यशवंतराव चव्हाण (65)

संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्याबद्दल पार्लमेंटमध्ये आणि देशामध्ये नाराजीचे वातावरण पसरले. त्यात ले. ज. कौल यांनी अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घेऊन आपल्या सैन्याची चोहो बाजूने कोंडी करून घेतली. कौल यांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले. त्यांनी दिलेला अहवाल निराशाजनक वाटल्याने पंडितजींनी आपल्या सहकार्‍यांशी चर्चा केली. २५ ऑक्टोबरपर्यंत भारतीय लष्कराची स्थिती शोचनीय बनली होती. कृष्ण मेनन यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. कृष्ण मेनन हे पंडितजींचे स्नेही असल्याने पंडितजींनी त्यांच्या बचावाचा बराच प्रयत्‍न केला. कृष्ण मेनन यांना एकट्यानाच जबाबदार धरणे योग्य होणार नाही असे सांगण्याचा प्रयत्‍न करून पाहिला. राष्ट्रीय विकास मंडळाची बैठक दिल्लीत बोलावून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आम जनतेची भावना लक्षात घेणे जरुरीचे आहे हे पंडितजींना आवर्जून सांगितले. पंडितजींनी लालबहाद्दूर शास्त्री यांच्याशी चर्चा केली. उभयतांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नावांची छाननी केली. यशवंतरावांच्या नांवावर दोघांचे एकमत झाले. पंडित नेहरूंनी चव्हाणांना मुंबईला फोन लावला, ''ताबडतोब दिल्लीला या'' हा निरोप आदेश मानून यशवंतरावांनी १० नोव्हेंबरला दिल्ली गांठली. विमानतळावरून ते थेट नेहरूंच्या निवासस्थानी गेले.

पंडितजींनी आपल्यावर जो विश्वास दर्शविला त्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर आपल्या घरगुती अडचणीही निवेदन केल्या. मातोश्री विठाबाई आजारी होत्या. त्यांना त्या स्थितीत मुंबईत सोडून दिल्लीला जाणे कितपत योग्य होईल असे सौ. वेणूताईंनी यशवंतरावांजवळ बोलून दाखविले होते. तथापि देशाची हांक, नेहरूंवरील निष्ठा नजरेसमोर ठेवून निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी वेणूताईंना पटवून दिले. संरक्षणाच्या प्रश्नाबाबत आपण आज अनभिज्ञ आहोत, ज्ञान मिळविण्याकरिता थोडे दिवस लागण्याची शक्यता आहे असेही नेहरूंजवळ श्री. यशवंतरावांनी प्रांजळपणे सांगून टाकले. नेहरूंनी चव्हाणांना सांगून टाकले, ''मला तुम्ही दिल्लीत हवे आहात. कसला विचार करताय ?  मी तुमची वाट पहात होतो.''

संरक्षण खाते यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे पंडित नेहरूंनी १४ नोव्हेंबर, १९६२ ला जाहीर करून टाकले. यशवंतराव मुंबईत होते. चीनने १७ नोव्हेंबरला प्रचंड सैन्यबळानिशी नेफा भागात जोराची मुसंडी मारली. आसामच्या टेकड्यांचे पायथ्यापर्यंत ब्रह्मपुत्रा नदीच्या कांठावरील तेजपूर शहर जिंकण्याच्या पवित्र्यात चिनी सैन उभे ठाकले. ब्रह्मदेशाच्या बाजूनेही चिनी फौजा मुसंडी मारण्याचा प्रयत्‍न करू लागल्या. भारताच्या हद्दीत २० मैल आत चीन्यांनी प्रवेश केला. वॉलाँग शहर पडल्याची बातमी दिल्लीत येऊन थडकताच सर्वत्र गडबड उडाली. अफवांचे पीक पसरले. सनसेनापती थापर यांनी तेजपूर सोडून दिल्ली गांठली आणि आपला राजीनामा सादर केला. नेहरूंनी डॉ. राधाकृष्णन यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जनरल जे. एन. चौधरी यांचे नांव सुचविले. नेहरूंनी लोकसभेत नवे सरसेनापती म्हणून चौधरींच्या नांवाची घोषणा केली. विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडणे, त्याचे हाती मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देणे आदि लोकशाहीतील सोपस्कार पार पाडून दिनांक २० नोव्हेंबरला यशवंतरावांनी दिल्ली गांठली. विमानतळावरून ते थेट नेहरूंच्या निवासस्थानी गेले. दोन-तीन दिवसांत घडलेल्या घटना त्यांनी समजावून घेतल्या.

पंडित नेहरू एकूण घडामोडीमुळे खूपच सचिंत बनले होते. जनरल थापर यांनी कोणत्या परिस्थितीत राजीनामा दिला, नेफामध्ये परिस्थिती काय आहे, अमेरिकेकडे हवाई मदत मागितली असताना प्रे. केनडींनी थंड प्रतिसाद कसा दिला याची माहिती नेहरूंनी यशवंतरावांना दिली. नेहरूंच्या भेटीनंतर यशवंतरावांनी श्रीमती इंदिरा गांधींची भेट घेऊन त्यांचेशी चर्चा केली. नंतर ते आपल्या मुक्कामी म्हणजे मोरारजीभाई देसाई यांच्या निवासस्थानी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास फोन आला म्हणून उचलला तर दुसर्‍या बाजूला बिजू पटनाईक होते आणि त्यांना चव्हाणांशी बोलायच होते. श्री. पटनाईक तेवढ्या रात्री आले आणि त्यांनी संरक्षणविषयक समस्या, लष्करी डावपेच याबद्दल यशवंतरावांचे शिक्षण करण्यास सुरुवात केली. पटनाईकांचे बोलणे यशवंतरावांनी शांतपणे ऐकून घेतले. ''तुम्ही मुंबई सोडायला नको होती. मुंबईला धोका असून ते शहर युद्धभूमी बनण्याची शक्यता आहे'' असेही बिजूंनी ऐकविले.