यशवंतराव चव्हाण (50)

यशवंतरावांनी दैनिकाला वेळोवेळी उत्तेजन देऊन फार मोठा आधार दिला. संपादकांना त्यांच्या कामात पूर्ण स्वातंत्र्य दिले. स्वतःवर टीकेची परवानगी देऊन त्या टीकेबद्दल कधीही तक्रार केली नाही. प्रसिद्धी वा प्रचाराबाबत कोणी त्यांचेकडे तक्रार केली तर ''वृत्तपत्र स्वातंत्र्यात'' आपण ढवळाढवळ करणार नाही असे स्पष्टपणे तक्रार करणार्‍यांना ते सांगत. द्विभाषिकानंतर संयुक्त महाराष्ट्राचे राज्य     आले. नंतर लगेचच यशवंतराव दिल्लीला संरक्षणमंत्री म्हणून गेले. दिल्लीत त्यांचे बरेच वर्षे वास्तव्य राहिले. तथापि ''विशाल सह्याद्रि'' कडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. टिळक रोडवरील 'सह्याद्री सदन' ही ट्रस्टची भव्य वास्तू त्यांच्याच आशीर्वादाने आणि प्रेरणेने उभी राहिली. ट्रस्टी आणि ट्रस्टी सेक्रेटरी बदलत गेले म्हणून नाउमेद न होता यशवंतराव संपादकांच्या पाठीशी सातत्याने, खंबीरपणे उभे राहिले, अडीअडचणीला धांवून गेले. वृत्तपत्राच्या वाढदिवशी पानसुपारी समारंभाला आवर्जून हजर राहून ते आल्यागेल्यांचे स्वागत करायचे आणि कर्मचारी वर्गाला उत्तेजन व शाबासकी द्यायचे. वृत्तपत्रांनी व पत्रकारांनी द्विभाषिकाला पाठिंबा देण्यात हात आंखडता घेतला होता तरी यशवंतरावांनी सगळ्यांशी स्नेहाचे संबंध कायम राखले होते. ह. रा. महाजनी, द्वा. भ. कर्णिक हे तर त्यांचे स्नेहीच होते. तरुण भारतचे ग. त्र्यं. माडखोलकर हे अधूनमधून चिमटे घ्यायचे, तरीही यशवंतराव त्यांची टीका हंसत-खेळत झेलायचे. 'सकाळ'कार डॉ. नानासाहेब परुळेकर हे यशवंतरावांच्या प्रशासन कौशल्याची, वक्तृत्वाची आणि कर्तृत्वाची वाखाणणी करायचे. वृत्तपत्राच्या संपादक मंडळींव्यतिरिक्त सहसंपादक, वार्ताहर, स्तंभलेखक यांचेशीही स्नेह-सलोखा राखण्याबाबत यशवंतरावांनी कधी हात राखला नाही. पुण्याला आले की प्रसन्नकुमार अभ्यंकर, मा. वि. साने, दिनू महात्मे, वागळे, करेकट्टी यांना बोलावून घेऊन त्यांचेशी मोकळेपणाने गप्पागोष्टी करायचे. अभ्यंकरांकडून त्यांची कॅपस्टन सिगरेट मागून घेऊन ओढायचे. विदर्भाच्या पहिल्या दौर्‍यात तिकडील पत्रकार यशवंतरावांच्या साधेपणाबद्दल, मोकळेपणाबद्दल खूपच भारावून गेले होते. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना यशवंतराव खूपच रंगून जायचे. जणू कांही सर्वांशीच त्यांची खूप जुनी ओळख. पश्चिम महाराष्ट्राबद्दलची अढी आणि गैरसमज पहिल्याच दौर्‍यात यशवंतरावांनी दूर केले. त्याबाबत एक पत्रकार त्यांना म्हणाले, ''यशवंतराव आले, त्यांनी पाहिले आणि आम्हांला जिंकले''.

वृत्तपत्रांना मुलाखती देणे, सवड काढून खास अंकासाठी लिहिणे याचा यशवंतरावांनी कधी कंटाळा केला नाही. सोपी-सुलभ भाषा आणि छोटी छोटी     वाक्ये. साहित्यिक म्हणून बिरुदावली व मिरविता लेखणी हातात धरली की यशवंतराव साहित्यिकासारखे लिहीत. भाषणाचे बाबतीतही असेच घडत असे. भाषण ऐकताना श्रोते तल्लीन होऊन जायचे. कार्यकर्त्यांच्या शिबिरात सगळ्यांची भाषणे ते लक्षपूर्वक ऐकत, मुद्दे लक्षात ठेवत. शेवटी आपल्या छोट्या भाषणात महत्त्वाच्या मुद्यांचा परामर्श घेत. कार्यकर्त्यांची शिबिरे घेणे हा त्यांचा एक आवडता कार्यक्रम होता. कार्यकर्त्यांना बौद्धिक खाद्य दिल्याशिवाय ते तयार कसे होणार असा त्यांचा सवाल असे. राहुरी, महाबळेश्वर, खुलताबाद, आळंदी आदि शिबिरे त्या त्या वेळी गाजली. कार्यकर्त्यांना खूपच विचारधन मिळाले. कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याबाबत यशवंतरावांचा कटाक्ष असे.