यशवंतराव चव्हाण (37)

पश्चिम महाराष्ट्राच्या इतर भागात सभांतून यशवंतरावांविरुद्ध गलिच्छ भाषा वापरणे, शिविगाळ करणे आदि प्रकार सुरू झाले. त्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी आपली भूमिका पटवून देण्याचा अटोकाट प्रयत्‍न करायचा ही भूमिका यशवंतरावांनी स्वीकारली. ''सय्यद बंडा,'' ''मोरारजींच्या महाराष्ट्रातील सूर्याजी पिसाळ, चमचा'' आदि भाषा वापरून कांही विरोधी नेत्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. काहींची मजल भर सभेत चव्हाणांच्या दिशेने चपला फेकण्यापर्यंत गेली. सगळ्यांच्या नजरा मुंबईत १९ नाव्हेंबरला काय होते यावर खिळून राहिल्या.

प्रांताध्यक्ष मामासाहेब देवगिरीकर त्रि-राज्य योजनेचा वगि कमिटीचा निर्णय घेऊन दिल्लीहून परतल्यावर त्यांनी प्रदेश काँग्रेसची बैठक पुण्यात तारीख १६ नाव्हेंबरला बोलाविली. कारण नोव्हेंबर १८ तारखेला मुंबई असेंब्लीची बैठक सुरू होणार होती. काँग्रेस आमदारांनी कोणते धोरण स्वीकारावयाचे याबद्दल चर्चा करून धोरण ठरविणे आवश्यक बनले होते. बैठकीत बरीच चर्चा झाली. मुंबई शहर हे वेगळे राज्य केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येऊन मुंबई महाराष्ट्राला देण्याबाबत वगि कमिटीने फेरविचार करावा अशी विनंती करण्यात आली. ''हृदय परिवर्तन करू या'' हा शब्दप्रयोग गाडगिळांनी वापरला. यशवंतरावांनी पाठिंबा दर्शविताना, ''काँग्रेसची शिस्त सांभाळून आपण आपले उद्दिष्ट गांठू या. देशाच्या एकतेस व स्वातंत्र्यास विघातक ठरेल अशा कृत्यापासून दूर राहू या'' असे आवाहन केले. मोर्चे, हरताळ, लढा या मार्गाऐवजी मन वळविण्याचा मार्ग अवलंबू असेही यशवंतराव चव्हाण म्हणाले. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे काँग्रेसच्या या भूमिकेमुळे समाधान न होता त्यांनी लढ्याचे रणशिंग पुंफ्कले. मुंबई असेंब्लीच्या बैठकीच्या दिवशी १८ नाव्हेंबरला बंदी हुकूम मोडून प्रचंड मिरवणूक काढण्याची घोषणा करण्यात आली. सेनापती बापट यांनी मिरवणुकीचे नेतृत्व करावे असे ठरले. सुमारे ५०० सत्याग्रहींनिशी बापट, आचार्य अत्रे, मिरजकर मंडळींनी बंदी हुकूम मोडला. त्यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रासाठी लढ्याचे दुसरे पाऊल पडले आणि हा लढा रस्त्यावर आला.

मुख्यमंत्री मोरारजीभाईंनी नोव्हेंबर १८ रोजी दुपारी बोलाविलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत असे सांगितले की, ''त्रि-राज्य योजनेचा ठराव सभागृहात मांडण्यात येईल. त्या ठरावाविरुद्ध कोणाला बोलता येणार नाही, विरोधी मतदान करता येणार नाही. दिल्लीच्या वगि कमिटीचा हा आदेश आहे.''  अशी पुस्ती त्यांनी जोडली. पेचप्रसंग उभा राहिला. भाऊसाहेब हिरे उभे राहिले आणि म्हणाले, ''मी एक निवेदन वाचून दाखविणार आहे. बहुमत आपल्या बाजूला आहे हे पाहून मोरारजींनी हिरे यांची सूचना अमान्य केली. हिरे यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक झाली. काही आमदारांनी राजीनाम्याची भाषा सुरू केली. राजीनाम्याचे भूमिकेस शंकरराव देव यांनी पाठिंबा दर्शविला. हिरे आणि डॉ. नरवणे यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली. यशवंतराव चव्हाण यांनी राजीनाम्याचा मार्ग शहाणपणाचा ठरणार नाही, तो आत्मघात ठरेल असे सांगून राजीनामा सादर करण्यास विरोध दर्शविला. देवगिरीकरांनीही चव्हाणांच्याप्रमाणे विरोध दर्शविला. एकूण अंदाज घेण्यात आला. संभाव्य तटस्थ आमदारांची यादी तयार करण्यात आली. मूळ ठराव संमत होणार आणि काँग्रेस अंतर्गत फूट पडणार हे स्पष्ट झाले. यशवंतरावांनी मोरारजींची भेट घेऊन काँग्रेसमधील फूट टाळण्यासाठी मार्ग काढायला हवा असे सांगितले. दिल्लीत काकासाहेब गाडगीळांना ही माहिती समजताच त्यांनी नेहरूंची भेट घेऊन त्यांचे मन वळविले. मोरारजींना दिल्लीहून आदेश मिळाला. ठरावावरील चर्चा पुढे ढकलण्यात आली.