जूनमध्ये पुण्यात महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची बैठक झाली. पंधरा-वीस तास चर्चा झाली. तथापि एकमत होऊ शकले नाही. नेतृत्वात दोन तट पडले. पंडित नेहरूंच्या योजनेने आपले समाधान होत नसले तरी राष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या हितार्थ ती स्वीकारावी असे मत यशवंतरावांनी आग्रहाने मांडले. यशवंतराव चव्हाण यांचा एक गट आणि हिरे-कुंटे-गाडगीळ यांचा एक गट असे दोन गट काँग्रेसमध्ये निर्माण झाले. हिरे-कुंटे यांचे म्हणणे होते की, मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारशी असहकार करावा. जिल्हाध्यक्षांचे बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसची सर्वसाधारण सभा लगोलग झाली. राजीनामा देण्याबाबतच्या ठरावाला आपण विरोध करणार आहोत असे यशवंतरावांनी आदल्या रात्री जाहीर करून टाकले. भाऊसाहेब हिरे यांनी आपला हेका न सोडता अधिकार त्यागाबाबतचा ठराव बैठकीत मांडला. त्याला मा. बाळासाहेब भारदे यांनी उपसूचना मांडून अधिकारपदाच्या त्यागाचे कलम गाळावे अशी मागणी केली. या उपसूचनेला यशवंतरावांनी पाठिंबा दिला. तथापि उपसूचना मतदानाने फोटाळली गेली आणि मूळ ठराव संमत करण्यात आला. ठराव मांडताना हिरे यांनी जे विचार व्यक्त केले आणि उपसूचनेला पाठिंबा देताना यशवंतरावांनी जे विचार मांडले त्यांतील भिन्नता दोघांच्या विचारसरणीवर प्रकाश टाकणारी होती. हिरे आपल्या भाषणात म्हणाले, ''महाराष्ट्रात आम्हांला कोणी बोलावीत नाही. काँग्रेसच्या नेत्यांना कुणीही विचारीत नाही.'' यशवंतराव आपल्या भाषणात म्हणाले, ''आजच्या घटकेला राजीनामा देण्याचे पाऊल उचलले तर घटनात्मक पेच निर्माण होईल. अधिकारपद सोडल्याने लोक आपल्यामागे येतील, हे खरे नाही. महाराष्ट्राची या ठरावामुळे आपण हानी करू. भाऊसाहेबांच्या बरोबर माझा संघर्ष नाही. हिरे यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्राची मोठी हानी होईल. भाऊसाहेबांनी राजीनामा देऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे.''
काँग्रेस श्रेष्ठींनी राजीनाम देण्यास परवानगी नाकारली. भाऊसाहेबांना विरोध करण्याची पाळी याची, भाऊसाहेबांनी गाडगीळ-कुंटे यांच्याबरोबर फरफटत जावे याचे यशवंतरावांना दुःख झाले. ते त्यांनी स्नेह्यांजवळ, सहकार्यांजवळ बोलून दाखविले. यानंतर हरिभाऊ पाटसकर यांचे दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली. तिला शिष्टमंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. चिंतामणराव देशमुख हेही हजर राहिले. शंकररावांनी विशाल द्विभाषिकाचा पर्याय असलेला कागद पुढे केला. हा नवा पर्याय पाहून यशवंतराव गोंधळून गेले. त्यांनी देव यांना बैठकीत चांगलेच सुनावले. यशवंतराव म्हणाले, ''सर्वांना विश्वासात न घेता तुम्ही परस्पर हे काय केलेत ? तुमचे असेच चालू राहणार असेल तर शिष्टमंडळाबरोबर न राहता आम्हाला मुंबईला परतावे लागेल.'' त्यानंतर मौलाना आझाद यांच्या निवासस्थानी काँग्रेस श्रेष्ठींशी चर्चा करण्याचे ठरले. त्याप्रमाणे प्रदीर्घ चर्चा झाली. वरिष्ठ नेत्यांचे मन वळविण्यात शिष्टमंडळाला यश मिळू शकले नाही. देव यांनी सांगून टाकले की द्विभाषिक आम्हांला मान्य आहे. पाच वर्षानंतर गुजरातने वाटले तर बाजूला व्हावे. काँग्रेस कार्यकारिणीच्या उपसमितीने यावर चर्चा केली पण निश्चित उत्तर दिले नाही. शिष्टमंडळाची अशाप्रकारे बोळवण केली गेल्यानंतर सर्व मंडळी नाराजीसह महाराष्ट्रात परतली.