विविधांगी व्यक्तिमत्व-३

यशवंतरावांच्या कर्तृत्वाच्या खुणा आधुनिक व नवतरुण महाराष्ट्राच्या गेल्या तीस वर्षांच्या वाटचालीत जागोजागी उमटलेल्या दिसतात. विशेषत: गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातही जातिविद्वेषाचे आणि विघटनवादाचे जे बीज रोवले जात आहे, त्या संदर्भात यशवंतरावांची आज आठवण तीव्रतेने होते. शिवसेना, मराठा महासंघ, मुस्लिम लीग, दलित पँथर इत्यादी जातीयवादी संस्थांच्या कारवायांमुळे ते अतिशय अस्वस्थ झाले होते. त्यांच्या स्वप्नांतला महाराष्ट्र असा नव्हता, ही आपली अस्वस्थता ते वेळोवेळी जाहीर व्यासपीठावरून बोलून दाखवत. महाराष्ट्रातील एक शिक्षणमहर्षी स्व. बापूजी साळुंखे यांच्या सत्कार प्रसंगी (एप्रिल १९८२) ते म्हणाले होते, ''महाराष्ट्राला एवढी थोर शैक्षणिक परंपरा असताना आजची तरुण पिढी ठिकठिकाणी जातीयवाद निर्माण करीत आहे, याचा मला खेद वाटतो. प्रत्येक तरुणाने समाजातील आपले स्थान कोणते आहे, समाजासाठी आपण काय करतो याचा विचार करावा. हा अमूक जातीचा, तो अमूक जातीचा असा विचार जर तरुण पिढी करू लागली तर हिंदुस्थानचा विचार कोण करणार ?''

लोकमान्य टिळकांच्या नंतर अखिल भारतीय पातळीवर महाराष्ट्राचे स्थान निर्माण करणारा त्यांच्यासारखा महाराष्ट्रीय नेता अपवादानेच आढळेल. केवळ महाराष्ट्राच्या नव्हे, तर अखिल भारतीय समाजजीवनाच्या संदर्भात सर्वांगीण विचार करणारे असे हे एक थोर व्यक्तिमत्त्व होते. यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या राज्यशासनात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून स्थान मिळविले व पुढे विशाल द्वैभाषिकाचे व नंतर संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एवढेच नव्हे, तर नंतर नोव्हेंबर १९६२ मध्ये झालेल्या चिनी आक्रमण प्रसंगी पं. नेहरूंच्या निमंत्रणावरून केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी प्रवेश केला व त्यानंतर १९८० पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात निरनिराळया खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर किंवा त्यापूर्वीही काही काळ ते भारताच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही होते. उदा. १९६४ साली 'इंटरनॅशनल अफेअर्स' या अमेरिकन राजकीय मासिकाने ‘जगातल्या जाणत्या नेतृत्वाचे वारस कोण?' असा विषय घेऊन अभ्यासपूर्ण अंदाज वर्तवले होते. त्यात भारताच्या राजकारणाचाही अभ्यास करून काही निष्कर्ष काढलेले होते. भारतासंबंधी लिहिताना, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई यांच्या नावाची चिकित्सा करून झाल्यावर लेखक म्हणतो, ''हे सर्व लिहून चौथ्या क्रमांकाचा विचार करताना भारताच्या संभाव्य पंतप्रधानाच्या यादीतून श्री. यशवंतराव चव्हाण यांचे नाव वगळणे चुकीचे ठरेल. त्यांच्या धोरणातला समतोल, त्यांच्या साधेपणात भरलेले आकर्षण, सदैव कार्यक्षम असलेले मन आणि मराठी मातीचे आकर्षण हे त्यांचे गुण महत्त्वपूर्ण आहेत.' असा अभिप्राय या मासिकात व्यक्त झाला आहे. यशवंतराव चव्हाण हे भारताचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत हे कटू सत्य असले तरी त्यामुळे वरील अभिप्राय कमी महत्त्वाचा ठरत नाही. (वरील मताचे मोल कमी मानता येणार नाही.)

यशवंतराव हे राजकारणात राजकारणी होते, सामाजिक समस्यांचे चिंतक होते, तसेच समाजातल्या विविध प्रवृत्तींचे अभ्यासू आणि रसिक टीकाकारही होते. ''....यशवंतरावांच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर राजकीय जीवनाकडे पाहिले तर असे दिसून येते की, त्यांचे आजवरचे राजकारण हे व्यापक सामाजिक हित, समाजवादी अर्थकारणाचा पुरस्कार, लोकशाही जीवननिष्ठा आणि व्यक्तिस्वातंत्र्यवादी दृष्टिकोन या चार प्रमुख सूत्रांचा आचार करणारे आहे.'' (महाराष्ट्र टाइम्स : १२ मार्च १९७०)

वरील, अवतरणात यशवंतरावांच्या सर्वगामी, सर्वसमावेशक आणि त्याचवेळी अत्यंत संपन्न, सुसंस्कारित रसिक अभिजात अशा व्यक्तिमत्त्वाचा अचूक शोध घेण्याचा प्रयत्‍न दिसून येतो त्याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की, यशवंतरावांचा मूलभूत पिंड मानवतावादी विचाराने पोसलेला होता. ते एक मानवतावादी (रॉयवादी) विचारवंत होते; पण त्यांच्या या मानवतावादाला नुसते भौतिक नव्हे, तर अधिभौतिकही अधिष्ठान होते. तुकोबापासून संत गाडगेबाबांपर्यंत आणि म. फुले यांच्यापासून ते रवींन्द्रनाथ टागोर, महात्मा गांधी, काऊंट, लिओ टॉलस्टॉय यांच्यासारख्या विश्वकुटुंबवादी महामानवांचे त्यांना आकर्षण होते. त्यामुळेच ते ब्राह्मणेतर चळवळ, समाजवाद, साम्यवाद इत्यादी कोणत्याच पंथात फारसे समरस होऊ शकले नाहीत.