यशवंतराव चव्हाण (68)

पान नं. १२० पासून पुढे


आला. सारा देश शोकसागरात बुडून गेला. ज्या शास्त्रींनी युद्धात विजयाचा आनंद मिळवून दिला होता त्यांचे देहावसान त्वरित व्हावे याचे दुःख सर्वांना अधिक जाणवले.

कर्तृत्ववान संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांचा लौकिक देशभर पसरला. पंडित नेहरूंनी १९६२ मध्ये (नोव्हेंबर) यशवंतरावांना दिल्लीला बोलावून घेऊन संरक्षण खाते त्यांचेकडे दिले. तीन-साडेतीन वर्षांच्या अवधीत यशवंतरावांनी देशाला संरक्षणाचे दृष्टीने शक्तिमान बनवून भारतीय लष्कराकडून पाकचा पाडाव केला. आपल्या खात्याचा अभ्यास त्यांनी बारकाईने केला. उणिवांची माहिती घेतली आणि एकेक पाऊल योजनाबद्ध उचलून सैनिकांत चैतन्य, विश्वास, जोष निर्माण केला. लष्कर आणि जनता यांच्यांत दुवा निर्माण केला. संकटाचे काळी जवानांना मदत करण्यास जनता पुढे सरसावली. राष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी लष्कराकडून करवून घेतली. चव्हाणांच्या या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा सर्वत्र बोलबाला झाला. १९६६ मध्ये यशवंतरावांवर गृहमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येऊन त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाची, अंतर्गत सुरक्षेसंबंधीच्या कौशल्याची कसोटी घेण्याम आली.

यशवंतराव संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला जात आहेत याचा सार्थ अभिमान महाराष्ट्राला वाटला होता. यशवंतरावांनी तो खरा करून दाखविला. त्यांना निरोप देण्यासाठी पुण्यात शनिवारवाड्यापुढे प्रचंड सभा झाली. सभेचे आणि जी भाषणे झाली ते दृश्य आजही दिसत आहे आणि ते शब्द आजही कानात घुमत आहेत. देशाच्या मदतीला महाराष्ट्र धांवून जात आहे, ''सह्याद्रि'' हिमालयाच्या मदतीला धांवून जात आहे असे उद्‍गार त्यावेळी ऐकायला मिळाले. हे उद्‍गार यशवंतरावांनी खरे करून दाखविले. दिल्लीवर आणि देशावर त्यांनी आपली छाप पाडली आणि देश त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघू लागला. चीनच्या आक्रमणाचे वेळी १९६२ मध्ये तसेच पाकिस्तानच्या आक्रमणाचे वेळी १९६५ मध्ये जनतेने देशाच्या साहाय्यासाठी जी जी मदत देणे शक्य होते ती ती दिली. यशवंतरावांच्या आणि अन्य नेत्यांच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद दिला. पुरुषांनी पैसे दिले, स्त्रियांनी अंगावरील दागिने दिले. देशातील एकजूट पाहून, देशप्रेम पाहून ऊर भरून आल्याशिवाय राहिला नाही.