देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीबरोबरच कारखानदारीच्या उद्योगधंद्याचं स्थानहि महत्वाचं आहे, असं मराठी मनावर बिंबवण्याचा प्रयत्न त्यांनी या काळांत केला. ‘शेती की उद्योगधंदे’ असा विरोधी द्वंद्व-समास नसून या दोन्हींची सांगड घातली पाहिजे, शेतींतून कच्च्या मालाचं भरपूर उत्पादन करणं, आणि या कच्च्या मालाचं पक्क्या मालांत रूपांतर करणारे उद्योगधंदे सुरू करणं हा विचार त्यांनी समाजाच्या तळापर्यंत पोचवला. शेती हा ग्रामीण विकासाचा गाभा असल्यामुळे या गाभ्याभोवती छोट्या उद्योगधंद्यांची इमारत उभारणं, शेतीला उद्योगधंद्यांची जोड दिल्यानंतर या कार्यक्रमाला वेळापत्रकहि त्यांनी तयार केलं.
नवं राज्य अस्तित्वांत आल्याच्या दिवसापासून महाराष्ट्राशी संबंधित विविध विषयांवरील परिसंवाद, शिक्षण, शेती, उद्योग, सहकार, बॅंका, छोटे उद्योगधंदे, विद्यापीठांचे समारंभ, निरनिराळ्या जातिजमातींच्या परिषदा, विविध पक्षांच्या सर्वपक्षीय सभा, वसंत व्याख्यानमाला, काँग्रेस-पक्षाच्या सभा, शिबिरं, मेळावे, जाहीर सभा, महिला सभा, सांस्कृतिक संमेलनं, नाट्यसंमेलनं, साहित्य-संमेलनं, पत्रकारांच्या शिक्षण-संस्था, सत्कार, संस्थांची, शाळांची, महाविद्यालयांची उद्घाटनं व त्यांचे विविध समारंभ अशा, राज्यांतल्या सर्व प्रकारच्या समारंभातून त्यांचा अव्याहत संचार मग सुरू राहिला.
महाराष्ट्रांतल्या सर्वच क्षेत्रांतील लोकांना नव्या राज्याच्या स्थापनेनंतर विधायक विचार करण्यास व मुत्सद्देगिरी प्रदर्शित करण्यास फार मोठी संधि आणि आव्हान मिळालं आहे, असं विविध विषयांच्या संदर्भात ते समाजाला पटवत होते. पंचवार्षिक योजनेसाठी करायच्या खर्चाची आर्थिक लक्ष्यं सरकारनं गाठली तरी प्रत्यक्ष कामाची लक्ष्यं गाठण्याबाबत त्या काळांत जनतेची मानसिक तयारी करण्याची गरज होती. यशवंतरावांनी आपल्या दौ-यांचा त्यासाठी उपयोग करून घेतला.
सामूहिक विकास-योजना सुरू होत्या, या योजना पूर्ण होण्यासाठी सरकार प्राथमिक गरजांची परिपूर्तीहि करत होतं; परंतु केवळ या सोयी उपलब्ध करून देण्यामुळे योजना शंभर टक्के पूर्ण होत नाहीत असं अनुभवास आलं होतं. या योजनांचा मूळ हेतु लोकांमध्ये विशिष्ट प्रकारची प्रवृत्ति आणि स्वावलंबनाची दृष्टि निर्माण करणं हा असल्यानं तो हेतु सफल होण्यासाठी लोकांची मनं तयार करण्याचं मूलभूत कामहि त्यांनी या दौ-यांच्या द्वारे साध्य केलं. कुठे ते आर्थिक लोकशाहीचा अर्थ समजावून सांगू लागले, तर कुठे शेती, सहकार आणि छोटे उद्योगधंदे यांचं महत्व प्रतिपादन करूं लागले. बॅंकेतली, आर्थिक क्षेत्रांतली पराक्रमी माणसं राज्याच्या पाठीशी आहेत तोपर्यंत त्यांच्या पाठीशी शासनाच्या वतीनं उभं रहाण्याचं आश्र्वासन ते निःसंशयपणे देत राहिले.
आर्थिक विकासाचा प्रश्र्न हा अपक्ष असून, व्यापारी बँकांनीहि सामाजिक उद्दिष्ट समोर ठेवूनच आर्थिक व्यवहाराचं क्षेत्र वाढवण्याची गरज होती. कुठल्या तरी पक्षाला आपली मनं वाहिलेली माणसं समाजांत सात ते दहा टक्के असतात आणि नव्वद टक्के माणसं ही अपक्षच असतात. या नव्वद टक्के माणसांना जो काबूंत ठेवतो तो पक्ष-प्रमुख ठरतो, असं यशवंतराव हे आपला अनुभव म्हणून सांगत होते, आणि त्या संदर्भांतच आर्थिक विकासाची यात्रा ही अपक्ष-यात्रा आहे, असा त्यांचा दावा होता.
राजकारण आणि अर्थकारण यांना कांही तरी एक निश्र्चित प्रकारचं उद्दिष्ट असावंच लागतं. तसं ते नसेल, तर राजकारण आणि अर्थकारण काम करूं शकत नाही. असं असलं तरी, आर्थिक विकासाच्या प्रयत्नाच्या पाठीमागे कुठली तरी दृष्टि रहाते. पण याला फारसं महत्व नाही. चुकीनं कित्येकदा पक्ष-दृष्टि येऊं शकते; परंतु तिला पक्ष-दृष्टि म्हणायचं काय, हा प्रश्र्न आहे. तिला पक्ष-दृष्टि म्हटलं जाऊं नये असा कांही तज्ज्ञांचा अभिप्राय आहे. यशवंतरावांना तो मान्य असल्याचं दिसतं. म्हणूनच बँकेचं उद्दिष्ट हे खाजगी सावकाराप्रमाणे कांही तरी व्यवहार करायचा एवढंच उद्दिष्ट नव्या परिस्थितींत राहिलेलं नसून कांही नवीन आर्थिक उद्दिष्टंहि बँकांच्या पुढे निर्माण झाली आहेत असं ते आग्रहानं प्रतिपादन करूं लागले.