांनी संरक्षण, गृह आणि अर्थ या खात्यांमध्ये जें काम केलं, जो अनुभव घेतला, त्या अनुभवाचाच भाग म्हणजे या नव्या खात्याची जबाबदारी होती. मात्र या नव्या खात्याचा कारभार करतांना त्यांना तत्त्वांची आणि धोरणाच्या क्षेत्रांतील अंमलबजावणी आता करावी लागणार होती.

विविध समस्यांचा मूलभूत विचार करण्याची सवय ही यशवंतरावांनी आपल्या मनाला लावून घेतलेली जुनी सवय आहे. वाचणं आणि विचार करणं याचा त्यांना कधीच कंटाळा नसतो. परराष्ट्र-व्यवहारखात्यांत आता त्यांना तेंच करावं लागणारं होतं. त्या दृष्टीनं त्यांना नव्यानं मिळालेलं काम हें त्यांच्या आवडीचंच काम ठरलं जगांतील मुत्सद्यांशीं होण्याच्या गाठीभेटी, चर्चा करण्याचा अनुभव हा एक अर्थानं कसोटीचा आणि मनाला उत्तेजित करणारा, प्रसन्न करणारा अनुभव असतो. संरक्षणमंत्री असल्यापासून यशवंतरावांनी असे अनुभव अनेकदा घेतलेले होते. त्यामुळे परराष्ट्रखातं स्वीकारल्या दिवसापासूनच त्यांनी कामास प्रारंभ केला. दिल्लींत पोंचल्यापासून चढत्या श्रेणीन यशवंतराव आता परराष्ट्रखात्यांत दाखल झालेले होते. या खात्याच्या कारभाराच्या अनुभवाबद्दल पुढे सहा महिन्यानंतर जाहीरपणें बोलतांना वाई येथील जाहीर सभेंत त्यांनी सांगितलं की, दहा-बारा वर्षं जें काम केलं त्याच अनुभवाचा भाग म्हणून हे नवं काम असलं, तरी तत्त्वांचा आणि धोरणांच्या क्षेत्रांत आता प्रामुख्यानं कराव्या लागणा-या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा हा भाग आहे.

भारताचं परराष्ट्रीय धोरण हें पं. नेहरुंच्या कारकीर्दीतच निश्चित झालेलं आहे. अलिप्ततेचं धोरण म्हणून भारताचं धोरण सर्वश्रुत आहे. यशवंतरावांचा या कामांतला अनुभव असा की, भारताच्या परराष्ट्र-नीतीबद्दलच्या धोरणानं जगांत आता चांगलं मूळ धरलं आहे. जागतिक लष्करी गटबाजीपासून अलिप्त राहून देशहिताच्या दृष्टीनं स्वतंत्र निर्णय घेण्याचं धोरण पं. नेहरुंनी पुरस्कारलं त्या वेळीं उलटसुलट टीका होत राहिल्या होत्या. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तंटे हे तडजोडीच्या मार्गानं सुटावेत असा त्या वेळीं भारतीय नेत्यांचा कळकळीचा प्रयत्न होता. यशवंतराव आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत या धोरणाचा सातत्यानं, हिरीरीनं अवलंब करत आहेत. अलिप्तता ही केवळ कांही देशाची मर्यादित शक्ति न रहातां परराष्ट्रीय धोरणाची ती एक चळवळ बनावी असा यशवंतरावांचा प्रयत्न असून त्याला क्रमाक्रमानं मूर्त स्वरुप येऊं लागलं आहे.