विविधांगी व्यक्तिमत्व-८

या गोष्टी जरी लहान दिसत असल्या तरी या प्रसंगाच्या निमित्ताने साहेबांची वेगळी जीवनदृष्टी कळते. साहित्य व सांस्कृतिक उपक्रम यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा वेगळा विधायक दृष्टिकोन दिसून येतो. आपल्या भागातील साहित्यिकांनी सतत लिहिले पाहिजे, आपल्या परिसरांत सतत साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम घडले पाहिजेत. एवढेच नव्हे, तर कृष्णाकाठ हा पानमळयाप्रमाणेच वाङ्‌मयानेही बहरला पाहिजे, सकस ठरला पाहिजे यासंबंधीची एक आंतरिक ऊर्मी त्यांच्या मनात कोठेतरी सतत जिवंत होती व त्यामुळे त्यांनी आपले साहित्य आणि साहित्यिक विषयांचे प्रेम स्वत:पुरते मर्यादित ठेवले नाही. इतरांनाही प्रेरणा देऊन सातत्यपूर्वक फुलविले. सातारा जिल्ह्यात संपन्न झालेली अनेक विभागीय साहित्य संमेलने, १९६२ व १९७५ ला झालेली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने, १९५८ च्या सुमारास झालेली नाटय परिषद, या शिवाय येथे झालेल्या इतर परिषदा या सर्व साहित्यिक व सांस्कृतिक घडामोडी साहेबांच्या सक्रिय उत्तेजनांतूनच निर्माण झाल्या हे सहज स्पष्ट होते.

शिवाजी विद्यापीठाची निर्मिती हे साहेबांचे एक स्वप्न होते, ते साकार झाल्यावर शिक्षणाच्या विस्ताराबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतून सांस्कृतिक व साहित्यिक जाणिवा व अभिरूची कशी निर्माण होईल, आपल्या परिसरांतून अशा नवोदित लेखकांचे जाळे कसे निर्माण होईल याकडेही त्यांचे बारीक लक्ष असे. पश्चिम महाराष्ट्रातून आज निर्माण झालेली अनेक ग्रामीण साहित्य मंडळेही साहेबांच्या या जाणीवा जागृतीचीच साक्ष आहे.

साहेब हे सदैव राजकारण व निवडणुका यांच्यामध्ये गुंतलेले असले तरी त्यांचा पिंड हा एका सुसंस्कृत सहृदय रसिकाचा होता. याविषयी अनेकांनी अनेकपरीने लिहिले आहे; परंतु आपल्या जिल्ह्यात विशेषत: कराड परिसरात जसे स्थानिक स्वराज्याचे विकेंद्रीकरण झाले, सहकारी चळवळ फोफावली, हरित व धवलक्रांतीच्या दिशने पावले टाकली गेली, साखर कारखाने व उद्योगधंदे विकसित झाले हे सर्व चांगले होत असले तरी ग्रामीण परिसरातील सांस्कृतिक जीवनही निकोप व विशुद्ध राहिले पाहिजे याचे भान त्यांना होते. म्हणूनच ग्रामीण साहित्याच्या चळवळीला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. ग्रामीण परिसरात निर्माण होणार्‍या व्याख्यानमाला यशस्वी कशा होतील व त्यामधून नामवंत साहित्यिक व विचारवंत, व्याख्याते कसे भाग घेतील याकडेही आवर्जून लक्ष दिले. साहेबांच्या या कार्याची दखल त्यांच्या राजकीय विचाराने, विरोधी असणार्‍या व्यक्तींनीसुद्धा घेतली आहे. सर्वश्री. ग. वा. बेहेरे, डॉ. बाबा आढाव, प्रा. नरहर कुरूंदकर, श्री. नानासाहेब गोरे यांनी तर आपली उपस्थिती यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत नोंदविली व साहेबांच्या या उपक्रमशील प्रवृत्तीचा आवर्जून उल्लेखही केला.

याप्रमाणे परिचयपूर्व अवस्थेपासून ते परिचय होऊन त्याचे रूपांतर दृढ स्नेहात होण्याचे खरे कारण म्हणजे साहेबांचा मला घडलेला परीसस्पर्शच होय. एवढे महान व्यक्तित्व माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या जीवनात सहानुभूतीच्या ओलाव्याने जो जिव्हाळा निर्माण करते, त्यातूनच माझी यशवंतरावांच्या कार्याची आणि त्यांच्यावरील वैचारिक साधनांची जुळवाजुळव करण्याची, ते जतन करण्याची व संवर्धित करण्याचीच जी ऊर्मी होते, त्याला खरे कारण यशवंतरावांचा मला घडलेला परीसस्पर्श आहे, हे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.