यशवंतराव चव्हाण (48)

मुख्यमंत्री झाल्याबद्दल यशवंतरावांचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सत्कार करण्यात आले. कराडला अभूतपूर्व सत्कार करण्यात आला. त्या पाठोपाठ सांगलीनेही भव्य सत्कार केला. लोकल बोर्डाने मानपत्र दिले. यावेळी बोलताना यशवंतराव म्हणाले, ''भाषिक राज्याचा प्रश्न भावनेचा बनविला गेल्यामुळे भाऊ भाऊ होते ते वैरी बनले. सुदैवाने ही घटना तात्पुरती ठरली. भाऊ भाऊ पुन्हा एकत्र आले आहेत. विखुरलेला सर्व मराठी प्रदेश आता १ नोव्हेंबरपासून एकत्र आला आहे. इतिहासात पूर्वी असे कधी घडले नव्हते. विशाल राज्य ही इतिहासातील नवी घटना आहे. या राज्यात त्या त्या विभागीय भाषांना महत्त्व दिले जाईल, त्यांचा विकास केला जाईल. ललित कला वाढतील. संत एकनाथांचे पैठण, कुलस्वामिनी भवानीचे तुळजापूर, अजिंठा-वेरुळची लेणी, सारे कांही नव्या मराठी मुलखात आहे. सोरटी सोमनाथचा काठेवाडी भाऊ आमच्यात आला आहे. मुंबई ही आमची आई असून तिने आम्हा सर्वांना एकत्र आणले आहे. आमचा वारसा टिळक-गांधींचा आहे. त्यांनी आम्हांला एकराष्ट्रीयत्वाचे महान तत्त्व शिकविलेले आहे.''  सांगलीनंतर १७ नोव्हेंबरला सोलापूर येथे पार्क मैदानावर जिल्हा काँग्रेसने प्रचंड असा सत्कार केला. त्याप्रसंगी यशवंतराव भाषणात म्हणाले, ''भ्रातृभाव आणि समानतेच्या भूमिकेवर आधारलेली लोकशाही आम्हांला निर्माण करावयाची आहे. प्रथम आपण भारतीय आहोत आणि नंतर महाराष्ट्रीय हे कृतीने पटवून द्यायला हवे.''  यशवंतरावांचे दक्षिण महाराष्ट्रात जे मोठमोठाले सत्कार झाले, त्या प्रसंगी त्यांनी जे विचार व्यक्त केले त्यांतून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून आली, ती ही की द्विभाषिकाचा प्रचार यशवंतराव निष्ठेने करीत आहेत. प्रभावीपणे करीत आहेत, काँग्रेसजनांना प्रचाराचे कामाला उद्युक्त करीत आहेत आणि विरोधकांना हितोपदेश सुनावीत आहेत. द्विभाषिकाबाबत वृत्तपत्रांनी यशवंतरावांना जेवढे सहकार्य द्यायला हवे होते तेवढे त्यांचेकडून मिळत नव्हते. टीकाटिपणीच अधिक व्हायची. हक्काचे वृत्तपत्र हाताशी नाही. सत्कार-सभा-समारंभातून आपण एकटे किती बोलणार आणि प्रचार करणार हे लक्षात आल्यावर यशवंतरावांच्या मनात नव्या वृत्तपत्राची कल्पना घोळू लागली. त्यांनी आपला विचार काही सहकार्‍यांजवळ बोलून देखील दाखविला.

नवे वृत्तपत्र काढणे आणि ते चालविणे किती अवघड आहे, खर्चाचे आहे याची यशवंतरावांना कल्पना होती. 'प्रकाश,' 'लोकशक्ती' आदि दैनिकांचा अनुभव त्यांच्या गांठीशी होता. द्विभाषिक राज्य आपण कसोशीने चालवीत असताना, आपल्या धोरणांचे आणि निर्णयांचे स्वागत होत असताना आपण लोकांपर्यंत, खेड्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन पोहोचत नाही हे त्यांना प्रकर्षाने जाणवले. प्रचाराचे, प्रसाराचे माध्यम आपल्याजवळ नाही ही खंत यशवंतरावांनी एके दिवशी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचेजवळ बोलून दाखविली. वृत्तपत्राबद्दल त्यांनी बोलणे केले. त्यानंतर काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते, वृत्तपत्रसृष्टीतील अनुभवी पत्रकार श्री. अनंतराव पाटील यांना मुंबईला बोलावून घेऊन आपल्या कल्पनेतील वृत्तपत्राच्या शक्या-शक्यतेबद्दल त्यांचेशी चर्चा केली. अनंतराव पाटील त्यावेळी 'सकाळ'मध्ये सहसंपादक होते. त्यांच्या पाठीशी पंधरा वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव होता. वृत्तपत्राच्या गरजेबद्दल अनंतरावांनी सहमती दर्शविली. तथापि काँग्रेस पक्षाचे पत्र म्हणून वृत्तपत्र चालू करणे आणि ते टिकविणे अवघड आहे याची स्पष्ट कल्पना दिली. पत्राचे स्वरूप व नियंत्रण विश्वस्त संस्थेकडे ठेवले, काँग्रेसवाल्यांचा दैनंदिन हस्तक्षेप होणार नाही याबद्दलची व्यवस्था केली गेली, संपादकीय धोरणाची सर्वसाधारण रूपरेषा विश्वस्तांनी ठरवून दिल्यावर संपादकांचे कामात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घेतली गेली तर दैनिकाचा प्रयोग आणि प्रयत्‍न करायला हरकत नाही असे परखड मत अनंतराव पाटलांनी व्यक्त केले.