आस्वादक समीक्षा-लेखन
आयुष्यभर अखंड केलेल्या या चौफेर वाचनामुळेच वाचलेल्या ग्रंथांची आस्वादक समीक्षा करण्याची कुवत यशवंतरावांना लाभली होती. सहज म्हणून त्यांनी जी विधाने विविध साहित्यकृतींबद्दल केली आहेत, ती त्यांच्या विलक्षण बुद्धीचा प्रत्यय देतात. सहज एक रसिक या नात्याने ते विधान करीत असले, तरी प्रत्येक 'साहित्यप्रेमी हा आजच्या लोकशाही युगात एक नम्र समीक्षक असतोच', याची चव्हाणांना ठाम जाणीव दिसते (कित्ता, २०६). त्यामुळेच यशवंतरावांचा साहित्यिक म्हणून विचार करताना त्यांनी केलेल्या समीक्षेचा आवर्जून उल्लेख करणे अगत्याचे ठरते.
आत्मचरित्रांविषयी लिहिताना अलीकडच्या आत्मचरित्रांची वैशिष्टये लेखकांच्या क्षेत्रानुसार आत्मचरित्रात पडणारा फरक जसा यशवंतराव नोंदवतात, तद्वतच 'आत्मचरित्रे वाचताना वाचकांनी नैतिक न्यायाधीशाची भूमिका न घेणे बरे', किंवा लेखकाच्या खाजगी जीवनाविषयी अकारण जिज्ञासाही बाळगू नये, असा वाचकांनाही ते सल्ला देतात (कित्ता, २१९). अलीकडच्या आत्मचरित्रांचे लेख त्यांच्या मते स्वतःचे बाल्य व तारुण्य या भूतकाळाबद्दल बरेच पारदर्शक लेखक करतात, मात्र त्यांचे हे लेखन अलीकडच्या चालू काळाबाबत मात्र अतिशय सावध असते. दलित आत्मचरित्रांचे उत्तरार्ध जर कुणी अभ्यासकाने स्वतंत्रपणे अभ्यासले, तर यशवंतरावांच्या विधानातले मर्म त्यांच्या लक्षात येऊ शकेल. यशवंतरावांच्या मते, आयुष्यात घडलेल्या घटनांचे सूक्ष्म विश्लेषण करता येणे ज्यांना स्वयंविश्लेषणाची व आविष्काराची सवय आहे, अशा कलावंतालाच शक्य होते, 'म्हणूनच कलाकारांची आत्मचरित्रे अधिक अंतर्मुख, तर सामाजिक-राजकीय क्षेत्रांतील कार्यकर्त्यांची आत्मचरित्रे सामान्यतः अधिक बहिर्मुख असतात', असा अनुभव यशवंतराव नमूद करतात. कार्यकर्त्यांच्या आत्मचरित्रात विपुल माहिती मिळते, तर कलावंतांची आत्मचरित्रे चटका लावून जातात (उदा., 'सांगत्ये ऐका'). आत्मचरित्रातून सत्य लपवले जाते, आत्मगौरव आणि आत्मसमर्पण घडते, याचा ठपका केवळ लेखकाच्या व्यक्तिमत्त्वावर न ठेवता समाजजीवनातील त्रुटींमध्ये यशवंतराव त्यांचे मूळ शोधतात, ते म्हणतात, ''आपले सामाजिक जीवनातील दुहेरीपण (दुटप्पीपणा) ब-याच प्रमाणात (यासाठी) जबाबदार असावे'' (कित्ता, २२०), आदर्श व तत्त्वे एक आणि व्यवहार निराळाच, शिवाय सामाजिक दांभिकता यांचा हा अपरिहार्य परिणाम आहे, असे त्यांना वाटते, म्हणून ते आत्मचरित्रांचे मोठेपण ती संपूर्ण सत्य सांगतात, की नाही, या कसोटीवर ठरवीत नाहीत, कारण संपूर्ण सत्य त्यांच्या मते आकाशपुष्पासारखेच असते. राजकीय-सामाजिक कार्यक्षेत्रांतील-किंबहुना सार्वजनिक जीवनात भाग घेणा-या प्रत्येक व्यक्तीने तटस्थपणे व अभिनिवेशरहित आत्मचरित्र लिहायलाच पाहिजे, असे यशवंतरावांचे म्हणणे होते. त्यांच्या मते, एका परीने अशा व्यक्तीने आत्मचरित्र लिहिणे हे तिचे कर्तव्यच ठरते, कारण अशा आत्मचरित्रावाचून ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनांचे धागेदोरे उलगडणे अशक्यप्राय ठरते. आपल्याकडे वस्तुनिष्ठ विश्लेषणात्मक इतिहासलेखन न होण्याचे एक कारण अशा सामग्रीचा अभाव हे आहे.