यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ७९

५.  साहित्यिक यशवंतराव

''....  पण त्यांचे मूल्यमापन मात्र त्यांच्या राजकीय जीवनाच्या अनुषंगाने झाले आहे, त्यामुळेच त्यांच्यावर काहीसा अन्याय झाला आहे.  राजकारणातील आवेश, अभिनिवेश, पूर्वग्रह, त्या त्या काळचे वातावरण या सर्वांमुळे राजकीय व्यक्तींचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ व साक्षेपी नसते.  पूर्वग्रहांच्या दाट छायेने राजकीय महापुरुषांचे अनेक सद्गुण झाकले जातात, किंवा त्यांचे धूसर दर्शन होते.  अनेकदा राजकीय पुरुष त्यांच्या कमी महत्त्वाच्या गुणांनी प्रसिद्धी पावतात.  म्हणून राजकीय मापाने अशा अष्टपैलू व्यक्तींचे मूल्यमापन करणे तर्कदुष्ट व अशास्त्रीय आहे.'' (ॠणानुबंध २३५-६).

वरील विधान यशवंतराव चव्हाणांनी तात्यासाहेब केळकरांच्या संदर्भात केळकर-जन्मशताब्दी समारंभातील भाषणात केले होते.  केळकरांच्या ठिकाणी 'अष्टपैलू व्यक्तिमत्व, व्यापक बुद्धी व अनेकांगी कर्तुकी' असल्याचे सांगून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार राजकीय पूर्वग्रह, मतभेद वा वैचारिक कलह बाजूस सारून केला जायला पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतरावांनी केले होते.

प्रस्तुत लेखारंभी हे अवतरण उद्धृत करण्याचे कारण असे, की खुद्द यशवंतरावांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन करतानाही अभ्यासकांनी त्या अवतरणातील पथ्य पाळणे अगत्याचे ठरते.  वाङ्मयीन संस्कारांचे पाथेय जन्मभर कृतज्ञतापूर्वक मिरवणारे, उत्कटतेने अनुभव घेऊन तितक्याच प्रत्ययकारी शैलीत ते शब्दबद्ध करणारे, भाषेवर मनापासून प्रेम करणारे आणि साहित्याविषयी चोखंदळ जाणकारी बाळगणारे यशवंतराव राजकीय पूर्वग्रहांमुळे वा मतभेदांमुळे दुर्लक्षिले जाता कामा नयेत.  एक राजकारणी मुत्सद्दी, संसदपटू, कार्यक्षम मंत्री व पक्षनेता हा त्यांचा 'राजकीय' लौकिक जगभर झालेला आहे.  मराठी माणसाला त्याचा अभिमानही आहे.  पण अन्य राजकारण- धुरंधरांपेक्षा यशवंतरावांचे वेगळेपण हे, की त्यांचा आपल्या मायबोलीवर खूप जीव होता.  ते स्वतः एक सर्जनशील कलावंत व उत्तम समीक्षक होते.

'साहित्याच्या क्षेत्रात माझी भूमिका नम्र रसिक वाचकाची आहे', हे त्यांनी आवर्जून वारंवार सांगितले असले, तरी तेवढ्यापुरती ती मुळीच सीमित नव्हती.  त्यांचा मूळ पिंडच प्रतिभावंताचा होता.  राजकारणाच्या धकाधकीत यशवंतराव शिरले नसते, तर कदाचित साहित्याच्या इतिहासात अजरामर ठराव्यात, अशा साहित्यकृती ते निर्माण करू शकले असते, असे त्यांच्या प्रकाशित लेखनावरून व भाषणावरून वाटते.