२४ एप्रिल १९६५ रोजी एका पूर्ण ब्रिगेडच्या सामर्थ्यानिशी पॅटन रणगाडे आणि १०० पौंडी तोफांसह पाकिस्तानने कच्छच्या रणात चार ठिकाणी हल्ला चढवला. ''कच्छ आणि सिंधच्या सीमेवर अघोषित युद्ध सुरू झाले आहे'' अशी घोषणा दिल्लीहून करण्यात आली. ''पाकिस्तानी सेनांनी भारतीय प्रदेशात खोलवर घुसून आपली संरक्षण-ठाणी उदध्वस्त केली आहेत'' असेही सांगितले गेले. यातही काही ठाणी आपल्याला सोडून द्यावी लागली. चव्हाणांनी उद्गार काढले ते असे, ''कच्छच्या रणातील घटनांमुळे मंत्रिमंडळाला खेद होत आहे. काही ठिकाणी आपल्याला माघार घ्यावी लागली आहे.'' पाकिस्तानची मखलाशी अशी होती की एकीकडे हल्ले चढवीत असतानाच दोन्ही बाजूंनी आपापली सैन्यदले मागे घ्यावीत अशी सूचनाही पाकिस्तानने केली होती. २८ एप्रिलला लोकसभेमध्ये लालबहादुर शास्त्रींनी स्पष्ट इशारा दिला की ''पाकिस्तानने आपली सदसदविवेकबुद्धी गहाण टाकून आपल्या आक्रमक कारवाया अशाच चालू ठेवल्या, तर आमचे सैन्य जरूर आमच्या देशाचे संरक्षण करील. युद्धनीती, मनुष्यबळाचा उपयोग आणि आवश्यक ती युद्धसामग्री यांचा वापर आम्ही आम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने करू.'' पाकिस्तानने कच्छच्या रणामधील आक्रमण थांबवले नाही तर ८०० मैल लांबीच्या पंजाब सीमेवर सोयीस्कर अशा कोणत्याही ठिकाणी भारत हल्ला चढवेल असाच या धमकीचा गंभितार्थ होता. चव्हाणांनी लष्करप्रमुखांना पंजाब सीमेवरील सैन्यांना सावध करण्याच्या सूचना दिल्या. पंजाब-सिंध सीमांवर सैन्याच्या तुकड्या उभ्या राहिल्या.
शास्त्रींच्या घोषणेमुळे अर्थातच आयुबखानांचे पित्त खवळले. त्यांच्या १ मे १९६५ च्या भाषणात ते गरजले ''भारताच्या या अशा रणनीतीची परिणती भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सर्वंकष युद्धात होईल ही गोष्ट भारताच्या डोक्यात शिरते आहे का ?'' चव्हाणांनी आयुबखानांच्या या आक्षेपाला सणसणीत उत्तर दिले. त्यांनी सांगितले, ''जर कोण्या देशाने भारताविरुद्ध युद्ध पुकारले तर भारताला ते आव्हान स्वीकारावेच लागेल आणि त्याला प्रत्युत्तरही द्यावे लागेल.'' सर्वंकष युद्धाच्या आयुबखानांनी दिलेल्या धमकीबाबत ते म्हणाले, ''शब्दांनी काही कुणाची हाडं मोडत नाहीत. असल्या शाब्दिक वल्गनांना आम्ही भीका घालत नाही !''
कच्छच्या रणामधील घटनांच्या संदर्भात चव्हाण म्हणतात, ''कच्छच्या रणामधील आक्रमणामुळे भारतीय सैन्याच्या तयारीची आणि बळाचीही कल्पना पाकिस्तानला आली असेल.'' अर्थात त्याच वेळी अशीही कबुली चव्हाणांनी दिली होती, ''आमचे लक्ष मुख्यतः उत्तरेकडील सीमांवर होते, कारण तिथे कुठलाही धोका पत्करण्याची आमची तयारी नव्हती. पाकिस्तानची खुमखुमी नेहमीच जागृत आहे हे आम्हाला ठाऊक होते. कच्छच्या रणाच्या समस्येबाबत आम्हाला अधिक वास्तववादी भूमिका स्वीकारावी लागली. तडजोडीच्या बाबत आम्हाला समाधानकारक म्हणावे इतपत यश मिळालेले आहे.'' अर्थात हे यश समाधानाइतपतच होते; संपूर्ण समाधान देणारे नव्हते !
