इतिहासाचे एक पान. ३१८

मोरारजी देसाई बैठकीच्या ठिकाणीं मोठ्या खुषींत आले आणि ' आपण जिकणार' असं आल्याबरोबर सांगून आपला हर्ष व्यक्त केला. याच बैठकींत एक भयंकर निर्णय करण्यांत आला. जगजीवनराम आणि फक्रुद्दीन अलि अहंमद यांनी सिंडिकेटच्या मतानुसार काँग्रेस-अध्यक्षाना या निवडणुकीच्या संदर्भांत प्रतिकार केला होता. त्याबद्दल त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा विचार या बैठकींत झाला. चर्चेच्या वेळीं शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या निर्णयाबद्दल मतभेद झाले हें खरं, तरी पण या गुन्ह्याबद्दल कांही तरी कडक कारवाई करावी याबद्दल सिंडिकेटमध्ये दुमत नव्हतं.

पक्षांतील जुन्या आणि जाणत्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, एकमेकांना समजून घ्याव आणि हा प्रश्न संपवून टाकावा, असा यशवंतरावांचा दृष्टिकोन होता. दरम्यान पंतप्रधानांचे पाठीराखे आणि तरुण तुर्क यांनी त्याच दिवशीं मध्यरात्रीं एक बैठक घेऊन पक्षांतर्गत निर्माण झालेलं संकट कसं टाळतां येईल याचा विचार केला. पक्षांतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा. समजतदारपणानं उभयपक्षीं समझोता घडून यावा अशी होती. परंतु तथाकथित काँग्रेस 'हायकमांड' आणि पंतप्रधान, हे मात्र एकत्र बसून विचारविनिमय करण्याच्या मनस्थितींत उरले नव्हते. एकमेकांबद्दल कमालीचा अविश्वास निर्माण झालेला होता.

पक्षांतर्गत दुफळी टाळावी यासाठी यशवंतरावांचा प्रयत्न सुरूच होता. १७ ऑगस्टला कामराज यांनी त्यांची भेट घेतली आणि निजलिंगप्पा यांनी आयोजित केलेल्या बैठकीला त्यांनी उपस्थित रहावं यासाठी आग्रह धरला. चव्हाण यांनी सिंडिकेटच्या भजनीं  लागावं यासाठी सिंडिकेटमधील नेते, कामराज यांच्यामार्फत यशवंतरावांशी लाडीगोडी करत आहेत, अशी एक अफवा त्या वेळीं कुणी तरी सोडून दिली होती. संसदीय काँग्रेस-पक्षाचे नेते म्हणून यशवंतरावांना निवडण्याची सिंडिकेटची तयारी आहे, चव्हाणांनी खंबीर भूमिका स्वीकारावी, असंहि कामराज यांनी त्यांना सांगितलं आहे, अशीहि एक अफवा होती.

कामराज यांनी काँग्रेसच्या आणि सरकारच्या भवितव्याबद्दल यशवंतरावांशीं चर्चा केली होती. परंतु सिंडिकेटनं कांही कारवाई करण्यासाठी, कृति करण्यासाठी पाऊल उचललं, तर त्याच्याशीं आपण सहमत होणार नाही, वचनबद्ध रहाणार नाही, असं यशवंतरावांनी त्यांना स्पष्टच बजावलं होतं. सत्ता म्हणजेच सर्वस्व, अशी सिंडिकेटच्या नेत्यांनी भूमिका होती आणि सामाजिक बदलाचं साधन या दृष्टीनं ते सत्तेकडे पहात नव्हते. त्यामुळे सिडिकेटच्या कुठल्याच कृतीवर यशवंतरावांचा विश्वास उरला नव्हता.

निजलिंगप्पा यांना अध्यक्षपदावरुन हुसकून लावण्यासाठी म्हणून अ. भा. काँग्रेसचं अधिवेशन भरवावं अशी हालचाल पंतप्रधानांच्या गोटांत सुरू झाली होती. या संदर्भात यशवंतरावांनी १८ ऑगस्टला इंदिराजींची भेट घेऊन चर्चा केली आणि अधिवेशन भरवण्याचा विचार रद्द करावा असं सुचवलं. काँग्रेस-अध्यक्ष आणि नेते यांच्याशीं चर्चा करण्यासंबंधीहि त्यांनी सुचवलं. पंतप्रधानांनी यशवंतरावांच्या सुचनेला अनुकूल प्रतिसादहि दिला.

परंतु या चर्चेचा सारांशनिजलिंगप्पा यांना सांगून त्यांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याचं स्थगित करावं असं त्यांना सुचवलं; त्या वेळी त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला नाही. त्यांची दुराग्रही आणि ताठर भूमिका पाहून यशवंतराव मात्र निराश बनले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकींत रेड्डी हेच विजयी होणार या घमेंडींत निजलिंगप्पा बोलत होते.