यशवंतराव चव्हाण (45)

यशवंतरावांपुढे पेच निर्माण झाला होता. द्विभाषिक राज्य यशस्वी करून दाखवायचे म्हणजे निवडणुकीत यश मिळवून राज्याला स्थिर सरकार द्यायचे. निवडणुकीच्या संदर्भात पार्लमेंटरी बोर्ड, तिकीट वांटप आदि अडचणी उभ्या होत्या. पूर्वी निवडलेल्या पार्लमेंटरी बोर्डात हिरे, चव्हाण, कुंटे देवगिरीकर आणि पी. के. देशमुख होते. या बोर्डात यशवंतराव चव्हाण अल्पमतात होते. पार्लमेंटरी बोर्डाची पुनर्घटना करायला हवी असे त्यांनी हिरे यांना सांगून पाहिले. तथापि हिरे यांनी चव्हाणांची सूचना फेटाळून लावली. मग प्रदेश काँग्रेसची खास सभा बोलाविण्यासाठी ८३ सदस्यांच्या सह्या गोळा केल्या गेल्या. खास सभा बोलाविण्याबाबत दोन वेगवेगळे अर्ज सादर करण्यात आले. एकात नव्या बोर्डाची निवड व्हावी अशी मागणी होती आणि दुसर्‍यात जुन्या बोर्डात आणखी नवे सदस्य घेऊन ती संख्या घटनेप्रमाणे नऊ करावी. प्रथम घटनात्मक वाद आणि नंतर तडजोड होऊन देवकीनंदन नारायण, गणपतराव तपासे, बापूसाहेब गुप्ते आणि हरिभाऊ पाटसकर असे आणखी चार सदस्य स्वीकृत करण्यात येऊन प्रदेश काँग्रेसमधील वादळ शमविण्यात आले. समितीवाले मात्र असहिष्णु वृत्तीचे प्रदर्शन करीत राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चिंतामणराव देशमुख यांच्यासारख्यांनी जे विचार प्रदर्शित केले, जो सल्ला दिला तो देखील समितीवाल्यांनी न मानता उपराष्ट्रवादाचे टोक गांठले.

लोकसभेने आपल्या ठरावाने निर्माण केलेल्या विशाल मुंबई राज्याच्या नेतेपदाची निवड करण्याकरिता जुने मुंबई राज्य, सौराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथील आमदारांची संयुक्त बैठक मुंबई येथे दिनांक १६ ऑक्टोबर रोजी झाली. नेतेपद नव्या निवडणुका होईपर्यंत सहा महिनेच राहणार होते. मोरारजीभाई देसाई या उरलेल्या सहा महिन्याकरिता नेतेपदी राहतील अशी बर्‍याच जणांची अपेक्षा होती. काही जणांची अपेक्षा होती की, यशवंतराव चव्हाण नेते बनतील. मोरारजींचे नांव यशवंतरावांकडून सुचविले जाताच त्यांनी सांगून टाकले की एकमताने निवड होणार असेल तर नेतेपद स्वीकारीन, नाही तर आपल्याला नको. भाऊसाहेब हिरे यांनी मोरारजींचे नांवाला विरोध दर्शविताच मोरारजींनी नांव मागे घेतले. बाळासाहेब देसाई आदि आमदारांनी लगेच यशवंतरावांचे नांव सुचविले. चव्हाण आणि हिरे यांच्यात निवडणूक होऊन यशवंतराव ३३३ विरुद्ध १११ मतांनी काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवडून आले. मुंबई, कच्छ, सौराष्ट्र, गुजरात येथील आमदारांनी चव्हाणांना पाठिंबा दिला. मराठवाडा-विदर्भात मात्र फाटाफूट झाली.     नेतेपदी निवड झाल्यावर यशवंतरावांनी १ नोव्हेंबर, १९५६ रोजी विशाल मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यावेळी त्यांचे वय अवघे ४२ वर्षाचे होते. एवढ्या लहान वयात विशाल राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ झालेले यशवंतराव हेच पहिले मुख्यमंत्री होत. शेतकर्‍याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. मातोश्री विठाईला खूपखूप आनंद झाला. आपला यशवंता मोठा साहेब झाला असे त्या माऊलीने बोलून दाखविले.