विविधांगी व्यक्तिमत्व-१०

यशवंतराव सौजन्यशील होते. 'सर्वेषाम विरोधेण' काम करण्यात वाकबगार होते. त्यामुळेच त्यांना एवढे यश लाभले होते. ही त्यांच्या यशाची मीमांसा जुजबी, वरवरची वाटते. किंबहुना त्यांच्या राजकीय कर्तृत्वावर या मीमांसेने थोडा अन्याय होतो. 'सर्वेषाम विरोधेण' मिळालेली लोकप्रियता फार काळ टिकत नाही. राजकारण म्हटले की त्यात जशी तडजोड हवी तशीच तोडजोडही हवी. राजकारण भेंडीच्या भाजीप्रमाणे बुळबुळीत नाही. त्यात लवंगी मिरचीचा थोडा ठसका असावाच लागतो. यशवंतरावांच्या राजकीय कर्तृत्वात आणि व्यक्तिमत्त्वातही असा ठसका होता. माणसालाही आरपार न्याहाळून किती हसावे, कसा खांद्यावर हात ठेवावा आणि त्याच्याशी किती मार्दवाने वा आपुलकीने बोलावे याच्या त्यांची श्रेणी ठरविल्या असाव्यात, असाच भास होतो. धन्वंतरी रोग्याला पाहताक्षणी रोग ओळखतो तसेच मुत्सद्याने माणसाची पारख केली पाहिजे. हे सारे करत असताना त्यांची स्वत:ची काही ठाम भूमिका ठरलेली असते. औषधाला जसे अनुपान तसे त्यांचे हास्य व सौजन्य!

काँग्रेसमधील प्रगतीवर विचारसरणीचे यशवंतराव प्रतीक होते. महाराष्ट्रात उजव्या गटाच्या विचारसरणीचे बीज प्रथमपासूनच रूजले नव्हते. तथापि डाव्या विचारसरणीच्या मर्यादाही ते चांगल्या प्रकारे ओळखत होते. त्यांनी काँग्रेसला वळण लावले ते डाव्या दिशेने. पण डाव्याच्या कडेला ते गेले नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जवळ जवळ नामशेष होऊ घातलेल्या काँग्रेसचे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुनरुज्जीवन करण्याचे कर्तृत्व सर्वस्वी त्यांचे. महाराष्ट्राचे सलग काँग्रेस घटकराज्य झाल्यानंतर त्या राज्याच्या व्याप्तीएवढी सलग काँग्रेस संघटना निर्माण करण्याचे कर्तृत्व यशवंतरावांचेच!

यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकारणी होते असे नाही. त्यांच्या जीवनाला विविध पैलू होते. जितक्या सहजतेने ते राजकीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वावरत, तितकीच सहजता ते जेव्हा विचारवंत, साहित्यिक, विद्वान, शास्त्रज्ञ, कारखानदार यांच्या सहवासात असत तेव्हाही पहायला मिळे, हे कसब त्यांनी प्रयत्‍नपूर्वक साधले होते. त्यांचे नेमके वेगळेपण येथेच दिसून येते.

त्यांच्या चरित्रग्रंथात एके ठिकाणी म्हटले आहे ‘सत्तास्पर्धेच्या राजकारणात नेत्याला प्रसंगी डावपेचांचा अंगीकार करावाच लागतो.’ यशवंतराव हे डावपेचांपासून दूर राहणे शक्यच नव्हते., परंतु सामाजिक हेतूंच्या सिद्धीसाठीच ते डावपेच खेळले हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्टय आहे. साहस केव्हा करायचे आणि परिस्थितीच्या चक्रव्यूहात प्रत्यक्ष केव्हा शिरायचे यासंबंधीचे त्यांचे गणित मनाशी पक्के झालेले असायचे.

यशवंतरावांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये मंत्रीपदे भूषविलीच, पण सहकारी चळवळ, शेतकर्‍यांच्या विकासाच्या योजना, पंचायत राज्य व जिल्हा परिषदांची स्थापना, सहकारी साखर कारखाने, दलित व दुर्बल घटकांच्या उद्धारासाठी निरनिराळे कार्यक्रम, साहित्य व सांस्कृतिक मंडळाची स्थापना, गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण इत्यादी योजनांची महाराष्ट्र राज्यात मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात निर्माण केले. साहित्यिक, कलावंत, पत्रकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी मित्रसंग्रह केला. अशा प्रकारे ते सर्वत्र वावरत आणि रमत सुद्धा. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना प्रवासही खूप घडला. त्या प्रवासात आपल्या आवडत्या लेखकांचा मुद्दाम शोध घेऊन त्यांची भेट घेण्याची व जगप्रसिद्ध साहित्यिकांच्या व कलावंतांच्या स्मारकांचे आवर्जून दर्शन घेण्याची त्यांची त्यामागील श्रद्धा, विनम्रता त्यांच्या सुसंस्कृत व कलाप्रेमी मनाला साजेशीच म्हणावी लागेल. राजकारणात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन सावधतेने, धोरणी वृत्तीने, कष्टपूर्वक साध्य केलेला सुसंस्कृतपणा याच्या बळावरच त्यांनी महाराष्ट्राला, देशाला खंबीर नेतृत्व दिले.

तात्यासाहेब केळकर यांनी एका व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे, कीर्ती ही समुद्राच्या लाटासारखी आहे. एका लाटेतून दुसरी उठते, दुसरीतून तिसरी उठते व पसरत जाते. अशा रीतीने महाराष्ट्रात यशवंतरावांच्या कर्तृत्वाची उठलेली लाट पुढे हळूहळू देशात पसरत गेली व त्या लाटेने आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र समाजास एकात्म व प्रगत करण्याचा सतत प्रयत्‍न केला.

महाराष्ट्राच्या काळया मातीतून निर्माण झालेले, कृष्णामाईच्या पाण्यावर पोसलेले कसदार, सुसंस्कृत, निर्मळ, उत्तुंग नेतृत्त्व आज त्याच कृष्णा-कोयनेच्या पवित्र संगमाच्या कुशीत विसावलेले आहे.