ग्रंथालय किंवा सांस्कृतिक उपक्रमांच्या संदर्भाने त्यांच्याशी माझा फारच थोडा संबंध आला, पण जो काही या निमित्ताने त्यांचा निकटचा सहवास मला मिळाला, त्यावरून कर्हाडच्या सार्वजनिक जीवनाकडे व आपल्या संबंधातील प्रत्येक छोटया-मोठया कार्यकर्त्यांच्या हालचालीकडे त्यांचे किती बारीक लक्ष असे त्याचा अनुभव मला आला आहे. १० मार्च १९८० रोजी साहेबांचे एक मित्र प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे, लातूर हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणार्या व्याख्यानासाठी कर्हाड येथे आले होते. त्याचवेळी साहेबांचा मुक्काम कर्हाड येथे होता. आपल्या व्याख्यानास साहेबांनी उपस्थित रहावे अशी प्राचार्य वाघमारे यांची इच्छा होती. म्हणून मी त्याना 'विरंगुळा' येथे घेऊन गेलो. साहेबांची व्याख्यान ऐकण्याची इच्छा होती, पण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते येऊ शकत नव्हते. हे सर्व त्यांनी अत्यंत सौजन्याने व दिलगिरीपूर्वक प्राचार्य वाघमारे यांना सांगितले.
वास्तविक त्यावेळी साहेब अत्यंत गडबडीत होते. तरीही तेवढया वेळात त्यांनी ग्रंथालयाची चौकशी केली. ग्रंथालयाच्या प्रगतीसंबंधी त्यांना जी माहिती इतरांकडून वेळोवेळी मिळत असे, त्याविषयी समाधान व्यक्त केले. साहेबांचे आणखी एक निकटचे मित्र कै. आमदार पी. बी. साळुंखे, कोल्हापूर यांच्याजवळही ते कर्हाडचा विषय निघे, तेव्हा कर्हाडच्या ग्रंथालयासंबंधी व व्याख्यानमालेसंबंधी अगत्याने चौकशी करत व चाललेल्या कामाविषयी समाधानही व्यक्त करीत.
यासंदर्भात प्राचार्य राम शेवाळकर यांनीही त्यांना येथील व्याख्यानमालेत व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले असता, साहेबांचा उल्लेख करून त्यांनी मुद्दाम कर्हाड येथील व्याख्यानमालेला भेट देण्यासंबंधी सूचना दिल्याचे सांगितले. हाच अनुभव इतर नामवंत वक्त्यांच्या बाबतीतही मला आला आहे. दैनंदिन कामाच्या धकाधकीत मा. साहेबांना कर्हाड नगर वाचनालय व व्याख्यानमाला यासाठी प्रत्यक्ष काही करता आले नसले किंवा त्यांना या उपक्रमांना कधीच उपस्थित राहता आले नसले तरी त्यांचे याबाबत अप्रत्यक्ष मार्गदर्शन असे. त्यांचे आणखी एक निकटचे मित्र कै. काकासाहेब करंबेळकर यांनी कर्हाडच्या साहित्यिक व सांस्कृतिक जीवनात ज्या चळवळी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने केल्या व त्या चळवळीच्या विकासास जे रूप दिले त्यामध्येही साहेबांची प्रेरणा होती हे निश्चित जाणवते. कर्हाड नगर वाचनालयाच्या वतीने होणार्या सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमामागे नगराध्यक्ष मा. पी. डी. पाटीलसाहेब यांचे गेली ३५-३६ वर्षे समर्थ व कल्पक पाठबळ उभे आहे. या पाठबळाला साहेबांची साथ सातत्याने मिळाल्याचे पी. डी. साहेबांनी अशा उपक्रमाच्या निमित्ताने जाहीरपणे व्यक्त केले आहे. यशवंतराव चव्हाण ही केवळ व्यक्ती उरली नसून तो एक विचार आहे, या विचाराचा प्रसार मा. पी. डी. साहेबांच्या अनेक उपक्रमांतून झाला आहे. खुद्द साहेबांनीही याची अनेक वेळा जाहीरपणे नोंद घेतली आहे.
साहेबांचे सातारा जिल्ह्यातील नवोदित लेखकांकडे कसे लक्ष असे व त्यांचा मान ते किती अगत्याने राखत असत याचाही अनुभव एका 'कर्हाड पुरस्कार' कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आला. 'माणसं' या पुस्तकाला कर्हाड पुरस्कार मिळाला असताना ग्रंथकार डॉ. अनिल अवचट यांच्या सत्कार समारंभात सातारचे एक नवोदित साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते श्रोतृवर्गात बसलेले साहेबांना दिसले. त्यावेळी साहेबांनी त्यांना तेथून आपल्या जवळ बोलावून घेतले समारोपाच्या भाषणात त्यांनी डॉ. अवचटांच्या साहित्याच्या बरोबरीने श्री. लक्ष्मण माने यांच्या 'उपरा' चा जाणीवपूर्वक गौरव केला.