इतिहासाचे एक पान. १६४

विदर्भाचा दौरा आटोपून १९५७ च्या जानेवारीमध्ये यशवंतराव मराठवाडा सर करायला निघण्यापूर्वी त्यांनी नागपूरला भेट दिली. नागपूरमधील चिटणीस पार्कवर त्यांचं १६ डिसेंबरला झालेलं भाषण म्हणजे भावनांचा कल्लोळ होता. त्या दिवशीं त्यांनी वक्तृत्वकलेचा कळस  गाठला.

नागपूर शहर हें पूर्वी मध्यप्रदेशचं राजधानीचं शहर होतं. द्वैभाषिकानंतर नागपूरचं राजधानीचं महत्त्व संपलं होतं. नागपूरकरांच्या मनांत तें दु:ख होतं. राजधानी असल्यामुळे शहराला एक प्रकारचा गौरव असतो; तो गौरव किंचितसा दुखावला गेला होता.  यशवंतरावांना त्याची चांगली कल्पना होती.

यशवंतरावांनी या भेटींत या प्रश्नाचा प्रदिर्घ ऊहापोह करून लोकांच्या भावना हेलावून सोडल्या. एखाद्या शहराचं महत्त्व निव्वळ राजधानीवरच अवलंबून असतं असं नागपुरच्या मंडळींनी समजूं नये, हा मुद्दा त्यांनी श्रोत्यांना पटवला. त्यांचं असं सांगणं होतं की, “मुंबई ही आलीच पाहिजे असा कांही मंडळींचा आग्रह होता. ठीक आहे. मुंबई आली. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ‘टू ईट दि केक अॅण्ड स्टिल हॅव इट्.’ म्हणजे घरामध्ये एकच पोळी शिल्लक राहिलेली असते. कांही लोक असे चिक्कू असतात की, त्यांना पोळी खायची इच्छा तर असते आणि पोळी शिल्लक रहायलाहि हवी असते. आता या दोन्ही  गोष्टी कशा शक्य आहेत ? एकदा पोळी खाऊन ती संपवली तरी पाहिजे किंवा न खातां शिल्लक तरी ठेवली पाहिजे. मुंबई राजधानी म्हणून पाहिजे असेल तर मुंबई राजधानी होईल. मग पुन्हा नागपूर कशी राजधानी होणार? दोन्ही गोष्टी एकाच वेळीं शक्य नाहीत.

“नागपूर राजधानी राहिली नाही म्हणून कांही नागपूरचं महत्त्व कमी झालं असं समजण्याचं कारण नाही. कोणत्याहि शहराचं वैशिष्ट्य म्हणून कांही असतं; त्यावर त्या शहराचं महत्त्व अवलंबून असतं. शेवटीं खरं महत्त्व आहे कशाला? राजधानीकरिता लढा देण्याला, की लोकांच्याकरिता लढा देण्याला? विदर्भांतील भद्रावती ही सुद्धा इतिहासकाळांत एक मोठी राजधानी होती. तें शहर आता छोटं गाव झालं आहे. लोकांना स्वाभाविकपणें त्याचं दु:ख होतं. पण ह्या देशांत किती तरी राजधान्या होत्या आणि नंतर त्या बंद झाल्या. राजधान्याच नव्हे, राज्यंहि बंद झालीं. वेगळ्या वेगळ्या राजांची, घराण्यांचीं, हीं राज्यं होतीं. हीं सगळीं राज्यं गेलीं, राजधान्या गेल्या. देशांत फक्त लोक शिल्लक राहिले. या लोकांचं महत्त्व वाढविणं हें काम शिल्लक राहिलं.

“जोंपर्यंत नागपूर शहरांतल्या लोकांचं कर्तृत्व शिल्लक आहे तोंपर्यंत या शहराचं महत्त्व कुणीहि कमी करूं शकणार नाही. निसर्गानं म्हणून कांही नागपूरला महत्त्व दिलेलं आहे. समुद्रकाठावर असल्यामुळे मुंबईला जसं महत्त्व आहे, तसं भारताच्या भू-गोलाच्या केंद्रस्थानीं असल्यामुळे नागपूरलाहि कांहि महत्त्व आहे. हें महत्त्व कुणी काढून घेऊं शकणार नाही. नागपूरमध्ये राजधानी होती म्हणून त्याला थोडं महत्त्व होतं ही गोष्ट खरी: पण नागपूरचं महत्त्व संपूर्णतया राजधानीवर अवलंबून नव्हतं.

“हिंदुस्थानच्या केंद्रस्थानीं नागपूर शहर आहे हें त्याचं जें महत्त्व आहे, तें महत्त्व समजून घेऊन भारत सरकारला व मुंबई सरकारला आपली पराकष्ठा करून स्वत:च्या कल्याणाकरिता नागपूरचं महत्त्व कायम ठेवावं लागणार आहे. हें महत्त्व कायम ठेवण्यांत या शहरावर कुणी कांहीहि उपकार करणार नाही. राजधानी गेल्यामुळे महत्त्व कमी होईल ही भीति बाळगूं नका. पं. नेहरूंनीहि तें सांगितलं आहे. देशांतील मोठ्या व्यक्तीनं सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवणार, की दहा-वीस, पांच-पन्नास जणांच्या आरडाओरडीवर विश्वास ठेवणार, असा हा सवाल आहे.”

राज्य-पुनर्रचनेचा प्रश्न त्या वेळीं तरी संपलेला होता. तूर्तास त्यांत बदल होणं शक्य नव्हतं. समुद्रमंथनाची उपमा देऊन यशवंतरावांनी असं पटवण्याचा प्रयत्न केला की, समुद्रमंथन दोनदा झालं नाही. तें एकदाच झालं. त्यांतून अमृत आणि विष दोन्ही निघालीं. विष प्यायला एकटे महादेवच भेटले. त्यानंतर समुद्रमंथन करण्याचा प्रयत्न कुणीं केला नाही.