राज्याचे मंत्रिमंडळ बनविणे, असेंब्लीचे अधिवेशन बोलावणे, अधिवेशन समाप्त करणे आदि बाबतीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असते. विरोधकांचा आरोप असा की केंद्रीय गृहखाते राज्यपालांना आपल्या हातचे खेळणे बनवितात. राजस्थानमध्ये राष्ट्रपती राजवट आणल्याबद्दल टीकेचे मोठे मोहोळ उठले. लोकसभेत निवेदन करताना चव्हाणांनी केंद्राच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, ''घटनेने कांही नियम घालून दिलेले आहेत. केंद्राने ३५६ व्या कलमाचा वापर केला त्यात गैर कांहीच नाही. राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणे गृहीत धरले आहे. राज्यपालाने एकट्यानेच निर्णय घेण्याची पद्धत सुरू केली तर मग फेडरल पद्धत संपुष्टात येईल. पक्षबदलूंची संख्या फार झपाट्याने वाढत आहे. सव्वा वर्षात म्हणजे मार्च १९६७ ते जून १९६८ च्या दरम्यान पक्षबदलामुळे एकूण १६ राज्य सरकारे गडगडली आहेत. लोकशाहीशी हे सुसंगत दिसणारे नाही. राजकीय चित्र बदलणे म्हणजे राजकीय पक्ष बदलून चित्र बदलणे नव्हे.'' १९६७ ते १९६९ या दोन वर्षांत विरोधी पक्षीय खासदारांनी गृहमंत्री यशवंतराव यांना खिळून ठेवले होते. तथापि गृहमंत्री हा कांही लेचापेचा नसून कणखर, दमदार, आत्मविश्वाससंपन्न असल्याचा अनुभव विरोधकांना आला आणि त्यांनी हळूहळू आपला पवित्रा बदलला. चव्हाण हे एक उत्तम संसदपटू आहेत, कर्तृत्ववान आहेत हे विरोधकांनी मान्य केले.
उत्तर भारतात जनसंघाचा प्रभाव वाढून काँग्रेस पक्ष लोकांमध्ये अप्रिय होऊ लागला होता. त्याचे मुख्य कारण काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते यांची प्रतिमा स्वच्छ राहण्याऐवजी मलीन होत चालली होती. पक्षाचे कार्यक्रम राबविण्याकडे कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले होते. १९६७ नंतर १९६९ पर्यंत ठिकठिकाणी जातीय दंगली उसळून कायदा आणि सुव्यवस्थेची अवघड समस्या गृहमंत्रालयासमोर उभी ठाकली. रांची येथे ऑगस्ट १९६७ मध्ये जातीय दंगल उसळली व तिचे लोण देशात ठिकठिकाणी पोहोचले. एकट्या रांचीमध्ये दंगलीत १५५ लोक प्राणास मुकले होते. गृहमंत्री चव्हाण यांनी त्वरित रांचीकडे धांव घेऊन बिहार सरकारशी चर्चा केली. जरूर ती पोलीस मदत त्यांना दिली आणि दंगल शमविली. रांची मागोमाग श्रीनगर येथील वातावरण प्रक्षुब्ध झाले. यशवंतरावांनी काश्मिरकडे त्वरित धांव घेतली. मंत्री, निरनिराळ्या धर्माचे नेते यांना एकत्र आणून, विचारविनिमय करून तेथे शांतता प्रस्थापित केली. महाराष्ट्रीयांनाच नोकर्यात आणि अन्य उद्योग-व्यवसायात सवलती मिळायला हव्यात, महराष्ट्र हा फक्त महाराष्ट्रीयांकरिता आहे अशा घोषणा देऊन शिवसेनेने मुंबईत लुटालूट, दमदाटी सुरू केली, प्रादेशिक भावना चेतविल्या. यशवंतरावांनी शिवसेनेच्या प्रांतीय चळवळीला ''हुकूमशाही'' संबोधून कडाडून हल्ला चढविला. शिवसेनेवर उघडपणे टीका करणारे यशवंतराव हे महाराष्ट्रातील पहिलेच काँग्रेसचे नेते होते. त्यांनी मुंबईतही टीका केली आणि लोकसभेतही. भिवंडीच्या दंगलीला शिवसेना जबाबदार असल्याचे निक्षून सांगितले. महाराष्ट्र काँग्रेसचा किंवा महाराष्ट्र सरकारचा शिवसेनेला आधार नाही हे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. यामुळे यशवंतरावांसंबंधी दिल्लीत ''शिवसेनेचे पाठीराखे'' अशी जी कुजबूज चालू होती ती बंद पडली.