या सर्वांचा परिणाम यशवंतराव चव्हाण यांचं नेतृत्व महाराष्ट्रांत आणि देशांत स्थिर होण्यामध्ये झाला. नियतीचीच तशी योजना असली पाहिजे. महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावं ही जनतेची इच्छा! महाराष्ट्राच्या भाग्योद्याचा तो क्षण येतांच पुरोगामी ध्येयवादानं प्रेरित झालेला प्रज्ञावंत तरूण नेता महाराष्ट्राला लाभावा ही योजना नियतीचीच. १९५७ च्या निवडणुकीनंतर यशवंतराव यांची पुन्हा नेतेपदीं झालेली निवड म्हणून महाराष्ट्राचा भाग्योद्य होणार याचं तें जणू शुभ लक्षणच होतं.
महाराष्ट्र राज्य व्हावं अशी तीव्र इच्छा प्रत्येक महाराष्ट्रियाच्या अंत:करणांत वसत होती. पण ती अपेक्षापूर्ती बरीच दुरावली होती. सर्वत्र निराशेचा अंधार पसरला होता. यशवंतराव चव्हाण अशा वेळीं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदीं नसते, तर निराशेचा हा काळ आणखीहि वाढण्याची शक्यता होती. यशवंतराव हे धीराचे, दूरदूर्शी, निश्चयी, त्यागी आणि राष्ट्रवादी नेते असल्यामुळे दृढ मनानं, दिशा अनुकूल करून घेऊन, ते पावलं टाकत राहिले, संयुक्त महाराष्ट्राचं उद्दिष्ट समोर ठेवूनच त्यांनी द्वैभाषिक राबवण्याचा, तें यशस्वी करण्याचा शांतवृत्तीनं मनस्वी प्रयत्न केला; आणि मुंबईतल्या सर्व अल्पसंख्याक जाति-जमातींचा विश्वास संपादन केला. त्यांचं हृद्यपरिवर्तन घडवून आणलं.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते हें लक्षपूर्वक पहात होते. यशवंतरावांची उक्ति आणइ कृति यांमध्ये मेळ होता. धाकधपटशानं सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राला दाबून टाकण्याचं, आणि महाराष्ट्र जिंकला अशी दिल्लींत फुशारकी मरायची, तशी हवा निर्माण करायची, हा पूर्वीच्या मुख्य मंत्र्यांचा प्रयोग फसला होता. काँग्रेस-श्रेष्ठांनी तेंहि अनुभवलं होतं. मोरारजीभाई हे कर्तबगार शासक खरे, पण महाराष्ट्र त्यांना कधी उमजलाच नाही. ‘नाठाळाचे माथीं हाणूं काठी’ हेंया मातीचं वैशिष्ट्य! तें समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. असं असलं तरी यशवंतरावांना मात्र ‘नाही तरी देऊं कासेची लंगोटी’ ही भागवत धर्माची महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे याची पुरेपूर माहिती होती. महाराष्ट्राच्या सामाजिक मनाशीं ते मिळून-मिसळून गेलेले होते. मुख्य मंत्री झाल्यावर त्यांनी आपल्या अनुभवाची व्यवहाराशीं सांगड घातली. त्यासारशई राजवटींत झालेला बदल जनतेला तत्काळ जाणवला.
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला अनंत अरिष्टं आलीं. किती तरी अडचणींनी अडवून धरलं होतं. यशवंतरावांनी सावधानतेनं, संयमानं, शांततेनं या चक्रव्यूहाचा भेद केला. राजकारणाचे पत्ते पिसतांना, डाव खेळतांना, आपले डाव हुकल्याचंहि त्यांनी कांही वेळेस दाखवलं. प्रतिस्पर्ध्यांना किंवा हितसंबंधियांना एकामागून एक डाव जिंकत असल्याचा आनंदहि मिळवून दिला. पण खरा राजकीय मुत्सद्दी आपल्या हातांतलीं सर्व पानं कधीच उघड करत नसतो. तो डाव खेळत रहातो, इतरांनाहि खेळण्यास सवड देतो; आणि नेमकी वेळ आली की, हुकमाचे पत्ते पुढे करून सारा डावच जिंकतो. इथे असंच घडलं.
१९५६ पासून १९६० पर्यंत यशवंतराव डाव जिंकण्याचं मनांत ठेवून मोठ्या धीरानं, सचोटीनं, धोरणीपणानं पावलं टाकत राहिल्यामुळे १९६० च्या एप्रिलमध्ये महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण एकदाचं सुटलं.