१६. मुलाखती (पी. व्ही. आर. राव - माजी संरक्षण सचिव)
मितभाषी, काटेकोर वेळ पाळणारे,
प्रगल्भ निर्णयक्षमतेचे संरक्षणमंत्री - यशवंतराव
मोजक्या, अचूक शब्दांत आपले ठाम मत मांडणारे, संपूर्ण आत्मविश्वास असणारे, वेळेचा आणि दुसर्यांतील गुणांचा व्यवस्थित उपयोग करून घेणारे, दिलदार व्यक्तिमत्त्वाचे यशवंतराव संरक्षणमंत्री म्हणून माझ्या कायम लक्षात राहिले आहेत असे मुलाखतीच्या सुरुवातीलाच भारत सरकारच्या संरक्षण विभागाचे सचिव म्हणून काम केलेल्या श्री. पी. व्ही. आर. राव यांनी सांगितले. निवृत्त झाल्यानंतर पुण्याबाहेरील पाषाणच्या निसर्गरम्य परिसरात श्री. राव निवृत्त आयुष्य उपभोगीत आहेत.
लक्षात राहण्यासारखा योगायोग म्हणजे ज्या दिवशी चीनने एकतर्फी युद्धसमाप्तीची घोषणा केली त्याच दिवशी श्री. राव यांची नेमणूक संरक्षण खात्यात करण्यात आली. तुमची नेमणूक आणि शांतता ''मोस्ट वेलकम'' असे म्हणून श्री. यशवंतरावांनी माझे अभिनंदन केले तो प्रसंग चिरंतन आनंददायक आहे असे राव यांनी दिलखुलासपणे सांगितले.
चीनने हिमालयात आपल्या पायदळाची ससेहोलपट करून, जबरदस्त तडाखा दिलेला तो काळ होता. सर्व थरांवर मनोधैर्य खचलेले होते, आपल्या उणिवा, कमतरता उघड्या पडल्या होत्या. आत्मविश्वासघात झाल्याची बोच अंतःकरणात उमटली होती. हिवाळ्याचा कठीण मोसम साधून चीनने युद्धसमाप्ती घोषणा केली पण चार महिन्यांच्या कालखंडानंतर उन्हाळ्यात पुन्हा युद्धाला सुरुवात करील काय याची टांगती तलवार अदृश्य स्वरूपात भेडसावीत होती. या सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत कमी काळात श्री. यशवंतरावांनी आत्मविश्वासपूर्वक ताबा प्रस्थापित केला असे श्री. राव यांचे विश्वेषण. ते सांगतात,
''त्या दिवसांत राजे सकाळी नऊ वाजता संरक्षणमंत्री, तिन्ही दलांचे प्रमुख आणि मी अशी बैठक होत असे. तोपर्यंत सर्व आघाड्यांवरून आलेले संदेश माहिती यांच्यावर मोजकी चर्चा होऊन निर्णय घेतले जात. आम्हा प्रत्येकाकडून अचूक, योग्य ती माहिती घेऊन अत्यंत काटेकोरपणे, संपूर्ण आत्मविश्वासाने, निर्णय मात्र स्वतःच घेण्यात श्री. यशवंतरावांच्या बुद्धिमत्तेचा कसदारपणा प्रखरतेने जाणवत असे. फुकटची वायफळ, शब्दांचे फवारे उडविणारी चर्चा कधीच होत नसे. एखादा मुद्दा, सल्ला त्यांना पटला नाही तर स्पष्टपणे आपले मतप्रदर्शन करीत. अर्थात त्यामुळे आमच्या वैयक्तिक किंवा शासकीय कार्यप्रणालीत कधीही कटुता मात्र निर्माण झाली नाही.''
''संरक्षणमंत्री झाल्यापासून ते थेट १९६४ च्या सुरुवातीपर्यंत परिस्थितीचे अदृश्य ''टेन्शन'' जाणवत होते. त्या संदर्भात स्पष्टीकरण करताना श्री. राव सांगतात, ''चीनने केलेली युद्धबंदी घोषणा आणि पाकिस्तानच्या कारवाया'' यांचा साकल्याने विचार करून यशवंतरावांनी राष्ट्राच्या संरक्षणात कायम स्वरूपात कणखरपणा आणण्याचे द्विसूत्री धोरण मनोमन आखले. सर्व सीमांवर भरपूर पायदळ आर्मी आणि निकडीच्या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचा वेग वाढविणे यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. प्रॉयॉरिटी ऍट टॉप लेव्हर फॉर डिफेन्स प्रॉडक्शन ऍंड सोल्जर्स नंबर्स हे ब्रीदवाक्य त्या काळच्या त्यांच्या शासकीय चर्चेत, सार्वजनिक व्याख्यानात, सभा-भाषणांत प्रामुख्याने आढळून येत असे. ती दर्जेदार स्वरूपाची असावी या बाबतीत यशवंतरावांनी संपूर्ण काळजी घेतली होती. त्या काळात दरवर्षीचे सैन्यदलाचे बजेट तीनशे कोटी रुपयांवरून काही वर्षांत एक हजार कोटी रुपयांवर पोचल्याचे आणि त्याचा परिपूर्ण उपयोग झाल्याचे श्री. राव यांनी आवर्जून सांगितले. त्या कालखंडात कमी शब्द, वेळेचा समतोलपणा आणि निश्चित कार्य करून दाखवीन ही जिद्दी, समजदार भूमिका यशवंतरावांच्या वागण्या-चालण्या-बोलण्यात निश्चितपणे जाणवत होती.
कोणत्याही मुद्द्यावर आततायीपणाने अहंगडपणा दाखविणारे शब्दोच्चार नाहीत, विचारांचा फापटपसारा नाही, कमी वेळात अचूक निर्णय घेण्याची क्षमता आणि संपूर्ण आत्मविश्वास त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सातत्याने डोकावत असे. तुम्हा सर्वांचे विचार ऐकून मला पटेल, रुचेल तोच निर्णय मला घ्यायचा असतो. माझ्या निर्णयाचा जाब विचारणारी भारतीय जनता आहे हे सतत भान ठेवूनच मी वाटचाल करीत राहणार असे विचार त्यांनी अगदी खेळीमेळीच्या स्वरूपात निकटवर्तीयांसमोर ठेवले होते.''