यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ८०

ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबाचे घर तसे वाङ्मयीन संस्कारांच्या दृष्टीने एकूण प्रतिकूलच असते.  पण यशवंतरावांनी आपल्या सूक्ष्म संवेदनशीलतेच्या बळावर या प्रतिकूलतेवर मात केली.  प्रतिभेचे देणे त्यांना आईकडून उपजतच मिळाले होते.  दळताना आईने म्हटलेल्या स्वरचित ओव्यांनी पहिला वाङ्मयीन संस्कार त्यांच्यावर केला होता.  रामायण-महाभारताचे कथासार असणा-या शेपाचशे ओव्या त्यांच्या आईने रचल्या होत्या.  आईबरोबर ऐकलेली कथाकीर्तने, प्रवचने, पौराणिक आख्याने, इत्यादींतून त्यांचे भाषाभान सतर्क झाले होते.  कृष्णाकोयनेच्या प्रीतिसंगमाकाठचा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेला परिसर त्यांच्यातल्या सर्जनशील ऊर्मीना खतपाणी घालणारा ठरला.  त्या परिसराने त्यांच्या मनात निसर्ग-सौंदर्याची ओढ रुजवली.  

आपले 'ॠणानुबंध' हे पुस्तक यशवंतरावांनी कृष्णा-कोयनेच्या काठावर नांदणा-या 'कर्हाड'ला समर्पित केले आहे, ते या परिसराविषयीच्या कृतज्ञता-भावनेतूनच.  कृष्णा-कोयनेच्या 'या पाण्याने काही छंद लावले व काही श्रद्धा दिल्या', हे त्यांनी अर्पणपत्रिकेत नमूद केले आहे.  देवराष्ट्र हे यशवंतरावांचे आजोळ, त्याच्या शेजारील सागरोबाचे शिवार.  या संपूर्ण परिसराने यशवंतरावांना इतका लळा लावला होता, की एखाद्या सुखस्वप्नासारखे त्यांनी आपले तिथले बालपण मर्मबंधातल्या ठेवीप्रमाणे जन्मभर जपले होते.  सोनहिरा ओढ्याच्या काठावर घनगर्द आंबराईत कोकिळेच्या कुहूकुहू स्वरात स्वर मिसळून यशवंतरावांनी अर्धेअधिक मेघदूत मुखोद्गत केले होते.  डोंगरांवर एकट्याने चढावे-उतरावे, संगमात डुंबावे, कृष्णा-कोयनेचे एकात्म होऊन वाहणारे पाणी पाहत काळावर तासनतास चिंतन करावे, हा त्यांचा बालवयातला मुक्त जीवनक्रमच त्यांच्यांतल्या साहित्यिकाच्या निकोप जडणघडणीस कारणीभूत झाला होता.

फडके-खांडेकरांच्या युगात यशवंतरावांची पिढी वाढली होती.  विशेषतः, खांडेकरांच्या लेखनाचा आपल्या विचारांवर व भावनांवर खोल ठसा उमटला होता, हे यशवंतरावांनी नमूद केले आहे.  तुरुंगात पुढे आचार्य भागवतांनी सावरकरांच्या 'कमला'चे जाहीर वाचन केले, तेव्हा आपणही दीर्घकाव्य लिहावे, असे वाटून यशवंतरावांनी राष्ट्रीय चळवळीत स्वतःला झोकून देण्याची तीव्र इच्छा असलेल्या ग्रामीण युवकाचे मनोविश्व चितारणारे दीर्घकाव्य लिहायला प्रारंभ केला होता.  त्यांच्या काही कथा 'लोकक्रांती' नामक नियतकालिकात प्रकाशित झाल्या होत्या.  एक कादंबरीही त्यांनी मनाशी आखून ठेवली होती...