इतिहासाचे एक पान. १६३

कलाक्षेत्रांतूनहि कांही मागण्या पुढे येऊं लागल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी त्याहि समजून घेतल्या आणि भराभर निर्णय केले. त्यांतूनच नाट्यकलेला उत्तेजन देण्यासाठी म्हणून २.१६ लक्ष रुपये खर्चाची एक योजना तयार झाली. नाटकाच्या पुस्तकांना बक्षिसं, हौशी कलावंतांचा नाट्यमहोत्सव, शिक्षण-संस्थांतील नाटयमहोत्सव, खुलीं नाट्यगृहं बांधणं, हलाखीची स्थिती असलेले नाटककार, नट वगैरेंना आर्थिक साहाय्य करणं, संगीत, नृत्य आणि नाट्यशाळांना अनुदान देणं, नाट्यप्रयोग करण्याच्या बाबतींत शाळांतल्या शिक्षकांना आवश्यक तें प्राथमिक शिक्षण देणं, तमाशा वगैरेसाठी बक्षिसं ठेवणं आदि गोष्टी महाराष्ट्रांत यशवंतरावांनी त्या काळांत प्रथमच सुरू केल्या.

यशवंतराव इथे कांही असं नवीन घडवण्याच्या कामांत गुंतले असतांनाच कच्छ भागांत भूकंप होऊन एक वेगळंच संकट उभं राहिलं. त्यामुळे अन्य व्यवधानं मागे ठेवून २८ नोव्हेंबरला त्यांनी कच्छकडे धांव घेतली. भूकंपरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा, आर्थिक आणि अन्य प्रकारच्या मदतीचा प्रश्न निर्माण झालेला होता. भूकंपग्रस्त भागाची त्या दृष्टीनं तीन दिवस सतत पहाणी करून आणि आवश्यक ते निर्णय करूनच त्यांना परतावं लागलं.

आता डिसेंबर महिना उजाडला होता. १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे नगारे वाजूं लागले होते. यशवंतरावांना अजून विदर्भ व मराठवाड्याचा दौरा करायचा होता. निवडणुकांचं ऐन वातावरण सुरू होण्यापूर्वी या दोन्ही विभागांतल्या जनतेशीं हितगुज करणं आवश्यकच होतं. कच्छहून परत येतांच त्यांना मग विदर्भ-मराठवाड्याच्या दौ-याचं प्रस्थान ठेवलं. एक आठवड्याच्या त्यांच्या सततच्या दौ-यांत हे दोन्ही भाग अक्षरश: घुसळून निघाले.

विदर्भांत पुलगाव वर्धा इथल्या नागरिकांनी त्यांना मानपत्रं दिलं. वर्धा- चांदा रस्त्यावर तर विदर्भवासियांनी नव्या मुख्य मंत्र्यांचं अपूर्व असं स्वागत केलं. हिंगणघाट, वरोडा, भद्रावती इथल्या जाहीर सभांतून आपण नव्या राज्याचे नागरिक आहोंत याचा अभिमान बाळगा, गौरव माना आणि नवं राज्य त्या दर्जानं चालवण्यासाठी आपल्या  हातीं आलेलं आहे असं सांगून, सर्वांनाच त्यांनी नव्या कामांत सामील करून घेतलं. या दौ-यांत त्यांचीं जीं वक्तव्यं झालीं त्यांचं सार असं -

“नवीन राज्य निर्माण झालं म्हणजे नवीन काम सुरू झालं आहे. हें काम पूर्ण करण्यासाठी दृष्टि विशाल पाहिजे. देशांतच हें काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी विश्वासाची, सदिच्छेची, सहकार्याची देवाण-घेवाण करण्यासाठी हा दौरा आहे. मोठं राज्य कर्तृत्वानं अधिक मोठं केलं पाहेजे. तें गुणानं वाढलं पाहिजे. नव्या राज्यांतील सगळे लोक मनानं, विचारान, भावनेनं एक झाले आहेत अशी परिस्थिति निर्माण होईल तेव्हाच हें राज्य मोठं झालं असं म्हणूं शकूं.”

हिंदुस्थानचा जो ज्ञात इतिहास आहे त्या इतिहासामध्ये एका राज्याखाली एवढे लोक कधीहि एकत्र आलेले नव्हते. सगळ्या भावा-भावांना एकत्र आणून हें नवं राज्य उभं केलेलं आहे. अर्थीत् आपापपल्या भाषांचा विकास, भाषांवर आधारलेली संस्कृति, कला आणि त्यांचा इतिहास यांची वाढ करण्याची खात्री, विश्वास आणि संधि या राज्यामध्ये जरूर मिळणार आहे. एकमेकांच्या हातांत हात घालूनच या नव्या संसाराचं काम करायचं आहे. नव्या राज्यामध्ये परमेश्वरानं, निसर्गानं दिलेलीं सर्व साधनं कामी आणायची आहेत. विज्ञान, नवी अक्कल, नवी बुद्धि आणि आपल्याला दिलेले दोन हात या त्रिवेणीसंगमांतून नवीन शक्ति आणि नवीन सामर्थ्य उभं करून देशाचं राज्य सुखी करायचं आहे. वर्षामागून वर्षं  हें काम करत रहावं लागणार आहे याची कृपा करून मनाशीं जाणीव ठेवा आणि नव्या कामाकरितां नव्या राज्याच्या पाठींशीं उभे रहा ही साधी हाक देण्यासाठी, विनंती करण्यासाठी मी इकक्या लांब आलो आहे.

“मुख्य मंत्री म्हणून तुम्हीं स्वागत केलं, पण हें स्वागत मी व्यक्तिगत मानत नाही. व्यक्ति ही गोष्ट महत्त्वाची नाही. व्यक्ति येतात आणि जातात. समाज हा नेहमी पुढे चालत असतो, सत्कार व त्यासाठी वापरलेले शब्द, ज्या सिद्धान्तावर नवं राज्य उभं केलं आहे त्या सिद्धान्तासाठी आहे हें मी जाणून आहे. छोटीं छोटीं राज्यं करण्याच्या प्रश्नाचा निकाल देशानं  दिला आहे. जो प्रश्न संपला आहे, तो प्रश्न घडवून आणणार आहोंत अशी स्वत:ची व लोकांची फरवणूक करून यापुढे राजकारण होणार नाही. असे प्रश्न जे लोक निर्माण करत आहेत त्यांच्याकडे आर्थिक दृष्टीनं लोकांपुढे मांडण्या इतका, काँग्रेसपेक्षा वेगळा कार्यक्रम नाही, असं जबाबदारीनं एका राज्याचा मुख्य मंत्री म्हणून मी सांगत आहे.”