यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-मंत्रालयातील वर्षे-ch १७-१

स्मृतिसंकलन

सैन्याचे मनोधैर्य सावरले

नोव्हेंबर १९६२ मध्ये यशवंतराव दिल्लीस गेले आणि नैतिक धैर्य नष्ट झालेल्या लष्कराची आणि संरक्षण मंत्रालयाच जबाबदारी स्वीकारली.  लष्करात मनोधैर्य पुन्हा निर्माण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि लष्कर आणि संरक्षण मंत्रालय यातील संघर्षाची कारणे निपटून काढणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे, हे यशवंतरावांच्या तात्काळ लक्षात आले. आपल्या आधीच्या मंत्र्यांच उद्दाम स्वभाव आणि अहंमन्य वृत्ती ही असंतोषाचे मूळ आहे हे त्यांनी ओळखले.  या बाबतीत यशवंतरावांचा स्वभाव अगदी विरुद्ध होता.  आपल्या सौजन्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाने आणि सुसंस्कृत वृत्तीने दिल्लीच्या राजकीय जीवनावर त्यांनी आपला ठसा उमटवला.  संरक्षण मंत्रालयात अभ्यासवृत्ती आणि विद्वत्ता या गुणांमुळे यशवंतरावांबद्दल आदर होता.  लष्करात सर्व स्तरांवर त्यांना मान होता, कारण साध्या जवानांपेक्षा आपणास लढाईची अधिक माहिती आहे असा दावा त्यांनी कधीच केला नाही.  आपल्या कौशल्याने आणि संयमाने त्यांनी लष्कर आणि संरक्षण मंत्रालय यांना जवळ आणले.

ले. ज. शंकरराव थोरात
(लोकराज्य, मार्च ८५)

असामान्य प्रशासक

एक आठवण सांगताना श्री. प्रधान म्हणतात, ''यशवंतरावजी आम्हाला सांगत की, जी साधने दिली आहेत त्यांचा कशा प्रकारे उपयोग केल्यास ही साधने जास्तीत जास्त उपयुक्त व परिणामकारक ठरतील हे ज्यांच्या हातात साधने आहेत, त्यांनीच ठरवावयाचे असते.  ते दुसरे असेही म्हणत की, ही माणसे, जे अधिकारी माझ्याबरोबर काम करतात त्यांच्याकडून मी जेवढी निष्ठेची अपेक्षा करतो, तेवढीच निष्ठा मी त्यांना परत दिली पाहिजे.  निष्ठा म्हणजे दुहेरी मार्ग आहे.  तो कधी एकतर्फी होऊ शकत नाही.''  यशवंतरावजींची ही आठवण सांगताना श्री. प्रधान म्हणाले, ''त्यांच्या या विचारसरणीचा मला कित्येक वेळा अनुभव आला आहे.''  यशवंतरावजी आपल्या खात्यातील पेचप्रसंग मुत्सद्दीपणाने कसे सोडवीत याचे अनेक दाखले प्रधान यांनी दिले.

कौशल्याची कसोटी

यशवंतरावजींच्या शासकीय कौशल्याची कसोटी संरक्षणखात्याचे सचिव व लष्करप्रमुख जनरल चौधरी यांच्यातील बेबनावाच्या वेळी दिसून आली.  या विषयीची आठवण सांगताना श्री. प्रधान म्हणाले, ''पी.व्ही.आर.राव हे अत्यंत विद्वान, शिस्तप्रिय आणि कडक, त्यामुळे त्यांच्यासमोर सैन्यातील वरिष्ठ अधिकारीही थरथर कापत.  पी.व्ही.आर.राव यांचा पिंड सखोल अभ्यास करण्याचा होता.  समोरच्या अधिकार्‍यावर प्रश्नांची सरबत्ती करून ते माहिती घेत.  एखाद्या अधिकार्‍याने प्रश्नांचा सखोल अभ्यास केला नाही किंवा माहिती घेतली नाही असे श्री. राव यांना आढळून आले, तर ते त्या अधिकार्‍याची हजेरी घेत.  मग तो अधिकारी कितीही उच्चपदस्थ असो.  याचमुळे जनरल चौधरी हे पी.व्ही. आर.राव यांच्यावर नाराज झाले होते.  कारण पी.व्ही.आर.राव यांनी दुसर्‍या अधिकार्‍याच्या देखत जनरल चौधरी यांचीच हजेरी घेतली असावी.  त्यामुळेच जनरल चौधरी आल्या आल्याच मला म्हणाले की, मला आत्ताच संरक्षणमंत्र्यांना भेटावयाचे आहे.  मी म्हटले आपण आत जाऊ शकता.  अत्यंत गंभीर व निर्धारपूर्वक चेहर्‍याने जनरल चौधरी संरक्षणमंत्र्यांच्या खोलीत गेले.  त्यांच्या चेहर्‍यावरून मला वाटले की, आपले म्हणणे संरक्षणमंत्र्यांनी ऐकलेच पाहिजे व आपल्या मनाप्रमाणे होईल या निर्धाराने जनरल चौधरी आत गेले आहेत.  चौधरी पाच मिनिटांतच हसत हसत बाहेर आले, तेव्हा मला वाटले की त्यांचा पी.व्ही.आर.राव यांच्या बाबतीत खरोखरच विजय झाला असावा.  मी जनरल चौधरींना विचारले, काय आपल्या मनाप्रमाणे झाले ना ?  त्यावर त्यांनी उत्तर दिले की संरक्षणमंत्र्यांना भेटताच मी ज्या गोष्टीचा राग मनात ठेवून गेलो होतो तो राग कोठल्या कोठे गेला.''

श्री. राम प्रधान यांच्या आठवणी
(महाराष्ट्र टाईम्स-डिसें. ८४)