काश्मीरमधील युद्धबंदी रेषेचा भंग करणारी प्रकरणेही एकीकडे चालू होतीच. पाकिस्तानने भारतीय हद्दीत केलेल्या आक्रमणांना भारतीय सेना चोख उत्तर देत राहिल्या होत्या. अर्थात यामुळे पाकिस्तानच्या लष्करी महत्त्वाकांक्षांना कोणत्याही प्रकारे आळा बसणे अर्थातच शक्य नव्हते. चव्हाणांनी म्हटले होते- ''कच्छच्या रणासंबंधातील करार झाल्यावर आम्हाला असे वाटले होते की पाकिस्तान आता शांततामय सहजीवनाचा मार्ग स्वीकारील आणि लष्करी धाडस करण्याचा मार्ग पुन्हा स्वीकारणार नाही.'' परंतु मे १९६५ मध्ये रावळपिंडीमध्ये मोठ्या गनिमी आक्रमणाच्या नव्या योजना पुनः आकार घेऊ लागल्या होत्या. या योजनेचा एक भाग म्हणून, आझाद काश्मीरमधील १६ ते २५ या वयोगटातील तरुणांना लष्करी प्रशिक्षण द्यायला पाकिस्तानने सुरुवात केली होती. एका खास 'मुजाहिद' दलाची उभारणी केली होती आणि मुलकी व्यवसायातील १,५०,००० नागरिकांनाही लष्करी प्रशिक्षण देऊन एक राखवी दल निर्माण केले होते. प्रशिक्षण पूर्ण करून हे लोक पुन्हा आपापल्या नोकरी-व्यवसायात रुजू झाले होते. त्यांच्या धन्यांना अशी कल्पना दिलेली होती की अल्प सूचनेवरूनही या लोकांना देशसेवेसाठी नोकरीतून मुक्त करावे लागेल. याशिवाय सैन्याच्या नियंत्रणाखाली राहणारे ८,५०० लोकांचे एक स्वयंसेवक दलही निर्माण केले होते.
चव्हाण सांगतात, ''ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विझगापट्टमच्या नौदलकेंद्रात भेट देण्यासाठी मी गेलो होतो. मी तेथे पोहोचलो त्याच दिवशी दुपारी मला तातडीने दिल्लीला बोलावून घेणारा पंतप्रधानांचा संदेश आला. त्या वेळपर्यंत पाकिस्तानी गनिमी सैनिक भारतात घुसले होते.'' चव्हाण दिल्लीला पोहोचताच शास्त्रीजींच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची एक बैठक भरली. चार तास चर्चा होऊन भारताने या युद्धाला तोंड देण्यासाठी काय योजना करावी ते ठरविले गेले. दिल्लीहून असे सांगितले गेले होते की, ९ ऑगस्टपर्यंत सुमारे ३,००० गनिमी सैनिकांनी युद्धबंदी रेषा ओलांडून भारतात प्रवेश केला आहे. ७ ऑगस्टला या गनिमी सैनिकांनी पूंछजवळचे मंडी हे शहर जिंकले व सुमारे चार दिवस आपल्या ताब्यातही राखले. त्याच दिवशी रात्री 'बारामुल्ला' गावाजवळ श्रीनगरकडे जाणार्या रस्त्यावर अनेक गनिमी सैनिकांना भारतीय तुकड्यांनी पकडले. ८ ऑगस्ट रोजी शेख अब्दुल्ला यांना अटक होऊन पदच्युत केल्याच्या घटनेला वर्ष पुरे होत होते. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या निदश्रनांमध्ये भाग घेण्यासाठी गनिमी सैनिकांचा एक मोठा गट श्रीनगरच्या दिशेने निघाला होता.