विविधांगी व्यक्तिमत्व-५

या कृतज्ञतेच्या बंधनात कविवर्य ना. धों. महानोर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या ग्रंथाचे हस्तलिखित पूर्ण झाल्यावर सहज मी कविवर्य ना. धों. महानोर यांना १८ फेब्रुवारी १९९४ रोजीच्या उंडाळयाच्या समाजप्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाच्या वेळी दाखविले. त्यांनी हस्तलिखित चाळल्यावर महानोरांनी ते हस्तलिखित आपल्याकडेच ठेवून व सवडीने त्याचे नीट वाचन केले आणि औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाचे श्री. बाबा भांड यांना या हस्तलिखिताच्या प्रकाशनाबद्दल आग्रहाने शिफारस केली. साकेत प्रकाशननेही मनावर घेऊन यशवंतरावांच्या स्मृतिदिनी हा ग्रंथ प्रकाशित करण्याचा संकल्प सोडला. त्याबद्दल मी बाबा भांड यांचा कृतज्ञ आहे. तसेच या ग्रंथासाठी मला येथील वेणूताई चव्हाण कॉलेजमधील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अविनाश भडकमकर यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण हा त्यांच्या व्यासंगाचा व आस्थेचा विषय असल्यामुळे त्यांनी जणू स्वत:चेच काम असल्याचे मानून, मला वेळोवेळी मदत केली. हे सर्व त्यांनी मजवरील तीस वर्षांच्या स्नेहापोटी केले. त्यांचे आभार मानणे आवडणार नाही, म्हणून त्यांचा येथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख करीत आहे. त्याचप्रमाणे माझे आणखी एक व्यासंगी स्नेही स. गा. म. कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. कन्हैया कुंदप यांचेही या ग्रंथास मोलाचे सहकार्य झाले आहे. त्याचप्रमाणे माझी पत्‍नी सौ. वैजयंती पाटील यांनी घरातील प्रापंचिक बाजू उत्तमपणे सांभाळल्यामुळे मला खूपच मोकळा वेळ उपलब्ध करून दिला, म्हणून हे काम मला मन:पूर्वक करता आले; त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे ही नैतिक जबाबदारी वाटते.

या ग्रंथाची पहिली आवृत्ती १९१४ साली प्रकाशित झाली. ती सहा महिन्यात पूर्णपणे संपल्यामुळे हा ग्रंथ दुर्मिळ झालेला आहे. तशातच या ग्रंथाची सारखी मागणी होऊ लागल्यामुळे त्याची दुसरी सुधारीत नवी आवृत्ती व्हावी यासाठी या आवृत्तीत नव्याने सहां लेखांचा सामावेश करण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत आहे. त्यामुळे मूळच्या आवृत्तीमध्ये नसलेले आधिक सहा लेख वाचकांना वाचावयास मिळणार आहेत. या दुसर्‍या आवृत्तीची समृद्धता वाढविण्याचा प्रयत्‍न केल्यामुळे वाचकांना आणखी नवीन महत्वाची माहिती वाचावयास मिळाल्याचा लाभ होणार आहे. हे  समाधान मला लाभत आहे.

ही नवीन आवृत्ती ‘श्रीधर मुद्रणालय’ कर्‍हाडचे श्री. श्रीधर रघुनाथ कुलकर्णी यांनी अल्पवधित छापून दिली त्याबद्दल मा. श्री. श्रीधर कुलकर्णी व त्यांच्या प्रेसमधील कामगार बंधूंचा कृतज्ञ आहे.

- विठ्ठल. वि. पाटील

(ग्रंथपाल)

कर्‍हाड

दिनांक १५ ऑक्टोबर २००२
विजयादशमी
स्वप्नदीप अपार्टमेंट
ब्लॉक कं. ३०१, दुसरा मजला,
१३६, बुधवारपेठ, कर्‍हाड - ४१५ ११०. (जि. सातारा)
दूरध्वनी -  ०२१६४/२१८८२